रविवार, ७ जानेवारी, २०१८

बॅटमॅन आणि जस्टीस लीग !


जस्टीस लीग ही सुपरहिरोंची टीम आहे... त्याचे प्रसिद्ध आणि मुख्य मेम्बर्स म्हणजे सुपरमॅन, फ्लॅश, वंडरवूमन, अॅक्वामॅन, सायबोर्ग, मार्शियन मॅनहंटर, ग्रीन लँटर्न आणि बॅटमॅन...
(इथे नुकत्याच आलेल्या पिक्चरबद्दल बोलत नाहीये ! इथे कॉमिकमधल्या जस्टीस लीगच्या संकल्पनेबद्दल विषय चाललाय...)
आता जर नीट लक्ष दिलं तर लक्षात येईल की बॅटमॅन सोडला तर उरलेले सगळे मेम्बर्स हे raw power च्या पातळीवर overpowered आहेत...

सुपरमॅन तर सुपर आहेच... हिट व्हिजन, अफाट ताकद, अचाट वेग...

फ्लॅश प्रकाशाच्या वेगाच्या कैक पट वेगाने पळू शकतो, इन्फिनिटी मास पंच मारू शकतो, टाइमलाईनला वाटेल तसे अश्व लावू शकतो !

वंडर वूमन ही हजारो वर्षांचा अनुभव असलेली अमर ऍमेझॉन युद्धसुंदरी आहे, तिच्याकडे दैवी शस्त्र आहेत, अमानवी ताकदीचे वरदान आहे...

सायबोर्ग हा अलट्रॉनसारख्या सुपरटेकशी फ्यूज झालाय, त्याची टेक्नॉलॉजी ही काळाच्या पुढे आहे, तो जवळपास हरेक मशीन हॅक-कंट्रोल करू शकतो...

अॅक्वामॅन हा समुद्राचा राजा आहे, म्हणजे पृथ्वीच्या ७०% भागावर सत्ता, त्यात जलचर जीवांवर कंट्रोल...

तर मार्शियन मॅनहंटर हा सुपरमॅनएवढाच मजबूत आणि त्यात भर म्हणजे त्याच्याकडे Psionic क्षमता आहे (हा लोकांचे मन वाचू शकतो - एकदा त्याने जोकरचे मन वाचायचा प्रयत्न केलेला तेव्हा मात्र तो भैसाटून गेला होता !!)
तर ग्रीन लँटर्न हा त्या जादुई लँटर्न रिंगचा मालक आहे... त्याच्याकडे कल्पनेनुसार वस्तू प्रोजेक्ट करायची जबरदस्त मायावी क्षमता आहे...

मग प्रश्न हा उरतो की यांना बॅटमॅन कशाला हवा ! अवेंजर्समधल्या टोनी स्टार्कसारखी टेक्नॉलॉजी तयात करण्यातसुद्धा बॅटमॅन सायबोर्गच्या पाठी पडेल... मग बॅटमॅन त्या टीममध्ये असायचे कारण काय हा प्रश्न गंभीर होतो...
जस्ट फॉर फन !!!

इथे आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे... की फक्त ताकदीच्या/जादूच्या किंवा वेगाच्या सुपरपॉवरवरून एखादा हिरो 'हिरो' ठरत नाही... उदाहरण घ्यायचे तर ब्लॅक विडोचे घेऊ ! अवेंजर्समध्ये हल्क, थॉर, आयर्नमॅन सारखे superheroes असताना कॅप्टन अमेरिकापेक्षाही कमी ताकद असलेल्या या रशियन अप्सरेचं काय काम !! पण हीच ब्लॅक विडो अवेंजर्सच्या पहिल्या भागात लोकीकडून चलाखीने त्याचे मनसुबे काढून घेते... 

God of Mischief असलेल्या लोकीला बोलण्यात गुंतवून त्याचे प्लॅन्स ओळखणं म्हणजे थॉरला शॉक देण्यासारखा प्रकार आहे !! याचा अर्थ सुपरहिरो टीममधील प्रत्येक टीम मेम्बर हा हवेत उडणारा, शेकडो टन लिफ्ट करणारा असावा असं काही नाही...

हीच गोष्ट बॅटमॅनची आहे... बॅटमॅनची खरी ताकद आहे तो त्याचा Paranoia ! त्याला Trust Issues आहेत असं म्हणू शकता... बॅटमॅनची दुसरी ताकद आहे ती त्याची अविचल तत्त्वनिष्ठा आणि तिसरी म्हणजे रॉकसॉलिड खंबीर मानसिकता !!
म्हणूनच बॅटमॅन हा जस्टीस लीगचा 'फेलसेफ' आहे !!!
Justice Buster !
कारण-
Power Corrupts ! Superpower can Super-corrupt !!
सुपरमॅनसारखा अजेय हिरो उद्या हुकूमशहा बनला तर ?
वंडरवूमन तिच्या युद्धमदाने बेभान झाली तर ?
आता हे म्हणजे आपल्याच मित्रांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे... जगाच्या हितासाठी न्यूक्लियर ब्लास्ट सहन करणाऱ्या सुपरमॅनवर अशी शंका घेणं कितपत योग्य ? हजारो वर्षे लढाऊ बाणा टिकवून दुष्ट हुकूमशहा आणि एलियन शत्रूंशी लढत आलेल्या वंडरवुमनला व्हिलन ठरवणे हि कृतघ्नता नाही का ?  आणि याहून महत्त्वाचं म्हणजे... त्यांच्या नैतिक उंचीबरोबरच त्यांची अफाट क्षमतांचा विचार करता... या शक्तिशाली महानायकांना रोखावे तरी का आणि रोखणार तरी कोण असा हा दुहेरी प्रश्न आहे ! हा प्रश्न कॉमिकपुरता नाही... तो जास्त डार्क आहे ! मानवी मनाच्या कोपऱ्यातील 'सद्गुणी- बलशाली- महानायक' व्यक्तींबद्दलची सुप्त (आणि रास्त!) भीती या कॉमिक व्हर्जनमध्ये दाखवली गेली आहे...(म्हणूनच डीसी कॉमिक्स डार्क आहेत, डार्क चॉकलेटसारखी जास्त हेल्दी आहेत, जास्त खोल आणि thought-provoking आहेत !)  कारण सद्गुणांचे पुतळेच अनेकदा हुकूमशहा बनून जनजीवन बेचिराख करताना माणसाने पाहिले आहेत... 
असाच एक महान 'हिरो' !!!
आता हा गंभीर आणि जटिल नैतिक प्रश्न सोडवतो तो - बॅटमॅन ! बॅटमॅनची नैतिकता कचकड्याची नाही... जोकरसारख्या व्हिलनसमोर भट्टीत तापवलेल्या सोन्याप्रमाणे ती वेळोवेळी सिद्ध झालेली आहे... बॅटमॅनकडे नैतिकतेची स्वतंत्र डेफिनिशन आहे. बॅटमॅन हा काही मर्यादापुरुषोत्तम नाही... पण कॉमन गुडसाठी काही कठोर नैतिक नियम गरजेचे असतात ते पाळण्यासाठी बॅटमॅन कटिबद्ध आहे. जेव्हा वेळ पडेल तेव्हा मूल्यांच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाण्याची निर्भीड वृत्ती हे बॅटमॅनचे वैशिष्ट्य आहे... 'नो किल्स' या त्याच्या (योग्य) तत्त्वाचा अनादर करून - खुनी जोकरचा खून करणाऱ्या सुपरमॅनविरुद्ध उभा राहतो तो बॅटमॅनच !! त्याचबरोबर बॅटमॅन हा टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक जिनियस आहे... 

स्वतःची मानवी मर्यादा ओळखून त्यावर उपाय शोधणारा, सतत अपडेट होणारा, प्लॅन्स करणारा-ते बदलणारा आणि ध्येयप्राप्तीसाठी वाट्टेल ते बळी चढवायला तयार असलेला तो डार्क नाईट आहे...

बेनसारख्या स्ट्रीट-लेव्हल व्हिलनकडून कधीकाळी मार खाणारा गोथॅमचा हा डार्क नाईट पुढे डार्कसाईडसारख्या गॅलॅक्सी-लेव्हल शैतानाशी दोन हात करायला मागेपुढे बघत नाही ! (म्हणूनच बॅटमॅन ही दुर्दम्य मानवी स्वप्नांची, आशांची, इच्छांची आणि त्यासाठी चाललेल्या मानवी धडपडीची साक्ष देणारी महान कलाकृती आहे !!)

आता जाता जाता बॅटमॅन जस्टीस लीगचा 'फेलसेफ' म्हणून काय प्लॅन करतो ते थोडक्यात पाहू... (Tower of Babel, Justice League Doom, Batman: End Game आणि Injustice: Gods Among Us मध्ये ते बऱ्यापैकी समोर आलेले आहेत)

सुपरमॅनवर क्रिप्टोनाईट गॅस, क्रिप्टोनाईट बुलेट आणि गोल्डन क्रिप्टोनाईटचा उतारा बॅटमॅनकडे असतो...
वंडरवुमनच्या हार न मानण्याच्या वृत्तीचा फायदा घेत- तिला nanites injection द्वारे एका अजेय प्रतिस्पर्ध्याचा भ्रम (Hallucination) दाखवला तर ती थकून मरेपर्यंत लढतच राहील !
फ्लॅशसाठी स्पेशल व्हायब्रा बुलेट तर 
अॅक्वामॅनसाठी पाण्याची भीती उत्पन्न करणारं Scarecrow चं स्पेशल फियर टॉक्सिन बॅटमॅन तयार ठेवतो !
मार्शियन मॅनहंटरच्या त्वचेला मॅग्नेशियमचे आवरण देणारे nanites चिकटवून त्याला हवेशी संपर्क येताच आग लावता येते, जी त्याची सगळ्यात मोठी कमजोरी आहे..
ग्रीन लँटर्नवर त्याच्याच रिंगचा त्याच्या झोपेच्या REM फेजमध्ये वापर करून त्याला अंध बनवता येतं तर सायबोर्गवर Malware, Reverse Engineered Apokolips Tech किंवा EMP हत्याराचा वापर करता येतो...
अशाप्रकारे आपल्या लीगच्या जवळपास सगळ्या मेम्बरच्या 'त्या वाईट दिवसासाठी' बॅटमॅन Antidote सिद्ध ठेवत असतो !

आता असा 'one bad day' खरंच त्या सुपरहिरोंपैकी कोणाच्या आयुष्यात आलाय का ? इथे नमुन्यादाखल एक उदाहरण देतो ! ते आहे अर्थातच सुपरमॅनचे !! Injustice: Gods Among Us या कॉमिक कथेतील सुपरमॅनच्या मर्यादाभंगावर, नैतिक अधःपतनावर मी मागे एक कविता केलेली ती इथे देतो (जास्त डिटेल्ससाठी ते कॉमिक किंवा त्यावर आलेली ऍनिमेटेड मुव्ही नक्की बघा) -

एक दिवस तो मळभ आणूनी
मिटलेले ते दार उघडतो
पुरुषोत्तम जो मर्यादेचा
सैतानाशी स्पर्धा करतो

मायाजाली अलगद फसूनि
प्रियतमेचा प्राण घोटतो
भानी येऊनि सुपरमॅन मग
नैतिकतेचे शिखर त्यागतो

क्रुद्ध अशा त्या तुफानाला
विदूषक तो हसरा दिसतो
अजेय अपुल्या बाहुने मग
काळीज पापी चिरून टाकतो

चकित होऊनी बॅटमॅन तो
मूल्यांचे हे मरण पाहतो
बलदंडाने भोसकलेला
जोकर भेसूर हसत जिंकतो !

- मकरंद देसाई


आता या सगळ्यांचा फेलसेफ खुद्द बॅटमॅन आहे ! मग बॅटमॅनचा फेलसेफ कोण ? बॅटमॅन समजा रस्ता चुकला तर त्याला कोण रोखणार ? बॅटमॅनचा त्याच्या स्वतःसाठीचा Contingency Plan काय ?? बॅटमॅनकडे तोही आहे
त्याला 'जस्टीस लीग' असं म्हणतात !!!

 From: Justice League: Doom