रविवार, १० एप्रिल, २०१६

धन असलेले 'ऋण' !

कर्जाकडे बघण्याचा पारंपारिक भारतीय (किंवा मराठी म्हणा) दृष्टीकोन हा अत्यंत विचित्र आहे. खालील संवाद पहा -
मी एका लघुउद्योग करणाऱ्या माणसाला : तू 'मुद्रा' कर्ज का नाही घेत ? स्वस्त आहे आणि काही हमी/तारण लागत नाही...
तो लघुउद्योजक : मला नकोय...
मी : पण का तुला धंद्यामध्ये वाढ करता येईल ? तुला जास्त पैसे मिळवायचे नाहीत का ?
तो लघुउद्योजक : मला धंदा वाढवायचा आहे... पण माझ्या पैशाने ! मला माझ्या डोक्यावर एका पैश्याचे सुद्धा कर्ज नकोय !!

आता यावर काय बोलणार ?
ऋण (म्हणजे कर्ज) हे अगदीच ऋण (म्हणजे नकारात्मक/वाईट) नसते !
सगळे जग जेव्हा फायनान्सचा उत्तम मार्ग म्हणून कर्जाकडे बघत आहे तेव्हा आपण सर्वांनी या असल्या आर्थिक अंधश्रद्धेतून बाहेर यायला हवे. दुर्दैवाने या कामासाठी कोणतीही अंधश्रद्धा निर्मुलन समिती नाही... !
सोप्या भाषेत सांगायचे तर कर्ज(Debt) हा एक स्थिर आधार देणारा आणि तुमची कार्यक्षमता सतत तपासत राहणारा निधी-स्त्रोत आहे ! जोपर्यंत कर्जाच्या व्याजदरापेक्षा तुमचा धंदा जास्त परतावा कमावतो आहे तो पर्यंत कर्ज हा शाप नसून वरदान आहे ! कारण तुम्ही जास्त परतावा मिळवलात तरी कर्जावर ठरलेला व्याजदर कायम असतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या धंद्याच्या कार्यक्षमतेवर (Efficiency)वर भरवसा असेल तर स्वतःचे पैसे लावण्यापेक्षा स्वस्त आणि सहज मिळणारे कर्ज तुम्हाला जास्त लाभदायक ठरेल. त्यामुळे आपल्या कार्यक्षमतेवर नसलेला विश्वास हासुद्धा काही जणांच्या कर्ज-तिटकाऱ्याचे कारण असते !
बाकी राहिली गोष्ट 'मला माझ्या डोक्यावर एका पैश्याचे सुद्धा कर्ज नकोय !!' या वृथा स्वाभिमानाची... आजचे सर्व उद्योगपती हे कर्जाशिवाय मोठे होऊच शकले नसते ! त्यामुळे 'कर्ज नको' हा हेका फक्त गरिबी आणि अकार्यक्षमतेचा मदतनीस आहे; त्यामध्ये स्वाभिमान मानण्यासारखे काहीही नाही... बाकी 'मल्ल्या' पळाल्यापासून तर लोकांचा 'कर्ज-द्वेष' वाढलाच आहे ! पण हे बरोबर नाही... मल्ल्याची अधोगती कर्जामुळे नव्हे तर अव्यवस्थित व्यवस्थापन आणि अचाट वैयक्तिक लालसा/उद्दिष्टे यांच्यामुळे झाली आहे.
त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला पुढे न्यायचे असेल तर सामान्यांनी कर्जाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा आणि 'कर्ज वाईटच' या अंधश्रद्धेचे निर्मुलन करायला हवे. आपण सर्वांनी कर्जाकडे निव्वळ धोका (risk) आणि ओझे (burden) म्हणून न बघता एक संधी(opportunity) म्हणून बघायला शिकणे हे आर्थिक विकास आणि वृद्धी दोहोंच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे !

२ टिप्पण्या:

  1. उत्पादक गुंतवणुकीसाठी कर्ज चांगलेच कारण नफ्याचा दर व्याजदरापेक्षा सामन्यतः जास्त असतो. पण खर्चाच्या बाबीसाठी कर्ज काढणे धोक्याचे असते

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. करेक्ट ! थोडक्यात जर धंदा/व्यवसायात गुंतवण्यासाठी कर्ज वापरले तर अमृत् ! फक्त स्वतःच्या चैनीसाठी वापरले तर विष....

      हटवा