शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

महाड पूल दुर्घटना - हळहळ आणि अनास्था

महाड दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि समाजाला पश्चात्ताप करायला लावणारी घटना आहे. अपघात हे १००% टाळता येत नाहीत, हे मान्यच. परंतु, एखाद्या नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहून जातो आणि त्यामुळे माणसे मारली जातात हा काही शुद्ध नैसर्गिक अपघात नाही. जरा खालील मुद्दे लक्षात घ्या-
१. नवीन पूल असताना जुन्या पुलावरून वाहतूक केली जाते.
२. जुन्या पुलावर वाहतूक चालू होती तर त्याची डागडुजी आणि स्थापत्य
तपासणी (Structural Audit) का केली गेली नाही ?

मात्र दुर्घटना घडल्यावर सरकारने केलेली त्वरित बचाव-कारवाई स्वागतार्ह आहे. त्याला गालबोट लावण्याचे काम प्रकाश मेहता यांनी सेल्फी काढून आणि वरती पत्रकाराला दमदाटी करून पार पाडले ! मात्र माध्यमे वेड्यासारखी किंवा सुनियोजितपणे त्याच गोष्टीला मोठे करत आहेत. ती प्रकाश मेहता यांची वैयक्तिक चूक/अपराध आहेच, पण माध्यमे मूळ समस्येला बगल देऊन सामाजिक अपराध करत आहेत.
खरंतर इतक्या भीषण दुर्घटनेचा परिणाम फक्त एका मंत्र्याचा (त्याने घेतलेल्या सेल्फीमुळे) राजीनामा घेऊन होणार असेल तर आपण भविष्यातील बळींचे दोषी आहोत... त्यात करून विरोधी बाकांवर बसलेले 'ब्लेम गेम' चालवत आहेत. ब्रिटीश काही २०१४ मध्ये पूल बांधून गेले नाहीत ! फडणवीस सरकारच्या आधी जवळपास सलग १५ वर्षे सत्ता भोगणाऱ्या पक्षांनी निर्लज्जपणे आपली जबाबदारी झटकून, उलट्या बोंबा मारायचा प्रकार चालवला आहे. खड्डे दोन वर्षांत पडलेत का ? पूल दोन वर्षांपूर्वीच बांधला गेलाय का ? सगळी यंत्रणा दोन वर्षांत खराब झाली आहे का ? (याचा अर्थ फडणवीस सरकारने जो हलगर्जीपणा केला असेल, त्याला 'क्लीन चीट' देणे असा अजिबात नाही.) तरीही या दुर्घटनेवर राजकीय तवे तापवण्याचा अत्यंत हिडीस प्रयत्न महाराष्ट्रात घडतो, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी नसेल.... (यापुढे महाराष्ट्र बिहारपेक्षा सुसंस्कृत वगैरे फालतू गप्पा तरी झोडू नका म्हणावं ) हे मद्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार भयानक आहेत.
आता ज्यांची चर्चा व्हायला हवी अशा मुद्द्यांकडे वळू. रस्त्यांची दुरावस्था, खड्डे आणि टक्क्यांनी केली जाणारी बांधकामे हे आपल्याकडील दाहक वास्तव आहे. याला फक्त राजकीय पक्षांना दोषी ठरवण्याची आपल्याकडे रीत आहे. मात्र याला नागरिक म्हणून आपण सगळेच जबाबदार आहोत. जेव्हा रस्त्यात पडलेला खड्डा सहन केला जातो, दुर्लक्षिला जातो तेव्हाच दुसऱ्या खड्ड्याची निर्मिती होत असते...नागरिक म्हणून फक्त रिक्षात, चहाटपरीवर आणि हॉटेलातील गप्पांमध्ये 'सगळे राजकारणी चोर' असे म्हणून मोकळे झाले की कर्तव्य संपले आपले !! 'या सगळ्या चोरां'ना निवडून आपणच देत असतो.(त्यावेळी हे चोर आपल्या भविष्यातील लुटीतील आगाऊ हिस्सा वाटत असतात रात्री फिरून, तेव्हा मात्र तो नाकारायचा नसतो !!) खरंतर तर बांधकामात होणाऱ्या 'प्रामाणिक टक्केवारी'(!!!)च्या देवाणघेवाणीपेक्षा ही सामाजिक अनास्था जास्त भयावह आहे.
जो पूल वाहून गेला त्याचे Structural Audit होत होते की नाही याची जाग तो वाहून गेल्यावर यावी हे भीषण आहे... माणसे मरावी लागतात, मगच आम्ही जागे होतो ! मग थोडे रडतो, थोडे भांडतो, मग परत झोपतो... पुढची दुर्घटना होईपर्यंत... ही परिस्थिती बदलणार नाही तोपर्यंत व्यर्थ आहे मृतांविषयीचा कळवळा... त्यात अजून भयानक म्हणजे, 'मृत्यू शाश्वत आहे' असे पराकोटीचे आध्यात्मिक विचार सर्वत्र फिरतात, मृतांच्या नावाने गळे काढून झाले की नातेवाईकांना मदत करण्याचे काम हाती घेतले जाते. त्यानंतर मात्र पुढची दुर्घटना होईपर्यंत आपण सुस्तच...
'अनास्था' आणि 'सहनशीलता' ही आपल्या समाजाची ओळख बनली आहे. अत्याचार करणाऱ्यापेक्षा, अत्याचार सहन करणारा जास्त दोषी का असतो याचा हा दाखला आहे... त्यात करून, असे अपघात झाले की 'सगळे राजकारणी चोर' म्हणणारे लोक, सार्वजनिक गणपतीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या त्याच चोरांच्या अंड्यापिल्ल्यांना मागतील ती रक्कम काढून देतात हे विशेष ! आपल्याकडे 'स्वार्थाला शिव्या देण्याची आणि परमार्थाचे गोडवे गाण्याची' एक पद्धत आहे. मात्र ज्या समाजाला आपला स्वार्थच धड कळत नाही, त्या समाजातला परमार्थ हा ढोंगी लोकांच्या हातात जातो यात नवल वाटावे असे काही नाही.
हे सगळे फार कटू आहे, मात्र दुर्दैवाने वास्तव आहे... भावनांचे फुलोरे फुलवून दुर्घटनेची जबाबदारी झटकण्यापेक्षा हे वास्तव पचवणे कठीण आहे.... ते पचवायची हिंमत आपला समाज (म्हणजे आपण सगळेच) दाखवणार का ? का नेहमीच्या 'काळाची झडप' असे म्हणून हळहळण्याच्या कार्यक्रमांचे सोपस्कार करून पुढच्या झडपेची वाट पाहणार ? यात थोडाजरी प्रामाणिक बदल झाला तर पुढचे माळीण किंवा पुढचे महाड होण्याच्या शक्यता आपण कमी करू शकतो. तो बदल होणे हीच या भीषण दुर्घटनेने केलेल्या जखमेवर आपली खरी फुंकर असेल....
(या विषयाबद्दल अधिक सांख्यिकी आणि माहितीसाठी दैनिक 'लोकसत्ता'चा 'बुडती हे जन..'.हा अग्रलेख जरूर वाचा. )

1 टिप्पणी: