मंगळवार, ३ मे, २०१६

पर्यावरणशिक्षणाची पुढची इयत्ता : कार्बन

आजकाल पर्यावरणाविषयी जागृती वाढीस लागली आहे. ती पुरेशी नसली, तरी किमान सुशिक्षित लोक तरी 'कार्बन म्हणजे वाईट्ट बाबा !' एवढं शिकले आहेत ! पर्यावरणासमोर 'तापमानवाढीचे' संकट आ वासून उभे असताना, हा समज (अर्धवट गैरसमज असला तरी) उपकारकच आहे.... पर्यावरणाबद्दल पोटतिडकीने जनजागृती करणाऱ्या प्रामाणिक (आणि काही अप्रामाणिक !) कार्यकर्त्यांचे हे यश आहे... मात्र 'कार्बन डायऑक्साईड वाईट' या अर्धवट ज्ञानापलीकडे आपण सरकायला हवेच ना ? पण सध्या दिवस तापमानवाढीचे असल्याने कोणीच या कडे लक्ष देत नाही. ज्यांना सत्य माहित आहे, तेसुद्धा बाकीच्यांचे 'अज्ञान' किंवा अर्धज्ञान हे तात्कालिक उपयुक्त असल्याने दुर्लक्ष करतात !!
पण 'अज्ञानात सुख असते' हे प्रचंड उपयोग केले जाणारे वाक्य योग्य आहे का ? याबद्दल इथे जरा थांबून विचार करू ! खरंतर तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हे एक असत्य विधान आहे...! अज्ञानात जे वाटते ते सुख नसून सुखाचे आभास असतात !! काही लास्ट स्टेजच्या मेडिकल केस वगळता आरोग्याच्या बाबतीतसुद्धा अज्ञानात सुख मानणे वाईटच...
आता पुन्हा आपल्या 'कार्बन' कडे वळू. कार्बनमुळे तापमानवाढ होते आहे, त्यामुळे सध्या कार्बन उत्सर्जन कमी करावे, हे तुम्हाला माहितच आहे आणि ते अगदी अचूक आहे... पण आता थोडी पुढची इयत्ता शिकू ! मग आपल्याला कळेल की असं काही घाऊक वाईट नसतं, घातक असतो तो बिघडलेला समतोल !
कार्बनडायऑक्साईड हा हरित गृह परिणाम म्हणजे सूर्याची पृथ्वीपर्यंत पोचणारी उष्णताउर्जा (काही प्रमाणात) पृथ्वीच्या वातावरणात कोंडून किंवा धरून ठेवत असतो... त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढण्यास मदत होते... जर कार्बनडायऑक्साईड प्रमाणाबाहेर वाढला तर नक्कीच ध्रुवांवरील बर्फ वितळून जगबुडी होईल... पण तो नसलाच तर ? हीच खरी गंमत आहे ! कार्बनडायऑक्साईड आणि त्याचे साथीदार 'हरितगृह' परिणाम करणारे वायू जर पूर्ण संपलेच तर पृथ्वी बर्फाचा गोळा बनेल ! ही थंडी गुलाबी वगैरे काही नसेल, तर सरळ सरळ पृथ्वीवरील जीवन संपवून टाकणारी असेल !! जर कल्पनाच करायची असेल तर आकाशातील अनेक ग्रह बघता येतील जे बर्फाळ आहेत... पण एवढं दूर जायची गरज नाही. आपल्या पृथ्वीनेसुद्धा 'हिमयुग' सोसले आहेच की... वातावरणातील कार्बन कमी झाला, त्यामुळे तापमान घसरले आणि पृथ्वी जवळपास उजाड झाली होती ! (मात्र काही जटील भूगर्भीय किंवा अवकाशीय घटनांमुळे पुन्हा आपण 'कार्बन'ला शिव्या घालायला जिवंत आहोत आज !!) ...
हरितगृह परिणाम
यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे कि 'हरितगृह' परिणाम हा पृथ्वीवर जीवन असण्याचे महत्त्वाचे कारण आहे ! हवेतील कार्बनशिवाय आपण या ग्रहावर टिकूच शकत नाही !
पण मग कार्बन सरसकट घातक नाही हे कळल्यावर प्रश्न पडतो की मग नक्की घातक काय ? घातक आहे ते पर्यावरणाचे असंतुलन !! प्रमाणाच्या अधिक मात्रेत, तोही मानवी चुका आणि अपराधांमुळे वाढलेला वातावरणातील कार्बन हे असंतुलनाचे उदाहरण आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत आपला कार्बन उत्सर्ग कमी करून शाश्वत विकासाची कास धरायलाच हवी...
मग हा लेख का ? तो अशासाठी की बेरीज शिकलो की आजच्या सामान्य आयुष्यात बरेच हिशोब सुटतात, म्हणून भागाकार शिकायचाच नाही का ?? थोडक्यात काय तात्कालिक सोयीचे आहे म्हणून अर्धवट ज्ञान किंवा अज्ञान हे हितकारी आहे असे मुळीच नाही.... त्यामुळे पर्यावरणाबाबत जास्तीत जास्त शिका आणि डोळसपणे पर्यावरणरक्षणाचे प्रयत्न करा ! आणि यापुढे शिव्याशाप बिचाऱ्या (!) कार्बनला नको, द्यायचेच असतील तर असंतुलनाला द्या !!

हा लेख अत्यंत प्राथमिक पातळीवर या विषयाला समजवण्यासाठी लिहिला गेलेला आहे. ज्यांना अधिक रुची असेल त्यांच्यासाठी काही संदर्भ-लिंक्स -
१. http://www.captage-stockage-valorisation-co2.fr/en/faq_en/2375
२. श्री.राजीव साने यांचा याविषयासंबंधित असलेला लेख - http://rajeevsane.blogspot.in/2016/03/blog-post_36.html
३. http://www.skepticalscience.com/What-would-a-CO2-free-atmosphere-look-like.html
४. http://www.nasa.gov/topics/earth/features/co2-temperature.html