गुरुवार, १६ जून, २०१६

ट्रम्प आणि वेडी आशा !


कालच हिंदुत्ववादी गोटातील एक पोस्ट वाचली. की ट्रम्प निवडून यावेत यासाठी प्रार्थना करा, सपोर्ट करा वगैरे... दुसरीकडे एका ठिकाणी म्हणे ट्रम्प जिंकावा म्हणून यज्ञसुद्धा चालले आहेत ! आणि याचे कारण असे की, म्हणे ट्रम्प आयसीस पर्यायाने कट्टर जिहाद्यांच्या/मुस्लीम धर्मांधांच्या विरोधात आहे...
माझ्या भोळ्या मित्रांनो, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा हौशी अभ्यासक असल्यामुळे मला जे माहित आहे ते सांगतो, जरा ऐका. ट्रम्प हा माणूस विचित्र आहे.ट्रम्पने भारतीयांचा नुकताच भर सभेत अपमान केला होता. त्यानंतर परत कोलांटी उडी सुद्धा मारली होती. ट्रम्पचा आयसीस विरोध हा त्याच्या अमेरिकन (मूलनिवासी ?) अस्मितेचा भाग आहे ! तो असं म्हणतो की (भारतीय ?), मुस्लीम, मेक्सिकन या लोकांनी अमेरिकेत येऊ नये, कारण आम्हाला आमच्या 'संस्कृती'ची अस्मिता आणि ताकद वाढवायची आहे. मजा अशी की जगमान्य मान्यतेनुसार अमेरिकेला कल्चर असे नाहीच ! जे होते ते तिथल्या (खऱ्याखुऱ्या मूलनिवासी) रेड इंडियन लोकांबरोबरच नाश पावले. त्यामुळे सद्यस्थितीत अमेरिकेत जे काही आहे ते कॉस्मोपॉलिटिन आणि पॉप कल्चर असे काहीसे आहे. ज्याचा अर्थ जगातील विविध लोक ज्यात ब्रिटीश, य्रुरोपिअन, आफ्रिकन, आशियाई अशा सर्व वंशाचे लोक मिळून अमेरिकेचे सध्याचे कल्चर बनले आहे.त्यामुळे ट्रम्प जी 'दारे बंद करू पाहतो' आहे, ती केल्यास अमेरिकेचे 'अमेरीकीत्व' संपून जाईल !! त्यामुळे अमेरिकेच्या तथाकथित 'संस्कृती' आणि 'अस्मिता' यांचे रक्षण करणारा ट्रम्प मुस्लीम/मेक्सिकन यांच्यावर बंदी घालायची भाषा करतो तेव्हा गंमत वाटते ! कारण अमेरिकेच्या घडणीत मुस्लीम आणि त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात मेक्सिकन कामगारांचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना हाकलून ट्रम्प फारतर कृतघ्नपणा दाखवू शकेल !
आता राहिला मुद्दा आयसीसचा... आयसीस हा भस्मासुर आहे. त्यामुळे त्याला विरोध करणे स्वागतार्हच आहे. मात्र ट्रम्पच्या डोक्यात काहीच्या काही आयडिया आहेत. पहिली बाब म्हणजे आयसीसचा खरंच खात्मा करायचा असेल तर भूदल या लष्करी प्रकाराचा वापर अमेरिकेकडून केला जायला हवा. पण लांब कुठल्या तरी देशात आपले सैनिक मरायला पाठवायला अमेरिकेतील लोक आता मुळीच तयार होणार नाहीत. त्यामुळे ट्रम्प फार तर हवाई हल्ले करेल जे परिणामकारक नाहीत हे दिसते आहे. दुसरे म्हणजे मुस्लीम प्रवेशबंदी ! हे करून ट्रम्प स्वतःच्या देशाने निर्माण केलेल्या प्रश्नापासून पळ काढतो आहे. मुळात आयसीसच्या वाढीमध्ये अमेरिकेचा निःसंदिग्धपणे हात आहेच. 'अरब स्प्रिंग' च्या भूलभुलैयात अमेरिकेने सरसकट बंडखोरांना ताकद दिली. ज्यात आयसीसचा सुद्धा समावेश होतो. जरी 'आयसीसचा प्रत्येक क्रूरपणा हा अमेरिकेची चूक म्हणून आयसीसवर पांघरूण घालायचे' हा कम्युनिस्ट मूर्खपणा चुकीचा असला; तरी आयसीसच्या निर्मिती आणि वाढीत अमेरिकेचे स्वार्थी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप पूरक ठरले हे नाकारता येत नाही. त्यामुळे मुस्लीम प्रवेशबंदी करून आयसिसची जबाबदारी अमेरिकेने झटकून चालणार नाही. आणि त्याहीपुढे ट्रम्प जे कठोर आणि सडेतोड अविर्भावात बोलतो आहे, तसे तो सत्ता मिळाल्यावर करेलच/करू शकेल असे नाही ! त्यामुळे ट्रम्पमुळे जिहाद्यांवर आळा बसेल, भारताचे त्यासंबंधीचे प्रश्न सुटतील ही सगळी दिवास्वप्नेच आहेत.
आता याचा अर्थ हिलरी आल्याने कल्याण होईल असाही नाही ! मुळात ट्रम्प किंवा हिलरी हा निवाडा अमेरिकेतील जनतेचा आहे. तो यथायोग्य पार पडेलच. मात्र इथे राहून उगाच 'डोनाल्ड ट्रम्प'ची वेडी आशा बाळगणाऱ्या लोकांनी भ्रमातून बाहेर यावे, यासाठीच हा लेख प्रपंच...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा