सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

स्वातंत्र्य आणि अंतू बर्वा !

   अंतू बर्वा कोणाला माहित नसेल ? मराठी साहित्याची बाराखडी वाचलेला माणूस 'अंतू बर्वा' या पुलंच्या अजरामर 'वल्ली'चित्रणाशी परिचित असतोच असतो... मी वाचलेल्या मराठी साहित्यकृतींपैकी 'अंतू बर्वा' हे एक सर्वोत्तम व्यक्तीचित्रण आहे... पण आजचा विषय थोडा वेगळा आहे !

   'भारत का स्वतंत्र झाला' यामागे असंख्य 'थेअरी' आहे... भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा आणि १५ ऑगस्ट १९४७ ला जे घडले त्याचा प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार, विचारसरणीनुसार आणि अभ्यासानुसार अर्थ लावताना दिसतो... मात्र यात एक 'अंतू बर्वा' प्रवाहसुद्धा बघायला मिळतो. स्वातंत्र्यप्राप्तीची ही 'थेअरी' अनेक लोकांच्या मनात घर करून बसली आहे. ही 'अंतू बर्वा' थेअरी साधारणतः अशी की, "स्वराज्याचा म्हणाल तर संबंध गांधीशीही नाही, टिळकाशीही नाही आणि सावरकरांशीही नाही. इंग्रज गेला तो कंटाळून !"... आता आपल्या ज्ञानानुसार या थेअरीचे अनुयायी त्याच्यात महायुद्ध, वसाहतवादाला लागलेली उतरती कळा, इंगलंडची आर्थिक स्थिती वगैरे जोडून ती थेअरी सिद्ध करायचा प्रयत्न करत असतात.... ही थेअरी भलतीच निष्पक्ष आणि उदासीन असल्यामुळे आजकालच्या गढूळ राजकीय वातावरणात अनेक लोक या सिद्धांताकडे आकर्षित होताना दिसतात. मात्र ही थेअरी कितीही उदात्त, निष्पक्ष वगैरे वाटली तरी ती चूक आहे ! आणि हेच सांगण्याचा आणि 'अंतू बर्वा'छाप भ्रम दूर करायचा हा प्रयत्न...

   सर्वप्रथम हे ध्यानात घेऊ या, की 'अंतू बर्व्या'चा स्वातंत्र्य विषयक विचार हा पुलंचा स्वतःचा विचार नव्हता... पुलंनी मुळात 'अंतू बर्वा' हे पात्र एक प्रकारच्या कारुण्यमय नकारात्मकतेचे प्रतिक म्हणून लिहिले आहे ! अंतूचे ते तत्त्वज्ञान त्याच्या जीवनात असलेल्या कारुण्याचा, आजूबाजूच्या नकारात्मकतेचा आणि जन्मजात असलेल्या तिरकस स्वभावाचे  फलित आहे... मात्र ते तत्त्वज्ञान प्रत्यक्षात स्वातंत्र्याविषयी खरे असल्याचा गैरसमज बाळगणारे कैक लोक आहेत, हे बघून पुलंनाही कदाचित निराशा आली असती... पुलंचे राजकीय विचार त्यांच्या 'खिल्ली'नामक पुस्तकात पुरेसे सुस्पष्ट दिसलेले आहेत... त्यातही विशेष करून 'एका गांधीटोपीचा प्रवास' नावाचा लेख खास पुलंचा मास्टरस्ट्रोक आहे ! त्यामुळे अंतूचे तत्त्वज्ञान हे म्हणजे प्रत्यक्ष पुलंचे तत्त्वज्ञान असे मुळीच नाही...

   आता अंतूशेठच्या आणि त्याच्या अनुयायांच्या स्वातंत्र्य सिद्धांताचे इतिहास आणि तर्काच्या मदतीने थोडे विश्लेषण करू... तर त्यांची थेअरी अशी आहे की इंग्रज कंटाळून किंवा महायुद्धात नुकसान झाल्याने हतबल होऊन भारत सोडून गेला, स्वातंत्र्यसैनिक वगैरे उगाच टाईमपास करत होते !! आता महायुद्ध हा ब्रिटीश सत्तेला लागलेल्या उतरणीचा महत्त्वाचा पैलू आहे. जागतिक पटलावर अमेरिका आणि रशिया या नव्या महासत्ता उदयाला आल्या. मानवाच्या इतिहासातील सर्वात भयानक अशा त्या युद्धाने जग बदलले, त्यात ब्रिटनचा दरारा कमी झाला हे मान्यच... पण तेवढ्या एका कारणासाठी भारत सोडून जायला इंग्रज मूर्ख नव्हते ! जर विरोध तीव्र नसता किंवा विरोधच नसता, तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी इंग्रज सोडून गेला असता ? अंतू बर्वा भारतात लुटण्यासारखं काही उरलं नव्हतं असं म्हणतो ! पण हे अजिबात बरोबर नाही...उलट भारतावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कब्जा असणे, नियंत्रण असणे हे ब्रिटनला त्यांचे नुकसान भरून काढायला उपयोगी पडले असते ! वसाहतवादाचा ब्रिटन लाभार्थी होता, अचानक कसली तरी उदात्त लहर आली आणि त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले असे म्हणणे हा मुळातच अशक्य सिद्धांत आहे.... 

   त्यामुळे भारतात विरोध नसता तर ब्रिटनने फारतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 'स्वराज्य' भारतीयांच्या गळ्यात टाकून,  सार्वभौम सत्ता राणीच्या हातीच ठेवली असती... इथे ही शक्यता सांगताना हेही सांगतो की, स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे ! भारत नावाच्या विस्तृत भूभागावर एकत्रितपणे 'सार्वभौम' मानावा असा कब्जा/नियंत्रण असणे म्हणजे स्वातंत्र्य म्हणता येते, नुसत्या नगरपालिका वगैरे ताब्यात ठेऊन ते शक्य नव्हते ! या जगात हल्लीच्या काळातही वाळवंटातील जमिनीवरील कब्जासाठी कत्तली झाल्या आहेत. भारत तर नैसर्गिक आणि मानवी संसाधनांची खाण आहे. तिला 'रिकामा उकिरडा' ठरवणारा अंतू बर्वा कदाचित कधीही  त्याच्या रत्नागिरीच्या बाहेर पडला नसावा !!

   आता स्वातंत्र्यसंग्रामाची अपरिहार्यता लक्षात घेतल्यानंतर, त्या लढ्याच्या नेत्यांकडे वळू ! त्यातील सर्वात चपखल उदाहरण म्हणून गांधीच घेऊ... अंतू बर्व्याची गांधींबाबत खास तिरकी मते वाचताना ती पटण्याचा धोका असतो !! पण इतिहासाची समज असणारे जाणतात की गांधी नसते तर कदाचित 'भारत' अखंडच काय, आता आहे तेवढासुद्धा एकसंधपणे स्वतंत्र झाला नसता... सावरकर महान क्रांतिकारक होते. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अमुल्यच आहे... त्याचप्रमाणे फाशीच्या दोराला हसत हसत सामोरे गेलेले भगतसिंग प्रभृती क्रांतिकारक भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अनमोल हिस्से आहेत... मात्र तरीही गांधींची सर्वसमावेशकता, सार्वत्रिक आधार आणि आंदोलन शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याच्या तंत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे ! याचे कारण असे की, सावरकरांसारखे किंवा भगतसिंगांसारखे सर्वस्व जाळून टाकायला सामान्य जनता मोठ्या प्रमाणात तयार होणे दुरापास्त होते...  या सशस्त्र क्रांतीकारकांनी सर्वस्वाच्या बलिदानाची अपेक्षा थोड्या माणसांकडून केली. मात्र गांधींनी थोड्या बलिदानाची अपेक्षा प्रत्येक भारतीयाकडून केली. 

   गांधींच्या जीवनातला एक प्रसंग मोठा विलक्षण आहे. एकदा गांधींना एका कामासाठी पैशाची गरज होती, त्यामुळे लोकांकडून रुपया-रुपया देणगी मागितली जात होती.  त्यावेळी एक मोठे उद्योगपती पुढे आले आणि म्हणाले की, "गांधीजी, मी एकटा सगळे पैसे देतो. गरीब लोकांकडून का घेता देणगी, मी लागेल तेवढे पैसे देतो...' यावर गांधी म्हणाले की, "तुझ्या एकट्याच्या पैशाने काम केले, तर त्या प्रत्येक गरीबाला ते आपले वाटणार नाही त्याचे काय ? मला प्रत्येकाचा सहभाग हवा आहे !".... अशाप्रकारे स्वातंत्र्यलढ्याला राष्ट्रव्यापी स्वरूप देण्यासाठी गांधींसारखा जनतेची नाडी जाणणारा चतुर नेता लाभला हे भारताचे भाग्य आहे. त्यांच्याशिवाय स्वतंत्र झालेला भूभाग किती तुकड्यांमध्ये विभागला गेला असता याची कल्पना करवत नाही.
त्यामुळे गांधींच्या पंचा आणि उपासाच्या तंत्राला रत्नागिरीचा कलेक्टर घाबरत नव्हता हे एकवेळ खरे असेलही, पण देशाची जनता त्या तंत्राला न घाबरता सकारात्मक प्रतिसाद देत होती हे जास्त महत्त्वाचे आहे !!!

   आता वरील गोष्टी लक्षात घेतल्यानंतर, स्वातंत्र्य हे इंग्रजाच्या मेहरबानीने मिळाले किंवा स्वातंत्र्यलढा नसता तरी ते मिळाले असते, असा भ्रम कोणीही बाळगू नये... सत्य असूनही आपल्याच पूर्वजांचे योगदान नाकारून ते इंग्रजाच्या पदरी टाकणे हा करंटेपणा आहे... त्यामुळे 'अंतू बर्वा' नावाच्या करुण कहाणीला त्याच्या पडक्या घरातच राहू द्या ! त्याची राख घेऊन आपल्या प्रेरणादायी इतिहासावर वैषम्याचा बोळा फिरवू नये, हीच विनंती...
जय हिंद !
'अंतू बर्वा' वाचण्यासाठी लिंक - http://cooldeepak.blogspot.in/2006/12/blog-post_3600.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा