शुक्रवार, १८ मार्च, २०१६

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०१६ - माझे विश्लेषण !


सर्वप्रथम 'शेतकरी-केंद्रित' अर्थसंकल्प सादर करून समयोचित वृत्ती दाखवल्याबद्दल राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन ! शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता २५,००० हजार कोटी योग्य रक्कम आहे... महत्त्वाचे म्हणजे ही रक्कम पीकविमा, जलयुक्त शिवार आणि पशुसंवर्धन यांसारख्या शेतीपूरक पायाभूत सुविधांसाठी राखून ठेवली गेल्याचा आनंद आहे. नाहीतर खिरापती वाटून लोकप्रियता कमावणे अवघड नसते... ते न केल्याचे पाहून मुख्यमंत्री आणि त्यांची टीम त्यांच्या 'शाश्वत शेतीविकासाच्या' धोरणांबद्दल गंभीर आहे हे जाणवले...
त्याचबरोबर यातील काही भावणाऱ्या तरतुदी अशा-
१.‘नमामी गंगा’ योजनेच्या पार्श्वभूमीवर ‘नमामी चंद्रभागा’ योजना
२.रस्त्यांच्या दुपदरीकरण आणि चौपदरीकरणासाठी तसेच राज्यातील महामार्गांवर स्वच्छतागृहे बांधण्यासाठी भरघोस तरतूद
३.प्रत्येक जिल्ह्यात सक्षम हवामान केंद्र
४. 'दीनदयाळ उपाध्याय कृषी मार्गदर्शन योजना’
आता या अर्थसंकल्पात असायला हव्या होत्या अशा काही गोष्टी -
१. अर्थसंकल्प शेती-प्रधान असला म्हणून तो डिजिटल जगापासून दूर जाणारा हवाच असे काही नाही... या अर्थसंकल्पात 'डिजिटल' आणि 'ई' सुविधा तितक्याशा जाहीर झालेल्या नाहीत.
२. प्रशासनाच्या कार्यक्षमतेतील सुधारणा आणि भ्रष्टाचाराला चाप लावणाऱ्या कल्पना या अर्थसंकल्पात फारशा नाहीत.
३. या अर्थसंकल्पाला काहीसं विस्कळीत रूप आलं आहे. अरुण जेटली यांच्याप्रमाणे ठळक मुद्द्यांभोवती गुंफलेला अर्थसंकल्प सुधीर मुनगंटीवार यांना साधलेला नाही.
तरी एकंदरीत पाहता, राज्याची दुष्काळी स्थिती आणि आपल्या पक्षाची राजकीय गरज हे दोन्ही साध्य करण्याचा सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तम प्रयत्न केला आहे हे निश्चित !