शनिवार, २२ एप्रिल, २०१७

हॅरी पॉटरच्या दुनियेत : The Maruaders

हे आहेत हॅरी पॉटरमधले दुर्लक्षित 'टगे' -The Maruaders !

हॅरीच्या आधीच्या पिढीतील होग्वार्ट्झ गाजवणारे Gryffindor मधले Wizards...
यातील प्रत्येकाचा हॅरी पॉटरच्या संपूर्ण कथानकात महत्त्वाचा हिस्सा आहे. तर Maruaders ग्रूपचे मेंबर्स -
पहिला म्हणजे हॅरीचा बाप - जेम्स पॉटर !
Deathly Hallows पैकी तो Invisible Cloak विरासत म्हणून मिळालेला (Deathly Hallows च्या कथेतील त्या शहाण्या लहान भावाचा वंशज) - उत्साही, करामती करणारा, ग्रूप लीडर असलेला जेम्स पॉटर !!
दुसरा म्हणजे हॅरीचा गॉडफादर असलेला - सिरीयस ब्लॅक ! बेल्लाट्रिक्सने Killing Curse वापरून जेव्हा Sirius ला मारलं तेव्हा प्रत्येक पॉटर-फॅन गलबलला असेल ! Sirius Black च्या नांवाला एक खोल अर्थ आहे ! म्हणजे हा पृथ्वीवरून दिसणारा सर्वात चमकदार तारा आहे. जुन्या काळात नावाड्यांना दिशा दाखवणारा, आकाशीचा दीपस्तंभ !(बहुतेक व्याध तारा म्हणतात तो हाच असावा की काय !)

हॅरीच्या आयुष्यात सिरीयसचे असेच स्थान आहे !! सिरीयसला जेम्सनेच हॅरीचा गॉडफादर बनवलेले असते.

Sirius ताऱ्याला Dog Star असेही म्हणतात ! आणि सिरीयस ब्लॅक चे पशुरूप म्हणजे Animagus Form हा 'काळा कुत्रा'च असतो !!
 The Maruaders आणि त्यांची Animagus रूपे
तिसरा म्हणजे Remus Lupin ! हॅरीला 'तमपिशाच'(Dementors) लोकांपासून वाचवणारा Expecto Patronus (डबिंग वाल्यांनी - पितृदेव संरक्षणम् केलंय) हा मंत्र शिकवणारा मास्तर... तो मंत्र शिकणारा हॅरी कदाचित सर्वात लहान जादूगार असावा ! हॅरीच्या जीवावर बेतले असताना याच मंत्राने हॅरीला Dementors पासून वाचवले आहे ! Lupin लहानपणी झालेल्या infection मुळे Werewolf म्हणजे आदम-भेडिया झालेला असतो...
आणि चौथा म्हणजे - Mr. Peter Pettigrew म्हणजेच .... voldemort ला पुन्हा जिवंत करणारा - Wormtail !! भित्रा, दगाबाज, 12 वर्षं Ron च्या कुटुंबात त्याचा Scabbers नांवाचा लठ्ठ} उंदीर बनून राहणारा Peter Pettigrew...
या चौघांनीच तो होग्वार्ट्झचा जादुई नकाशा तयार केला म्हणून त्याला Maruaders' Map म्हणतात ! स्नेपला लहानपणी पिडणारे, रॅगिंग करणारे टोळके ते हेच... पुढे Lilly Evans चे James शी लग्न होते. हॅरी जन्मतो. तेव्हाच First Wizarding War सुरू होते. हॅरीला Voldemort पासून वाचवण्यासाठी सिरीयस जेम्स आणि लिलीचे रक्षण करायला नियुक्त केला गेलेला असतो.
मात्र... दुर्दैवाने सिरीयस Voldemort ला संशय येऊ नये म्हणून दुबळ्या मानल्या जाणाऱ्या Peter ला ते काम सोपवतो ! Peter च्या गद्दारीमुळे त्या रात्री जेम्स आणि लिली Voldemortचे शिकार बनतात.😢    लिलीच्या बलिदानामुळे हॅरी वाचतो आणि Voldemort तात्पुरता तरी Meanest Form of Ghost बनून संपून जातो. Peter मरण्याचे नाटक करून उंदीर बनून Weasley घराण्यात दडून बसतो. आणि बिचाऱ्या सिरीयस ब्लॅकला त्या Peter च्या खुनाच्या आरोपाखाली Azkaban मध्ये टाकलं जातं...
पुढे आपलं Animagus रूप वापरून तो तिथून निसटतो. त्याआधी Lupin होग्वार्ट्झ मध्ये DADA म्हणजे Defense Against Dark Arts शिकवायला रुजू होतो (ही जागा सन्मानाची असते, कधी काळी साक्षात Voldemort ला ही जागा नाकारली गेलेली असते म्हणजे बघा !😊)  
पुढे Pettigrew चे पितळ उघडे पडते. पण तो हॅरी मध्ये पडल्यामुळे Sirius आणि Lupin च्या तावडीतून वाचतो. तोच पुढे Goblet Of Fire मध्ये अनिष्ट देवाला जीवंत करतो. बदल्यात अनिष्ट देव त्याला धातूचा हात देतो ! तोच हात जेव्हा Malfoy Manore मध्ये Wormtail(Peter चे Nickname/Pseudonym) हॅरीला मारायला कचरतो (हॅरीने त्याला वाचवलेले असते म्हणून !) तेव्हा त्याचाच गळा दाबून त्याला संपवतो (चित्रपटात वेगळे दाखवले आहे)
सिरीयस पुढे Department of Mysteries च्या लढाईत त्याचीच cousin असलेल्या क्रूर Bellatrix च्या Avada Kedavra ची शिकार होतो ! तर Lupin शेवटच्या होग्वार्ट्झ युद्धात Doholov नांवाच्या खतरनाक Death Eater चा शिकार होतो... हे दोन्ही Maruaders आपले Order Of Phoenix मधले स्थान झळाळून, Voldemort आणि त्याच्या काळ्या सेनेचा सामना करताना प्राण सोडतात ! जेम्स आधीच गेलेला असतो. दगाबाज पीटर शेवटच्या क्षणी बदलतो आणि हॅरीला मदत करतो- अर्थातच Voldemort ची शिक्षा भोगूनच ! अशाप्रकारे The Maruaders ची कहाणी संपते... पण त्यांच्या पात्रांमधील बारकावे, फरक, वैशिष्ट्ये आणि Complexity हॅरी पॉटर सिरीजला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात हे मात्र नक्की...





(*सर्व छायाचित्रे गूगल इमेजेसवरून घेतली आहेत. )

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

हॅरी पॉटरच्या दुनियेत : Severus Snape

हा आहे Severus Snape !

पहिल्यांदा आपल्या शाळेतील खडूस मास्तराची आठवण करून देणारा, दुष्ट-गूढ-क्रूर वाटणारा- Neville Longbottom वर रॅगिंग करणारा- Hermoine ला टोमणे मारणारा, हॅरीचा द्वेष करणारा - थोडक्यात 'डोक्यात जाणारा' - जादुई रसायने (Potions) शिकवणारा मास्तर म्हणजे हा स्नेप !
पण माणसं पांढरी किंवा काळीच असतात का ? अशी गूढ- काळ्या सावलीसारखी दिसणारी माणसं व्हीलनच असतात का ? इथे Severus Snape आपल्या अशा Binary दृष्टीला स्तिमित करून जातो ! स्नेप ही मी पाहिलेल्या सर्वोत्तम व्यक्तिरेखांपैकी एक आहे !! तो व्हिलन आहे का हिरो हे शेवटपर्यंत कळत नाही ... रोलिंग बाईंनी लिहिलेली आणि Alan Rickman ने पडद्यावर जिवंत केलेली - intense हा शब्द लाजेल अशी अफाट व्यक्तिरेखा...
कदाचित स्नेप नसता तर हॅरी पॉटरची गोष्ट आणि पिक्चर हे टॉम अँड जेरी सारखे लहान मुलांपुरतेच राहिले असते ! स्नेप, सिरीयस ब्लॅक सारख्या व्यक्तिरेखांमुळे हॅरी पॉटर सिरीज mature बुद्धीलाही भुरळ घालते !
स्नेपचं बालपण दुःखद असतं ! आईबाबांच्या वेगळे होण्याने त्याच्या बाल्याचा चुराडा केलेला असतो... त्याच्यातील Talent तरीही लपत नाही... फार लहान वयातच तो होग्वार्ट्झमध्ये जादू-मंत्रात पारंगत होतो ! जेम्स पॉटर, सिरीयस इ. असलेल्या Maruaders ने केलेल्या रॅगिंग-कम-चेष्टेमुळे स्नेप आतून कायमचा दुखावतो.
त्याच्यातील गुणवत्तेला वाळवंटातील रात्रीसारख्या रुक्ष-गूढ आयुष्याचा शाप असावा ! या वाळवंटात आपल्या तेजाने तळपणाऱ्या स्नेपला गारवा-आसरा-ओलावा सापडतो तो लिली पॉटरमध्ये ! लिली आणि स्नेप एकमेकांकडून बरंच काही शिकतात... पण...
स्नेप रागात किंवा दंभाचा आविष्कार असेल म्हणून - एकदा Mudblood नांवाचा Rascist-घृणास्पद-वंशवर्चस्ववादी शब्द वापरतो... कदाचित स्नेप तसाच असेल ! शुद्ध रक्ताची झिंग असलेला... किंवा तो फक्त एक भावनातिरेक असेल... पण यामुले स्नेप लिलीच्या संवेदनेला कायमचं ठिगळ लावतो. आणि आपल्या आयुष्यातील एकमेव जिव्हाळ्याचं स्थान मृगजळ बनताना बघत बसतो...
स्नेप अशा प्रकारच्या isolation मुळे काळ्या विद्यांकडे झुकतो ! Death Eater लोकांबरोबर दोस्ती करतो. टॉम रिडल्स सारखंच - एक विशेष-टोपण नांव किंवा गूढ बिरुद स्वतःला चिकटवतो !! स्नेप 'Half Blood Prince' म्हणतो. नवे मंत्र शोधतो. काळ्या बाजूकडे झुकत जातो...
पण तेवढ्यात त्याचं आयुष्य अजूनच छिन्नविच्छिन्न करणारी घटना घडते. Voldemort चा Avada Kedavra नांवाचा हमखास जीव घेणारा शापमंत्र लहानग्या हॅरीचा घास घेणार असतो ! तेवढ्यात लिली पॉटर आपल्या बाळाला वाचवते-आपल्या जीवाचं बलिदान देऊन ! तिच्या बलिदानापुढे तो मृत्यू-मंत्र फिका ठरतो, आणि परत फिरतो - Voldemortचे तुकडे करतो... Horcruxes मुळे Voldemort परत येणारच असतो. हॅरीला The Child who survived ची उपाधी मिळते, मातृकवच मिळतं... मात्र ....
गतप्राण लिलीसमोर त्या लहानग्या हॅरीपेक्षा जास्त रडणारा- नियतीने मृगजळसुद्धा हिरावून नेल्याचे अश्रू ढाळणारा- हाफ ब्लड प्रिन्स !
स्नेपचं मृगजळसुद्धा नियती हिरावून घेऊन गेलेली असते... स्नेप कायमचा बदलतो. Voldemort नांवाच्या अजेय सैतानाला हरवण्यासाठी आयुष्य झोकायची मानसिक तयारी स्नेप करतो... Dumbledore कडे जाऊन आपले अश्रू मोकळे करतो- डबल एजंट बनून आपल्या नव्या लक्ष्याचा वेध घेण्याची प्रतिज्ञा करतो. हॅरीचे डोळे लिलीसारखे आहेत हे सांगून चाणाक्ष Dumbledore हळुवार पणे Snape च्या काळजाला हात घालतो ! आता स्नेप हॅरीला वाचवणार असतो- त्यासाठी वाट्टेल ते करून- तरीही कोणालाही ते जाणवू न देता !! लिलीचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून - स्नेप आपल्या रखरखीत आयुष्याला फुफाट्यात झोकायला तयार होतो...

Voldemort नांवाच्या मृत्यू समोरही न डगमगता उभा राहणार, खोटं बोलण्याची सत्य-प्रतिज्ञा न तोडणारा स्नेप
स्नेपला Dumbledore चा जीव घ्यावा लागतो, Voldemort ची साथ द्यावी लागते, Bellatrix च्या तिरकस टोमण्यांना उत्तर करत आपली निष्ठा त्या Dark Lord कडे सिद्ध करावी लागते... Voldemort हा सर्वश्रेष्ठ मनकवडा- Legilimens पैकी एक असतो. त्याच्या समोर खोटं बोलणं जवळपास अशक्य असतं ! पण Snape तितकाच सर्वोत्तम मनोनिग्रही - सर्वश्रेष्ठ Occlumens - असतो ...
नगिनीच्या हल्ल्याने घायाळ होऊन- हॅरीच्या डोळ्यात लिलीची आठवण बघत- Dumbledore ने सोपवलेले शेवटचे काम पूर्ण करणारा स्नेप
Voldemort ला फक्त हॅरी हरवत नाही ! लिली आणि स्नेपच्या अमर बलिदानांचा, Dumbledore च्या सात्विक-विचक्षण नियोजनाचा रेटा- Tom Riddles उर्फ Lord Voldemort च्या मृत्यूला गिळणाऱ्या महत्त्वाकांक्षेला आणि त्याच्या अद्वितीय ताकदीला - मात देऊन जातो !!
हॅरी पॉटर सीरिज मनात कायमचं स्थान मिळवून जाते- ती Snape आणि त्याच्यासारख्या अप्रतिम व्यक्तिरेखांमुळे, Voldemort च्या राक्षसी उंचीमुळे आणि त्याला हरवणाऱ्या Golden Trio च्या हिंमतीमुळे !!



(*सर्व छायाचित्रे गूगल इमेजेसवरून घेतली आहेत. )

शनिवार, ८ एप्रिल, २०१७

मी नांगर धरला नसला तरी...

शेतकरी या व्यवस्थेकडून नाडला जातोय असे सांगितले जाते. सध्याची शेतीची, खास करून महाराष्ट्रातील दयनीय अवस्था बघता-ते खरे वाटणे साहजिक आहे. ते अगदीच खोटं असं नाही. पण... ज्या शोषणाची सामान्यतः चर्चा होते तसे - म्हणजे बड्या उद्योगपती, शहरी लोकांकडून शेतकऱ्याचे शोषण होते वगैरे - त्या शोषणाच्या संकल्पना या खोट्या आहेत...
त्यासाठी एक उदाहरण घेऊ.
समजा अजय नोकरदार आहे. विजयची कंपनी आहे. आणि संजय शेतकरी आहे.
समजा तिघांनाही सारखेच म्हणजे २० लाख रुपये उत्पन्न वर्षाला मिळते.
आता अजयला सामान्यतः कर द्यावा लागतो - २५,०००+१,००,०००+३,००,०००=४,२५,००० रुपये. म्हणजे अजय आपल्या खिशातले सव्वा चार लाख हे सरकारला देतो. त्या बदल्यात त्याला काय मिळते बरे ? सामान्य सुविधा ज्या शासनाने जनतेला देणे अपेक्षित असते (अर्थशास्त्रीय भाषेत Public Goods) त्यांचा त्याला लाभ मिळतो. बाकी त्याला व्याजदरात सवलत वगैरे मिळत नाही.
दुसरा आहे विजय. त्याची कंपनी समजा २० लाखांचा नफा कमवत असेल-तर कॉर्पोरेट कर ३०% असल्याने त्याच्या कंपनीला ६ लाखांचा कर भरावा लागतो. म्हणजे कंपनीचा मालक असलेला विजय आपल्या खिशातले ६ लाख शासनाला देतो आणि त्याला मिळणाऱ्या सुविधा या अजयसारख्याच Public Goods वर्गातील असतात. उलट त्याला ऑडिट करणे, MCA कडील कायदेशीर बाबी पूर्ण करणे हा व्याप असतोच.
आता संजयचा विचार करू. संजय जे २० लाख शेतीतून कमवतो, त्यातील एकही रुपया तो कर देत नाही. म्हणजे शासनाला संजयकडून थेट कर शून्य मिळतो. त्याला ऑडिट करून घ्यावे लागत नाही. त्याला मिळणाऱ्या सुविधा काय बरं ? Public Goods तर आहेतच, त्याशिवाय पुढील शासकीय सवलती मिळतात -
  1. स्वस्त दरातील नाबार्डचे कर्ज
  2. आपला माल विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची सरकारी सोय
  3. पीकविमा
  4. सहकारी बँकांचे सरकारी FINANCING
  5. नुकसानभरपाईची सोय
  6. शेतीची साधने घेण्यासाठी सबसिडी आणि कर्जे
  7. खत,बियाणे घेण्यासाठी स्वस्त कर्ज, इ.
आता शेतकऱ्याला वीजेचा अभाव जाणवतो, पाण्याचा तुटवडा जाणवतो हे मान्यच. पण तो ही व्यवस्था अजूनही नीट राबायची, विकास सर्वत्र पोचायचा असल्याने होणारा त्रास आहे. वीज व्यवस्था या नवीन सरकारच्या काळात सुधारलेली जाणवत आहेच. सिंचनात 'शेतकऱ्यांच्या जाणत्या नेत्यांच्या' फौजेने घोटाळे, बेशिस्त दाखवली नसती तर पाण्याचा प्रश्न कदाचित इतका बिकट नसता. आणि मुळात पाणी-वीज समस्या हे व्यवस्थेने केलेले शोषण मुळीच नाही. तरीही दिलेला कर आणि मिळणाऱ्या सवलतींचा विचार झाला तर शेतीबाबत शासन देते आणि शेतकरी शासनाकडून घेतो अशीच परिस्थिती नाही का ?
आता इतक्या सवलती, कर न भरण्याची खुली सूट असतानाही शेतीची अवस्था बिकट आहे - याचा अर्थ काय बरं ? इथे शेतकऱ्याला निसर्गावर अवलंबून राहावे लागते, रिस्क असते हे म्हणणारे सरसावून येतील. पण नोकरदार आपल्या आयुष्यातील संधी मारतच असतो की... नोकरदाराने एकाच ठिकाणी राबल्यामुळे त्याचं आयुष्य एका पगाराच्या आणि त्यात होणाऱ्या वाढीच्या पुरतेच मर्यादित राहणार असते ! तेही आयुष्यभर... Salary is the bribe they pay to betray your dreams - असे प्रसिद्ध वाक्य आहेच ! त्यातही नोकरदाराची स्किल्स ही बदलत्या तंत्रज्ञानामुळे निरुपयोगी (Obsolete) बनली तर त्याचे नंतरचे आयुष्य कायमचे संकटात येतेच. कारण वयाची एक मर्यादा (४०-४५ वर्षे साधारणपणे ) ओलांडल्यावर नवीन स्किल्स शिकणे अशक्य नसले तरी कठीण असते. याचे उदाहरण म्हणजे पांढरपेशा जॉब मानल्या जाणाऱ्या accountancy तील नोकरदार वर्गाची अवस्था बघा. २०-२० वर्षे काम केलेले लोक १२,०००-१५,००० च्या पुढे जात नाहीत. त्यात बदलत्या तंत्रज्ञानाला तोंड देताना त्यांचा बिचाऱ्यांच्या तोंडाला फेस येतोय... आता businessman ला रिस्क असते हे वेगळे सांगायला नकोच. त्यामुळे शेतकऱ्याची रिस्क हीच काय ती रिस्क असे नाही...
उरला विषय अन्नदाता असण्याचा - नुसते गहू पिकवले - चक्कीवाला (businessman ) ने ते दळलेच नाहीत तर त्याचा अन्न म्हणून फारतर म्हशी-गायींनाच उपयोग होईल ! त्यामुळे अन्नदाता म्हणजे फक्त शेतकरी कसा ? ज्या नोकरदाराने गिरणीत ते पीठ दळले तोही अन्नाची value निर्माण करण्यात सहभागी आहेच की... त्यामुळे शेतकरी नसेल तर जग उपाशी मरेल असे म्हणताना - पीठ गिरणीतला कामगार नसेल, पीठ गिरणीवाला नसेल तरीही तेच होणार आहे हे कोण ध्यानात घेणार ? आता ते पीठ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी ज्यांनी वाहतूक यंत्रणा दिली, ज्यांनी त्याची चपाती बनवण्यासाठी तवा बनवला, त्या तव्याच्या धातूसाठी ज्या खाणकामगाराने आपली फुफ्फुसे धोक्यात टाकली ते 'अन्नदाता' का नव्हेत ? हे बोललो तर क्रूर, कृतघ्न वगैरे लेबले लागतात- तरीही सत्य हेच आहे - की अन्नदाता वगैरे काही नसते ! Modern Economic Model म्हणजे काही बलुतेदारी नव्हे की एकमेकांचे आभार मानत जगावे !! इथे value chain असते... तुमच्या ताटातील चपाती असो किंवा शौचालयातील Tissue Paper हे value chain चे फलित असते. त्यामुळे 'अन्नदाता' ही संकल्पना उच्च भावनिक वगैरे वाटली तरी ती आर्थिक व्यवस्थेचे अज्ञान आणि भंपक मध्ययुगीन समजूतींवर आधारित आहे...

आता मग शेतकऱ्याने करावे काय किंवा शेतकऱ्यासाठी करावे काय ?
सगळ्यात पहिलं करण्यासारखं हे आहे की - "कधी हातात नांगर धरलाय का ' किंवा 'एकदा या शेतावर, मग बोला' असले भंपक प्रश्न आणि धमक्या देणे शेतकरीवर्ग आणि त्यांचे हितार्थी लोक यांनी सोडून द्यावे. नुकतेच उर्जित पटेल (आणि त्याआधी अरुंधती भट्टाचार्य) कर्जमाफीविरुद्ध बोलले. त्या बातमीच्या फेसबुकवरील लिंक्सखालील कमेंट्स वाचल्या तरी किती पिसाटपणे हेत्वारोप होतात हे लक्षात येईल !
हा म्हणजे दमा झाल्यावर कडू औषध घे म्हणणारी आई वाईट आणि 'खा तू आईस्क्रीम'म्हणणारी काकू चांगली असा न्याय झाला !! उर्जित पटेल शेतात येऊन राबले तरीही शेतकऱ्याचे काहीही कल्याण होणार नाही. अरुंधती भट्टाचार्य त्यांच्यासाठी 'मीठ - भाकरी' घेऊन गेल्या तरीही काहीही होणार नाही. मग 'एकदा शेतात या' ही काय 'वाडयावर या' टाईपची धमकी आहे की काय ?? असा मूर्खपणा आणि भंपक झुंडीचा अभिनिवेश (त्याला प्रांत-जातीद्वेषाचा वास !) सोडायचाच नसेल तर कोणीही शहाणा माणूस सल्ला देणार नाही !! घ्या कर्जमाफी-मारा बकरा-थोडी ढोसा-गावठी swag मिरवा आणि झोपून रहा ! पुढच्या वर्षी आत्महत्या टाळण्यासाठी हा 'आमच्या भावाची हवा शेतात' वाला हुच्च swag उपयोगी पडावा या शुभेच्छा !
आता ज्यांना खरंच काही ऐकून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी... आत्ताचा शेतीप्रश्न हा व्यवस्थेतील त्रुटी आणि भंपक समाजवादी अर्थ-नियम यांच्यामुळे निर्माण झालेला आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे इथे मांडतो -
१. शेतजमिनीचे तुकडीकरण हा पारंपरिक शेतीचा मोठा तोटा आहे. तो प्रश्न येत्या पिढ्यांना जास्त सतावेल...
२. कर्जमाफीने सहकारी नवसावकारांचे भले होते. शेतकऱ्याला Direct Benefit Transfer सारखी सुविधा देऊन मगच कोणत्याही मदतीचा यापुढे विचार करावा. कर्जमाफी तर नकोच ! कारण याआधी देऊन झालेली आहे-परिणाम आपल्या समोर आहेत. दारूने लिव्हर फुटते ही माहिती असूनही, एकदा ऑपरेशन होऊनही - चांगली लागते- म्हणून पीतच राहायची असेल - तर चालू द्या !!
३. कॉर्पोरेट शेती हे भविष्य आहे. आता कॉर्पोरेट म्हटलं की अंबानीच आठवत असेल तर 'वैसे ही सही'...
४. आपल्याकडे उद्योग आणि सेवा क्षेत्रात आलेली financial advancement, technical efficiency ही प्राथमिक क्षेत्रात दिसत नाही. हे म्हणजे आपण वर चांगला ब्रँडेड टी-शर्ट घातलाय - आणि खाली मात्र फाटका पंचा लावून फिरतोय !! कंपनी शेतीतही उतरल्या पाहिजेत. शेती हा नफ्याचा धंदा झाला पाहिजे - कर्जमाफीचा नाही...
५. पण यासाठी सध्याचा विचित्र जमीन विकू न देणारा कायदा बदलायला हवा. शेतकरी शेतकऱ्यालाच जमीन विकू शकतो ! (तुमच्या नांवावर शेती नसेल, तर मग - वशिला लावा, तलाठ्याला चहापाणी, सर्कलला कॉफी, तहसीलदाराला पुरीभाजी - हे करून घेऊन मग कोणाच्या तरी वादग्रस्त सातबाऱ्यावर नांव 'चढवून' घ्यायला लागते !! तरच शेतजमीन विकत घेता येते !!) त्यामुळे कंपनी आणि इतर नवे गुंतवणूकदार शेतीत उतरणार तरी कसे ? हे म्हणजे आपण काश्मीरसारखी शेतजमिनीची अवस्था केलेली आहे. बाहेरचे येऊ शकत नाहीत, त्यामुळे तिथे असलेले दुःखी आहेत (काश्मीरमध्ये काय वेगळं होतंय !!)...
६. यामुळे शेतीतला रोजगार कमी होईल का ? तर हो - होईल !! कारण सध्या शेतीत एक माणूस करू शकेल ते काम तंत्रज्ञान मागास असल्यामुळे ४ माणसे करतात अशी अवस्था आहे... त्या चार लोकांना रोजगार दिसतो ! पण प्रत्यक्षात ती छुपी बेरोजगारीच (Disguised Unemployment) आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीचा बेग वाढवावा लागेल-पण शेतीला मागास ठेवून त्यात जास्त माणसे खितपत ठेवण्यात 'पॉईंट' नाही !
७. आणि पुन्हा एकदा... शेतीच्या सध्याच्या समस्या 'एसीत' बसलेलेच सोडवू शकतात ! कारण नांगर धरणारे नवा कायदा draft करणार नाहीत, तिथे एसीत बसणारे च हवेत ! शेतीसाठी सक्षम-डिजिटल कमोडिटी मार्केट हेसुद्धा एसीत बसूनच चालवले जाईल. कॉर्पोरेट शेतीचे मालकही कदाचित एसीत बसलेलेच असतील !! पण समस्या सोडवायची तर एसीगृहवासी-लोकांचा द्वेष करून काहीही मिळणार नाही... एसीतलय लोकांच्या नीट काम करण्यात आपला फायदा आहे हे शेतकऱ्यांना कळायला हवे...

-शेतीत कॉरर्पोरेट्स आल्यावर तंत्रज्ञान काय करु शकतं त्याची एक झलक -
Image Credits - Google Images and Original Creators

Image Credits - Google Images and Original Creators

सध्याच्या शेती समस्येवर सदरचे इलाज करणे नोटबंदीपेक्षा कठीण आहे ! यासाठी लोक जोपर्यंत तयार होत नाहीत- तोपर्यन्त 'जनतेचा रोष' होईल म्हणून राजकारणी काहीही करणार नाहीत... आणि जितके दिवस आपण हे वास्तव नाकारत आणि वांझोटे 'शेती-अश्रू' गाळत बसू - तितका छोटा-अल्पभूधारक शेतकरी जास्तीत जास्त नाडला जाणार आहे, हे लक्षात घायला हवे.
"Reforms are bitter, but they are required for better tomorrow !"