शुक्रवार, २४ जून, २०१६

#Brexit म्हणजे काय रे भाऊ ?


   #Brexit - ब्रेग्झीट सध्या चर्चेत आहे. चर्चा होताहेत, सोशल मिडिया ब्रेग्झीटमय झाला आहे. तरीही, बऱ्याच जणांना ही काय भानगड आहे याचा पत्ता लागत नाही. आणि उरलेल्यांपैकी अनेकांना त्याबाबत संभ्रम आहे.
त्याचसाठी 'ब्रेग्झीट'बद्दल थोडक्यात आणि सोप्या शब्दांत सांगायचा हा एक प्रयत्न-
   ब्रेग्झीट म्हणजेच Brexit ह्याची फोड Britain+Exit अशी होते. ब्रिटन हा देश युरोपियन युनियन (EU)चा सदस्य आहे (म्हणजे आता जवळपास 'होता' असं म्हणावे लागेल !) ... या संघटनेत २८ देश आहेत. उदा. फ्रान्स, जर्मनी,इ... युरोपीय महासंघ हा आर्थिक निकषांवर उभा असला तरी त्याच्यामागची प्रेरणा राजकीय आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीय प्रदेशात हिटलरसारखा आक्रमक विस्तारवादी राष्ट्रवाद आकारास येऊन नरसंहार होऊ नये, म्हणून केलेला हा प्रयोग. आणि तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीसुद्धा झाला. या संघटनेतून ब्रिटनने बाहेर पडावे या मागणीसाठी चालवली गेलेली चळवळ 'ब्रेग्झीट' या नावाने ओळखली जाते. २३ जून २०१६ रोजी याबाबत ब्रिटन मध्ये सार्वमत(Referendum) घेतले गेले. त्यात जवळपास ५२ टक्के नागरिकांनी 'ब्रिटनने बाहेर पडावे' या बाजूने कौल दिला. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून हे स्वतः (आणि डावा नेता जिम कोर्बीन हा सुद्धा ) 'ब्रेग्झीट'च्या विरुद्ध म्हणजे ब्रिटनने महासंघातून बाहेर पडू नये या मताचे आहेत. मात्र जनतेने उघड विरोधी कौल दिल्याने, त्याचा मान राखत त्यांनी ऑक्टोबरमध्ये पायउतार होण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता 'ब्रेग्झीट'ची कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया नवीन येणारा नेता सुरु करेल. असा हा एकंदर विषय आहे.
मग ब्रिटन बाहेर का पडतो आहे ?
   यामागे असलेल्या कारणांपैकी एक म्हणजे महासंघात राहिल्यामुळे बाहेरील जगाशी व्यापार करण्यात येत असलेले निर्बंध ब्रिटनला आता नकोसे झाले आहेत. त्यातून फायद्यापेक्षा तोटाच अधिक होतो आहे, असे 'ब्रेग्झीट'वाद्यांचे म्हणणे आहे. त्यात राजकीय बंधनांचीसुद्धा भर आहेच. युरोपीय महासंघात असल्यामुळे ब्रिटनला महासंघाच्या धोरणांप्रमाणे स्थलांतरितांना स्वीकारावे लागत आहे. यात मुख्यतः सिरीयाच्या प्रदेशातून होत असलेल्या मुस्लीम स्थलांतराचा बागुलबुवा 'ब्रेग्झीट'वादी दाखवत असतात. याचबरोबर महासंघामुळे कामगार कायदे तसेच अन्य व्यवस्थांवर येणारी बंधने झुगारण्याची ब्रिटनला गरज भासू लागली होती आणि त्याचा परिणाम 'ब्रेग्झीट' मध्ये झाला आहे.
ब्रिटनचे बाहेर पडणे बरोबर आहे का चूक ?
   युरोपीय महासंघ हा एक 'Trade Bloc' आहे. त्यामुळे जागतिकीकरणाच्या आणि मुक्त व्यापाराच्या जडणघडणीत त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे अनेक अर्थतज्ज्ञ महासंघाचे महत्त्व कमी होणे हे धोक्याचे असल्याचे सांगत आहेत. यामुळे ब्रिटनला निर्बंधातून मुक्ती मिळेल, पण महासंघात असल्याचे जे आर्थिक फायदे होते ते मात्र त्यांना गमवावे लागतील. मात्र 'ब्रेग्झीट'वाद्यांचा मुद्दा असा आहे जर एखादे राष्ट्र आपल्या हिताचा निर्णय घेऊ इच्छित असेल तर त्यात बाकीच्यांना नाक खुपसायचे कारण नाही. देश प्रथम, आणि मग आंतरराष्ट्रीय राजकारण - असा प्रवाह 'ब्रेग्झीट'च्या पाठीमागे उभा राहिल्यानेच त्या चळवळीला यश मिळाले आहे.
याचे परिणाम काय होतील ?
१) ब्रिटनवर आता महासंघाची बंधने नाहीत. त्यामुळे जगातील उर्वरित देशांशी आर्थिक संबंधांबाबत ब्रिटन स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो. 
२) मात्र महासंघाच्या मार्गे जे करार झाले आहेत, त्यात मुख्यत्वे अमेरिका आणि ब्रिटन यांचा व्यापार-करार आहे, ब्रिटनला ते सर्व नव्याने करावे लागतील. कारण महासंघातून बाहेर पडल्यामुळे सद्यस्थितीतील करार संपुष्टात येतील.
३) ब्रिटनचा युरोपीय राष्ट्रांशी दुरावा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगातील इतर महत्त्वाच्या देशांबरोबर ब्रिटन व्यापारी संबंध सुधारायचे प्रयत्न करेल. या देशांत भारताचाही समावेश आहे. यामुळेच ही घटना भारतासाठी संधी असेल, असे मानले जात आहे.
४) युरोपीय महासंघासाठी मात्र ही धोक्याची घंटा आहे. या बाहेर पडण्याच्या प्रवृत्तीचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ग्रीस, नेदरलँड्स सारखे देशसुद्धा सार्वमत घेऊन बाहेर पडण्याचा विचार करू शकतात. असे झाल्यास युरोपीय महासंघ अजून कमकुवत होत जाईल.
५) आत्तापर्यंत युरोपीय महासंघ ही जगातील प्रमुख आर्थिक आणि राजकीय संघटना राहिलेली आहे. त्यामुळे महासंघाला होणारे नुकसान किंवा त्याची घटणारी ताकद या जगाचा सत्तासमतोल (Balance of Power) बदलू शकते. यात आर्थिक आणि राजकीय अशा दोन्ही प्रकारच्या परिणामांचा समावेश होतो.

   हे सर्व लक्षात घेतल्यानंतर, असे म्हणता येईल की 'ब्रेग्झीट' ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत विलक्षण आणि दिशादर्शक घटना आहे. यामुळे ढवळून निघालेल्या आंतरराष्ट्रीय वातावरणाचे इष्ट आणि अनिष्ट पडसाद किमान पुढील दोन दशके तरी जाणवत राहतील, हे नक्की.

ज्यांना या विषयाबाबत अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी काही लिंक्स -
1. ‘Brexit’ explained, in 13 simple points
2. Brexit Explained: What It Is and How It Could Change the World
3. A background guide to “Brexit” from the European Union
4. Brexit’s Real Impact Would Be Gradual and Global

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा