मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

जोकरच्या अंतरंगी....

The Joker !
बॅटमॅनच्या कथेमधला सुप्रसिद्ध व्हिलन...
ख्रिस्तोफर नोलानच्या डार्क नाईट मधील अत्यंत विलक्षण पात्र...
हेथ लेजरच्या अजरामर अभिनयाने बॅटमॅन-फॅन्सच्या मनावर कायमची कोरली गेलेली व्यक्तिरेखा म्हणजे जोकर...



जोकर हा सुडाने पछाडलेला किंवा पैशांसाठी हपापलेला नाही. त्याला जगाच्या सत्तेचा मोह नाही किंवा जगावर कब्जा गाजवण्याची आसुरी इच्छा सुद्धा नाही. जोकर म्हणूनच वेगळा आहे !
जोकर कडे कोणत्याही सुपर पॉवर्स नाहीत. बॅटमॅनने ठरवलं तर एक दोन फटक्यांत जोकरला लोळवू शकतो 
पण तरीही बॅटमॅनला सर्वाधिक छळणाऱ्या आणि मानसिक-नैतिक पातळ्यांवर नामोहरम करण्याचा मान जोकरलाच जातो !!


जोकर हा नुसताच एक क्रूर व्हिलन नाही. जोकरला भेसूर, भयानक बनवणारी आहे ती त्यांची 'फिलॉसफी'- त्याचं तत्त्वज्ञान-त्याची माणसांच्या जगाबद्दलची खोल समज !!
जोकर स्वतःला विनाशाचा दूत म्हणवतो- Agent of Chaos !!


जोकरचा बाप दारूडा होता. घरी येऊन त्याच्या आईला मारहाण करायचा. एक दिवस अशाच नशेमध्ये अंध होऊन त्याच्या बापाने लहानग्या जोकरच्या घाबरलेल्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचं म्हणून चाकूने त्याचा जबडा चिरून, त्याचा चेहऱ्यावर कायमच हास्य निर्माण केलेलं असतं ! जोकरने त्यानंतर अपेक्षेप्रमाणेच गुन्हेगारी जगताकडे धाव घेतली, तिथे तो प्रचंड यशस्वी झाला, पण त्या सगळय़ात तसं मन रमेना....

मग त्याला भेटला बॅटमॅन !
बॅटमॅन मुळे जोकरला जणू जगण्याचा सूर सापडला....
बॅटमॅन हा कायद्याच्या बंधनात न राहणारा- पण न्यायासाठी- सत्यासाठी- चांगल्यासाठी झटणारा हिरो आहे.
त्याचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे "कोणाचीही हेतुपुरस्सर हत्या करायची नाही" ! If you kill a killer, the total count remains same !! त्याच्या व्हिलन्सनाही तो जीवानिशी न मारता, बहुतांशी कैद करून ठेवतो. 

याचं कारण म्हणजे बॅटमॅनने आपल्या ध्येयासाठी कायद्याची बंधने झुगारत असताना - स्वतःवर एक 'नैतिक कुंपण' लादून घेतलेले असते.  बाकीच्या त्याच्या कायद्या बाहेरच्या धंद्यामध्येही त्याला 'हिरो' ठेवणारी बाब म्हणजे - त्याची त्याच्या तत्त्वांवरची निष्ठा ! त्यामुळे No Kill चा बॅटमॅनच्या अजेय, पोलादी नैतिकतेचं प्रतीक आहे ! 

जोकरला बॅटमॅन म्हणूनच इंटरेस्टिंग वाटू लागतो ! त्याला बॅटमॅनबद्दल मुळीच द्वेष नसतो. उलट तो बॅटमॅनला आपल्यासारखाच - 'दुनियेतून वेगला मानत असतो ! पण बॅटमॅनच्या जगाबद्दलच्या सकारात्मक दृष्टीकोनाची त्याला गंमत वाटत असते. बॅटमॅनला त्याच्या 'सो कॉल्ड' उच्च नैतिकतेची- जीवनध्येयांची - अढळ तत्त्वांची 'लायकी दाखवून' देणे हा जोकरचा आवडता छंद बनतो ! जोकर पिसाट असतोच. त्यामुळे बॅटमॅनला असा 'काळा वारस दखवण्यासाठी तो एकाहून एक क्रूर अपराध करत सुटतो... अशावेळी जोकर बऱ्याचदा हसत असतो ! पण तो गब्बरसारखा मदांध होऊन हसत नसून, माणसांच्या एकूणच दुःखांवर, वेदनांवर, जगण्यासाठी चाललेल्या केविलवाण्या धडपडीवर हसत असतो !!
 
जोकर बॅटमॅनसमोर दोन पर्याय ठेवतो - एकतर त्याला जीवानिशी मारून बॅटमॅनने स्वतःचा नियम - स्वतःचं Psychological Frontier मोडून टाकावं आणि स्वतःची हार मान्य करावी...  
किंवा त्याला न मारता बॅटमॅनने त्याच्या जवळची माणसं मरताना-रडताना-वेडी होताना बघत बसावं !
अशा प्रकारे जोकर बॅटमॅनला थेट त्याच्या मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात 'गाठतो' ! त्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, तो बॅटमॅनला वेदनादायक पेचात टाकतो. त्यामुळे जोकर आणि बॅटमॅन हे फक्त हिरो आणि व्हिलन न राहता मानवी मनाच्या दोन छटा होऊन बसतात...

वास्तविक बॅटमॅन आणि जोकर दोघांच्याही आयुष्यात बऱ्याच ठिकाणी साधर्म्य आहे. बालपणी बसलेले चटके दोघांनीही झेलले आहेत. दोघांकडेही अफाट मानसिक क्षमता आहेत, हुशारी आहे, पिसाटपणा आहे ! दोघेही निःस्वार्थी आहेत. दोघांनीही जगाच्या काळ्या बाजू बघितल्या आहेत. दोघांच्या भूमिका मात्र भिन्न आहेत. परिस्थितीचं नाणं बऱ्यापैकी सारखं उडवलं तरी येणारे outcomes हे व्यक्तीच्या choice नुसार भिन्न असतात... बॅटमॅन आणि जोकर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जोकर बॅटमॅनला- हे जग आशा ठेवण्याच्या लायकीचा नाहीये -हे पटवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या भयानक कृत्यांसमोर आपल्या तत्त्वांना  वाचवत, जगासाठी धडपडणाऱ्या बॅटमॅनवर तो खदाखदा हसत राहतो.

जोकर मला कोणत्याही हॉरर पात्रापेक्षा, भूत-प्रेताच्या कहाणीपेक्षा भयानक वाटतो. कारण जोकर बोलतो ते असत्य नसतं ! या जगाची भेसूर-काळी बाजू जोकर उघडपणे मांडत असतो. त्यातून तो आपल्या चांगुलपणाच्या मूळांवरच हल्ला चढवतो. मग त्याच्या भेसूर सत्याच्या जाणिवेतून येते ती विलक्षण खिन्नता !  म्हणूनच तो भयानक वाटतो !! हॉररमधली भुतं फारतर स्वप्नात येऊन दचकवतील. पण जोकर जागेपणी दचकवतो-हलवतो-मानसिक खळबळ माजवतो. 

जोकर म्हणतो की "हे सुसंस्कृतपणाचे मुखवटे ओढलेले लोक त्यांचे हितसंबंध जपणारी व्यवस्था संकटात आली की क्षणार्धात रानटी पशु बनायला ही कमी करणार नाहीत !"... त्याच्या म्हणण्यानुसार- "लोक त्यांना परवडेल इतकंच चांगलं वागतात"... त्याच्यासमोर आलेल्या कोणत्याही नीतीमान-विचारी-देवमाणसाला तो शैतान बनवू शकतो... कारण ? कारण - "Madness is like gravity..."
  


त्या चित्रपटाच्या शेवटी कोण जिंकतो ?
जोकर की बॅटमॅन ?
हा निवाडा प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार वेगळा असू शकतो.

माझ्या मते- "जोकर जिंकतो, तरीही बॅटमॅन राहतो !" 
कारण गोथॅम शहराच्या न्याय व्यवस्थेचे तीन शिलेदार, चांगुलपणाचे तीन स्तंभ जोकर कोसळवतो ! हार्वे डेन्ट याला त्याच्या चांगुलपणाची समाज कशी विश्वासघाताने परतफेड करतो ते दाखवून देऊन, त्याला रॅचेलच्या मृत्यूचा चटका देऊन, वरती हॉस्पिटलमध्ये त्याला 'छापा-काटा हाच खरा न्याय' या तत्वाचा डोस देतो ! 


अशावेळी पूर्वी अत्यंत तत्त्वनिष्ठ, दोन बाजू  नाणं वापरून निर्णय घेणारा, सद्गुणी-शूर-न्यायप्रिय असलेला हार्वे डेन्ट जगाबद्दल झालेल्या भ्रमनिरासाने खचून  जातो. त्याची तत्त्वनिष्ठा आता घाऊक सूडाच्या पिसाट भावनेत बदलते. आता तो Fair नाणं वापरू लागतो ! छापा-काटा करून त्याच्या डॊक्यातला न्याय प्रत्यक्षात आणतो. म्हणजे छापा आला तर माफ आणि काटा आला तर गोळी !! 

अशाप्रकारे गोथॅमच्या white knightला जोकर भेसूर दानव बनवून दाखवतो. अशा पिसाट डेन्टने मुलाच्या डोक्याला बंदूक लावल्यामुळे गॉर्डन आपल्या तत्त्वांविरुद्ध हार्वेची माफी मागायला तयार होतो. मुलाला सुरक्षित असण्याचं खोटं खोटं आश्वासन देताना- राक्षस बनलेल्या हार्वेसमोर सपशेल गुडघे टेकतो. शेवटी त्या मुलाला 'chance' च्या भरवश्यावर सोडण्याचे नाकारत बॅटमॅन मुलाला वाचवण्यासाठी झेपावतो आणि त्यासाठी अप्रत्यक्ष का होईना, हार्वेला खाली ढकलून - त्याचा जीव घेतो ! हार्वेच्या मृत्यूचा दोष आपल्या शिरावर घेऊन - बॅटमॅन त्याच्या लाडक्या शहरासाठी खलनायक बनतो... 

जोकर जिंकतो. तो या तिघांनाही 'वेळ आल्यावर तत्त्व टिकत नाहीत' याची जाणीव करवून देतो ! हार्वे समाजाने केलेल्या कृतघ्नतेने वेडा होतो आणि सात्विक white knight पासून two face नांवाच्या राक्षसापर्यंत स्वतःचं पतन घडवतो. गॉर्डन त्या राक्षसासमोर, आपल्या मुलाच्या जीवासाठी भीक मागतो, गुडघे टेकतो, हताश होतो, हतबल होतो, आपल्याच चुकीमुळे हार्वेचा बळी गेल्याची सल त्याच्या मनात कायम राहते. आणि त्या 
राक्षस बनलेल्या white knight पासून त्या निरागस मुलाला वाचवताना बॅटमॅन त्याच्या image चा बळी देतो आणि dark knight बनतो !! 

जोकर जिंकतो... मात्र बॅटमॅन संपत नाही. बॅटमॅन बरंच काही गमावतो, जनतेच्या नजरेत पडतो. मात्र - dark बनला तरी त्याच्यातला knight जिवंत राहतो !! जोकर हे मानवी जीवनाचे भेसूर सत्य आहे. पण ते कळल्यावर तुम्ही स्वतः राक्षस बनायचं किंवा गुडघे टेकायचे किंवा dark knight बनून घाव पचवूनही आपल्या ध्येयाकडे चालत राहायचं हा तुमचा चॉईस आहे !

Choose Wisely, Your Choice Defines- 'Who You Are' !!
It's a tribute indeed ! From Gotham to Batman and... From Nolan to Heath Ledger !!





(नोट- सर्व छायचित्रे/चित्रे इंटरनेटवरून मिळवली असून त्यांचे साभार श्रेय त्यांच्या मूळ निर्मात्या/कलाकारांनाच !)