शुक्रवार, १५ जुलै, २०१६

डॉक्टर झाकीरची 'तपासणी' !




सध्या डॉ. झाकीर नाईक चर्चेत आहे. ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी झालेल्या माठेफिरुंवर झाकीर नाईकच्या वक्तव्याचा प्रभाव होता हे जाहीर झाले, आणि झाकीर नाईकवर संशयाची सुई वळली. त्याबद्दल नेहमीप्रमाणे उलटसुलट टीका, बाचाबाची सगळे चालले आहे. मात्र झाकीर नाईकवर उथळ टीका करून काहीच साध्य होणार नाही. झाकीर नाईकच्या तत्त्वज्ञानाची किंवा विचारसरणीची चिकित्सा होणे गरजेचे आहे. तर या डॉक्टर झाकीरच्या 'तपासणी'चा हा एक प्रयत्न !

सुरुवात झाकीर नाईकच्या नुकत्याच झालेल्या स्काईप-प्रतिक्रियेचे विश्लेषण करू. (बघा - संदर्भ क्र.१) (झाकीर नाईकने भारतात येऊन प्रतिक्रिया देण्याची हिम्मत का दाखवली नाही हा अजून वेगळा मुद्दा आहे !) झाकीर नाईक बोलण्यात आणि पटवण्यात निष्णात माणूस आहे (कारण- रोजचा धंदा !)... त्याने आपल्या बचावासाठी दिलेल्या प्रतिक्रियेत एकीकडे दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केल्याचे दाखवले, आणि दुसरीकडे 'युद्धात' आत्मघाती हल्ला करणे 'धर्ममान्य' असल्याचे सांगितले आहे. दुसरे वाक्य जास्त महत्त्वाचे मानायला हवे. मुळात 'क्रुसेड' किंवा 'परधर्मियां'ना संपवण्यासाठी युद्ध ही संकल्पना झाकीर नाईकच्या वक्तव्यातून अधोरेखित होते. झाकीर नाईक शब्दांचे खेळ करण्यात असदुद्दिन ओवेसीपेक्षा निष्णात आहे. त्याने विरोध निवळावा म्हणून निषेधाचा सूर लावला, पण 'आत्मघाती हल्ल्यांच्या धर्मसंमती'चा उल्लेख करून आपल्या समर्थकांना सूचक संदेशही दिला आहे ! मुळात दहशतवादी करतात ते युद्ध आहे, आणि ते इस्लामसाठी आहे, इस्लामच्या शत्रूच्या विरुद्ध आहे; हे झाकीर नाईकचे मत आहे. ते तो उघड सांगताना शब्द फिरवून सांगतो. मागे लादेनविषयी तो असेच बोलला होता की, "लादेन इस्लामच्या शत्रूंना मारत असेल तर भारी आहे, बाकी मला काही विचारू नका !"... यात सरळ सरळ लादेनविषयी सह्नुभूती आहे. मात्र शब्द असे आहेत की पकडता येत नाही !! मुळात "सर्व जिहादी कारवायांचा आणि त्यांच्यामागे असलेल्या संघटनांचा मी निषेध करतो, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे." हे वाक्य अमेरिका,ज्यू,वगैरे नवे न उच्चारता झाकीर नाईक कधीच म्हणत नाही. इथेच सगळी गडबड आहे.

आता झाकीर नाईकच्या 'अमेरिकन षड्यंत्र' या दाव्याचा विचार करू. (जिहाद्यांच्या क्रौर्याचे समर्थन करण्यासाठी अमेरिका आणि ज्यू यांच्याकडे बोट दाखवणारा झाकीर नाईक हा काही एकटा नाही.) मुळात हे सर्वप्रथम मान्य आहे की अमेरिकेने जागतिक राजकारणात कैक पापे केली आहेत. अमेरिकेसारखे स्वार्थी धोरण दुसऱ्या कोणाचे नसेल. मात्र त्याचा अर्थ जिहादी करतात ती फक्त प्रतिक्रिया आहे असा घेणे हा मुर्खपणा होईल. अमेरिकेने अल कायदा आणि तालिबान पोसली. आयसीससुद्धा पोसली असे मानून चालूया. मात्र कुराण पाठ नाही, म्हणून गोळी घालण्याचे काम अमेरिका करते का ? काफिरांवर आणि आपल्याला न मानणाऱ्या मुस्लिमांवरदेखील आयसीस जे अत्याचार करते, त्याचे व्हिडिओ एकदा बघाच. कोणी पैसे दिले तरी असे क्रौर्य करायला माणूस तयार होणार नाही. त्यामुळे उन्मादाने, उत्साहाने बंदी बनवलेल्या माणसांच्या सामुहिक कत्तली बराक ओबामा करत नाहीत, आयसीसचे धर्मांधच करतात. लहान मुला-मुलींवर पाशवी अत्याचार ज्यू करत नाहीत, धर्माच्या नावाने पिसाट झालेले नराधमच ते करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा, की अमेरिकेने कितीही पैसा ओतला तरी आत्मघातकी हल्ले करायला माणसे प्रवृत्त करणे अमेरिकेला शक्य नाही. जगातला कितीही पैसा माणसाला स्वतःचा जीव सहज कुर्बान करायला प्रवृत्त करूच शकत नाही. त्यामुळे 'दहशतवादी निर्दोष,अमेरिकेचाच दोष' हा पराकोटीचा ढोंगी प्रचार आहे. जिहाद्यांना कुर्बानी द्यायला पैसा प्रवृत्त करत नाही ! जन्नत,तिथल्या 'सुखांच्या राशी' (!) आणि हे ठसवणारे पुस्तकी दाखले या गोष्टीच तरुण वयातील कसाबला आपले जीवन उद्ध्वस्त करून टाकायची प्रेरणा देतात. त्यामुळे अमेरिका आणि ज्यूंच्या नावावर खापर फोडून, छुपी क्लीन चीट देण्याचा झाकीर नाईक आणि इतरांचा प्रयत्न हा एक बदमाश डाव आहे.

आता झाकीर नाईकच्या धर्मप्रसाराकडे वळू. डॉ.झाकीर नाईक हा चांगला एम.बी.बी.एस. शिकलेला डॉक्टर आहे. त्याला 'तुलनात्मक धर्मअभ्यासा'चा (Comparative Religion) विद्वान मानले जाते. त्याच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ पाहिल्यास, तो किती जणांना कसा निरुत्तर करतो हे बघता येईल. अगदी श्री श्री रविशंकर यांना सुद्धा धर्मविषयक वादविवादामध्ये झाकीर नाईक भारी पडला आहे. परंतु असे का होते, या मागे फक्त झाकीरचा अभ्यास एवढेच कारण नाही. झाकीर नाईकशी वाद घालणारे त्याच्या तर्काला उत्तर देऊ शकत नाहीत कारण ...??? कारण झाकीर नाईक गृहीतकाच्या/मुलभूत तथ्याच्या पातळीवरच (A-priory Facts) आपल्या मुद्द्यावर ठाम असतो. तो उरलेली तार्किक चर्चा आपला मुद्दा बरोबर आहेच हे डोक्यात ठेऊन करतो, आणि मग समोरच्याला पटवण्यासाठी वाट्टेल ते शब्दच्छल करतो ! बऱ्याच मुस्लिमांच्या मनात झाकीर हा दुसऱ्या धर्माचा पराभव करणारा मसीहा अशी त्याची प्रतिमा आहे. त्याचबरोबर बिगरमुस्लीमांपैकी बरेचजण झाकीरच्या दाव्याचे खंडन करू शकत नाहीत. त्यामुळे झाकीरच्या या प्रकारच्या परधर्मविजयाची पोलखोल करणे गरजेचे आहे. यासाठी उदाहरण म्हणून झाकीरचे हिंदू धर्मावरील मत विचारात घेऊ.(बघा - संदर्भ क्र.२) झाकीर नाईक दोन गोष्टी मांडतो. पहिली अशी की, हिंदू धर्मात इस्लामच्या गोष्टींचा स्वीकार आहे (त्याचा मूळ तर्क असा इस्लाम हेच सर्व धर्मांचे प्रगत आणि सर्वोत्तम स्वरूप आहे) आणि दुसरी अशी की हिंदू लोकच हिंदू धर्माप्रमाणे वागत नाहीत. यामुळे त्याला धर्मांतराचे अपील करणे सोपे जाते...! यासाठी झाकीर नाईक 'न तस्य प्रतिमा अस्ति' या वेदवाक्याचा उच्चार करतो. तो मूर्तीपूजा 'हराम' हे दाखवण्यासाठी म्हणतो की, "बघा बघा,वेदच म्हणतात की देवाची प्रतिमा/मूर्त स्वरूप नाही." बरेच लोक वेदांचा अभ्यास नसल्यामुळे म्हणा किंवा प्रतिवादाची क्षमता नसल्यामुळे म्हणा, याचे खंडन करू शकत नाहीत. खरेतर, 'न तस्य प्रतिमा अस्ति' हा वेद आणि एकंदरच सनातन हिंदू धर्मातील ईश्वराच्या स्वरुपासंबंधीच्या चर्चेचा एक मुद्दा आहे. ते अंतिम वाक्य नाही. हिंदू धर्म निश्चितच मोठ्या प्रमाणात, एकेश्वरवादी आहे; पण मूर्तीपूजेचा विरोधक नाही. गीतेतील तत्त्वज्ञानानुसार एका ईश्वराची वेगवेगळे लोक वेगवेगळ्या स्वरुपात पूजा करतात हे स्पष्ट आहे. इथे थोडेसे हिंदूधर्मियांसाठी - खरेतर, वेद समजण्यास कठीण असल्यामुळे, ज्याला हिंदू धर्म खरंच श्रद्धापूर्वक अभ्यासायचा आहे, त्याने महाभारताचा अभ्यास करावा. कारण वेदव्यासांच्या म्हणण्यानुसार - चार वेद, अठरा पुराणे(या सर्वांचे विस्तारकर्ते/लेखक महर्षी व्यासच आहेत हे लक्षात घ्या), यांच्यापेक्षा महाभारताचे महत्त्व जास्त आहे. महाभारत या शब्दातील 'महा' हे विशेषण याच अर्थाने आले आहे. महाभारतात गीताकथन व अन्य प्रसंगी 'न तस्य प्रतिमा अस्ति'चे भरपूर विश्लेषण आहे. परंतु 'न तस्य प्रतिमा अस्ति' या वाक्याचा फक्त आपल्याला हवा तो संकुचित अर्थ लावून झाकीर नाईक लबाडी करतो. त्यात तो ३३ कोटी देव वगैरे म्हणून चेष्टासुद्धा करतो. मुळात कोटि याचा योग्य अर्थ 'प्रकार' असा आहे. बऱ्याचदा अभ्यास नसल्यामुळे अनेक लोक ३३ करोड असा घेतात. मात्र झाकीर नाईकचा अभ्यास नाही, असे असणे शक्य नाही. तरीही तो असे करतो, याचा अर्थ तो लबाड आहे. त्याच्या धर्मप्रसारासाठी तो वैचारिकदृष्ट्या कितीही खालची पातळीला जाऊ शकतो याचे हे अस्सल उदाहरण आहे. त्यामुळे झाकीर नाईक इतर धर्मांचा वैचारिक पराभव वगैरे करतो हा भ्रम ज्यांनी कोणी बाळगला असेल तो सोडून द्यावा !

आता राहिला मुद्दा झाकीर नाईकच्या 'पीस'चा !! झाकीर शांतीदूत आहे हे दिग्विजय सिंगांचे ठाम मत अजूनही आहे. (आता दिग्विजय यांचे असे मत म्हणजे झाकीर नाईक कितपत शांतीवादी असणार हे शहाण्यास सांगणे न लगे !!) झाकीरला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की सौदीसारख्या देशात म्हणजे जिथे शरिया लागू आहे तिथे मंदिर किंवा चारच बांधायला परवानगी का नाही... त्यावर झाकीर नाईक हा 'शांतीदूत' असे म्हणतो की, "इतर धर्म २+२ =३ असे शिकवतात हे मुस्लिमांना माहित आहे. त्यामुळे २+२=३ अशी शिकवण मुस्लीम अमान्य करतात त्यात गैर काय ??" (बघा - संदर्भ क्र.३) पण मुस्लीम जिथे अल्पसंख्य आहेत तिथे मात्र मस्जिदी बांधू नाही दिल्या तर झाकीर आकांडतांडव करतो. बाबरी मस्जिद 'शहीद' झाली म्हणून झाकीरने काय काय वक्तव्ये केली आहेत ती लक्षात घेता; झाकीरची दुटप्पी भूमिका ध्यानात येईल. मात्र यावर 'शांतीदूत' झाकीर नाईक असे सांगतील की, "दार-उल-हरब मध्ये कसे राहावे आणि दार-उल-इस्लाम मध्ये कसे राहावे हे अल्लातालाने सांगितले आहे - कुराण, आयत नंबर अमुक, ओळ नंबर तमुक !!"...

त्यामुळे डॉ. झाकीर नाईकची शांती ही वास्तवात दार-उल-हरब (म्हणजे इस्लामच्या ताब्यात/कायद्याखाली नसलेला प्रदेश) मध्ये वागण्याची कूटनीती आहे. समजा आपला देश उद्या दार-उल-इस्लाम झाला, तरच या 'शांतीदूता'चे खरे रूप आपल्याला पाहायला मिळणे शक्य आहे ! तसे झाले तर 'कुराण : आयत नंबर --,ओळ नंबर --' असे संदर्भ देऊन झाकीर नाईक कसले आदेश देईल त्याची फक्त कल्पनाच केलेली बरी !!