रविवार, १० एप्रिल, २०१६

धन असलेले 'ऋण' !

कर्जाकडे बघण्याचा पारंपारिक भारतीय (किंवा मराठी म्हणा) दृष्टीकोन हा अत्यंत विचित्र आहे. खालील संवाद पहा -
मी एका लघुउद्योग करणाऱ्या माणसाला : तू 'मुद्रा' कर्ज का नाही घेत ? स्वस्त आहे आणि काही हमी/तारण लागत नाही...
तो लघुउद्योजक : मला नकोय...
मी : पण का तुला धंद्यामध्ये वाढ करता येईल ? तुला जास्त पैसे मिळवायचे नाहीत का ?
तो लघुउद्योजक : मला धंदा वाढवायचा आहे... पण माझ्या पैशाने ! मला माझ्या डोक्यावर एका पैश्याचे सुद्धा कर्ज नकोय !!

आता यावर काय बोलणार ?
ऋण (म्हणजे कर्ज) हे अगदीच ऋण (म्हणजे नकारात्मक/वाईट) नसते !
सगळे जग जेव्हा फायनान्सचा उत्तम मार्ग म्हणून कर्जाकडे बघत आहे तेव्हा आपण सर्वांनी या असल्या आर्थिक अंधश्रद्धेतून बाहेर यायला हवे. दुर्दैवाने या कामासाठी कोणतीही अंधश्रद्धा निर्मुलन समिती नाही... !
सोप्या भाषेत सांगायचे तर कर्ज(Debt) हा एक स्थिर आधार देणारा आणि तुमची कार्यक्षमता सतत तपासत राहणारा निधी-स्त्रोत आहे ! जोपर्यंत कर्जाच्या व्याजदरापेक्षा तुमचा धंदा जास्त परतावा कमावतो आहे तो पर्यंत कर्ज हा शाप नसून वरदान आहे ! कारण तुम्ही जास्त परतावा मिळवलात तरी कर्जावर ठरलेला व्याजदर कायम असतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या धंद्याच्या कार्यक्षमतेवर (Efficiency)वर भरवसा असेल तर स्वतःचे पैसे लावण्यापेक्षा स्वस्त आणि सहज मिळणारे कर्ज तुम्हाला जास्त लाभदायक ठरेल. त्यामुळे आपल्या कार्यक्षमतेवर नसलेला विश्वास हासुद्धा काही जणांच्या कर्ज-तिटकाऱ्याचे कारण असते !
बाकी राहिली गोष्ट 'मला माझ्या डोक्यावर एका पैश्याचे सुद्धा कर्ज नकोय !!' या वृथा स्वाभिमानाची... आजचे सर्व उद्योगपती हे कर्जाशिवाय मोठे होऊच शकले नसते ! त्यामुळे 'कर्ज नको' हा हेका फक्त गरिबी आणि अकार्यक्षमतेचा मदतनीस आहे; त्यामध्ये स्वाभिमान मानण्यासारखे काहीही नाही... बाकी 'मल्ल्या' पळाल्यापासून तर लोकांचा 'कर्ज-द्वेष' वाढलाच आहे ! पण हे बरोबर नाही... मल्ल्याची अधोगती कर्जामुळे नव्हे तर अव्यवस्थित व्यवस्थापन आणि अचाट वैयक्तिक लालसा/उद्दिष्टे यांच्यामुळे झाली आहे.
त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला पुढे न्यायचे असेल तर सामान्यांनी कर्जाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा आणि 'कर्ज वाईटच' या अंधश्रद्धेचे निर्मुलन करायला हवे. आपण सर्वांनी कर्जाकडे निव्वळ धोका (risk) आणि ओझे (burden) म्हणून न बघता एक संधी(opportunity) म्हणून बघायला शिकणे हे आर्थिक विकास आणि वृद्धी दोहोंच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे !

सोमवार, ४ एप्रिल, २०१६

मूलनिवासी-शूर्पणखावाद्यांची अजब शनिभक्ती !


   सध्या शनिशिंगणापूर मधील मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी भूमाता ब्रिगेडचे आंदोलन चर्चेत आहे. भूमाता ब्रिगेड आणि तिच्या सहकारी संघटना आता सर्व देवळांवर आंदोलनाचा रोख ठेवून आहेत. स्त्री-वादी चळवळ असे नाव धारण केलेली ही आंदोलने नक्की कोणत्या उद्देशाने केली जात आहेत याचा सर्वसामान्यांना पत्ता लागू दिला जात नाही. त्यामुळे सदर आंदोलनांच्या मागील छुपे उद्देश उलगडण्याचा हा एक प्रयत्न !
   इथे सर्वप्रथम हे सांगून टाकतो की महिलांना प्रवेश नाकारणे आणि त्यासाठी फालतू कारणे सांगणे (जसे शनिग्रहाच्या लहरी स्त्रियांना बाधक ठरतात इ.) हा महामूर्खपणा आहे. हिंदू धर्माची परंपरा सनातन आहे. जगातील बहुधा सर्वात जुन्या धर्मांपैकी आपला हिंदू धर्म आहे. तो इतकी वर्ष टिकून आहे याचे कारण हेच की आपल्या धर्मात जेव्हा जेव्हा विषमता किंवा पाखंड शिरले तेव्हा तेव्हा प्रबोधन करणाऱ्या महापुरुषांनी आपला धर्म सावरला, सुधारला आणि पुढे नेला. आपणसुद्धा त्या महान परंपरेचे पाईक म्हणवत असू तर आपणही डोळस विचारांनी धर्मसुधारणा मान्य करायलाच हव्यात. यासाठी धर्माचाच दाखला द्यायचा तर, भगवान श्रीकृष्णांचा पुढील उपदेश चपखल आहे - "धर्म हा कधीही दगडावरच्या रेषेप्रमाणे स्थायी नसतो. श्रुती,स्मृती,पुराणे हे सर्व धर्माला आधार देतात. पण नेहमीच पुस्तकी नियम धर्म असतातच असे नाही. धर्म हा धार्मिकांचा व्यवहार आहे." धर्म या शब्दाची ही व्याख्या 'रिलीजन' पेक्षा वेगळी आहे, आणि हेच आपल्या हिंदूधर्माचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनीही पोथीवादी गाढवपणा सोडून खऱ्या धार्मिक व्यवहाराची वाट धरायला हवी. काहीतरी भंपक कारणे सांगून स्त्रियांना प्रवेश नाकारणे हे वर्तन श्रीकृष्णांच्या आणि चाणक्याच्या 'धर्म' या व्याख्येत बसत नाही. त्यामुळे स्त्रियांना पुरुषांच्याबरोबरीने वागणूक ही मिळायलाच हवी.
   मात्र भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनात 'हिंदू धर्म' सुधारणेचा उद्देश आहे का ? फक्त स्त्री हक्क चळवळ हा हेतू आहे का ? जरा सविस्तर विचार करू. भूमाता ब्रिगेड ही संभाजी ब्रिगेडची महिला विंग आहे. ही माहिती कळल्याबरोबर अनेकांना सत्याचा वास येऊ लागला असेल ! भूमाता ब्रिगेडची विचारसरणी उघड उघड हिंदू-धर्म द्वेष्टी आहे. संभाजी ब्रिगेड ही मुळातच जहाल डावी आणि हिंदू धर्म विरोधी संघटना आहे. त्यांची विचारसरणी हिंदू पुराणे मानत नाही, पण हिंदू पुराणातील राक्षस आणि राक्षसींच्या अस्तित्त्वाला मान्य करते...! त्यामुळे त्यांच्या मते शूर्पणखा ही मूलनिवासी स्त्रीसत्ताक पुढारी होती, आणि राम आणि लक्ष्मण नावाच्या उपऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केले !! त्याचबरोबर नरकासुर, हिरण्यकश्यपू,महिषासुर हे सर्व असुर या डाव्या लोकांना जाम आवडतात.(त्यामुळेच की काय कोण जाणे, बऱ्याचदा या असुरांचे गुण या लोकांच्यात बघायला मिळतात !!) आता असे असताना भूमाता ब्रिगेड आपल्या आदर्शांना(म्हणजे राक्षसांना) मारणाऱ्या (उपऱ्या आर्यांच्या) देवांचे दर्शन थेट गाभाऱ्यात शिरून घेण्यासाठी एवढी उतावीळ का आहे बरे ? त्यांच्या 'लीडर' श्रीमती तृप्ती देसाई ज्या आक्रमकपणे आपली देव दर्शनाची आस व्यक्त करत आहेत, त्यावरून त्यांच्या विचारसरणीशी विसंगत वर्तन दिसून येते. एकीकडे ज्या देवालाच मानायचे नाही, त्या देवाच्या दर्शनासाठी लाठ्या का खायच्या ? जर तुम्ही निधर्मी आहात, नास्तिक आहात किंवा सैतानाचे पुजारी आहात मग शनिमंदिराच्या चौथऱ्यावर शिरण्याचे आपले प्रयोजन काय ? ज्याला दारू प्यायची नाही, तो बिअर बार मध्ये का जाईल ?
   इथेच खरी गडबड आहे ! या आंदोलनाचा हेतू दिसतो तितका साधा नसून हिणकस आहे. त्याला साथ देणारे डावे विचारवंत अचानक हिंदू धर्माचे गोडवे गायला लागतात आणि संघ-भाजपा स्त्रियांवर अन्याय करणारे असल्याची राळ उठवतात. या मागे सरळ सरळ उद्देश असा की मोदींच्या लाटेत वाहून गेलेली आपली प्रतिष्ठा कशीही करून मिळवायची. आपल्या छुप्या उद्देशांसाठी वाट्टेल तितकी ढोंगे करायची आणि नाव मात्र स्त्री-मुक्ती चळवळीचे पुढे आणायचे... आपले साथीदार ( भूमाता आणि संभाजी ब्रिगेडचे तर जन्मदाते 'साहेब') सत्तेत असताना ना शिंगणापूर दिसत होते ना त्र्यंबकेश्वर दिसत होते ! पण आताचे हिंदुत्ववादी सरकार डोळ्यात खुपते आहे, त्यामुळे स्वस्त आणि सवंग मार्गांचा वापर करून सरकारची शक्य तितकी बदनामी कशी करता येईल आणि आपली तुंबडी कशी भरता येईल असा व्यवहार सध्या ब्रिगेडी(यांना बी-ग्रेडी हे जास्त शोभते नाही का ?) आणि त्यांचे मामू-चाचू असलेले डावे करत आहेत... यांना हिंदू धर्माच्या विरोधात बोलले तर जनाधार मिळत नाही हे समजले असावे. म्हणून मग आता आपली विचारसरणी खिशात ठेवून तोंडावर 'मूलनिवासी+हिंदू' असले कॉम्बिनेशन ठेवायचे असा धंदा फुरोगामी लोक्स करत आहेत ! थोडक्यात 'मुह में शनि, बगल में शूर्पणखा' !!
   आता हे सर्व समजून घेतल्यावर ब्रिगेडी आणि डाव्यांचे 'स्त्री-वादी' आणि 'धर्म-सुधारणा-वादी' असल्याचे दावे किती बेगडी आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे या सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणाऱ्या लोकांच्या डाव्यांवर विश्वास ठेवणे किती धोक्याचे आहे हे महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने लक्षात घ्यावे. बाकी फुरोगाम्यांची नौटंकी चालूच राहील, कारण शेवटी तोच त्यांच्या पोटा-पाण्याचा धंदा आहे !! आपण मात्र या बदमाश लफग्यांचे गिऱ्हाईक बनू नये, हीच अपेक्षा....