शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

सलमानची सुटका आणि "पैसा बोलता है"

सलमान खानला निर्दोष सोडल्यानंतर , 'पैसा बोलता है' असल्या थाटाच्या कमेंट होताना दिसत आहेत. ज्यावेळी सलमानला दोषी ठरवले त्यावेळी भारतीय न्यायव्यवस्था खूप भारी आहे हे म्हणणारे लोक आता त्याच न्यायव्यवस्थेवर अविश्वास का दाखवतात ? आपल्या अपेक्षेच्या विरुद्ध निर्णय दिला की 'पैसा बोलता है' हे म्हणणे आपण लोकशाहीसाठी 'अपरिपक्व' आहोत हे दाखवून देण्याचा प्रकार आहे... सलमानला सोडण्यामागच्या लॉजिक विषयी मतभेद असू शकतात , पण त्यावर वरिष्ठ कोर्टात दाद मागता येते ! ते न करता 'पैसा बोलता है' असे म्हणणे हा मूर्खपणा आहे. सलमानला शिक्षा झाली तेव्हा त्याला तो 'समाजकार्य' करतो म्हणून शिक्षा होऊ नये असला युक्तिवाद करणारे आणि आता त्याची मुक्तता झाल्यावर 'पैसा बोलता है' म्हणणारे एकाच दर्जाचे मूर्ख आहेत ! आपल्याला अपेक्षित निर्णय दिला नाही म्हणजे न्यायव्यवस्था 'बिकाऊ' आहे असे म्हणणे हा न्यायव्यवस्थेचा अपमान तर आहेच , पण त्याचबरोबर 'लोकशाही' साठी अत्यंत घातक आहे. स्वतःला 'चौथा स्तंभ' म्हणवणारे न्युजचॅनेलवाले सुद्धा 'न्याय गरिबाला नाही' असाच सूर लावत आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांच्या भावना निरागस आहेत , पण त्या दाखवून सवंगपणे आपल्या तुंबड्या भरणारे न्युजचॅनेलवाले हे निर्लज्ज नाहीत काय ?
इथे सलमानची बाजू घेण्याचा प्रश्नच नाही ... पण उद्या कमजोर पुराव्यांमुळे दाउद जरी सुटला तरी त्यामुळे न्यायव्यवस्था 'बिकाऊ' आहे असं म्हणणं चुकीचंच असेल. भावनांच्या भरात आपण कशाला नख लावतो याचे भान ठेवणे गरजेचे आहे. आपण 'पैसा बोलता है' असं सहजपणे म्हणत असताना , जे लाखो लोक न्यायव्यवस्थेकडे न्यायासाठी प्रामाणिकपणे लढत असतात , त्यांच्यावर अन्याय करतो... सलमान या लोकांपेक्षा हुशार आहे ! त्याने सुज्ञपणे आपली बाजू लढवली आणि केस जिंकली. त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून तो सुटला हे म्हणून आपण काहीही साध्य करत नाही ! 
मग दोष कोणाचा ?
ज्या लोकांना अजूनही सलमान दोषी असल्याच्या आपल्या तर्कावर विश्वास असेल तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील लढाईसाठी प्रयत्न करावेत. राज्य सरकारवर सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी दबाव टाकावा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोलीस यंत्रणेतील त्रुटी शोधून काढून त्या दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा करावा ... 
मात्र हे न करता  'पैसा बोलता है' छाप कमेंट मारून आणि न्यायव्यवस्था बिकाऊ आहे असे म्हणून आपण आपल्याच पायावर धोंडा मारतो आहे याचे भान आपण ठेवायला हवे !!

२ टिप्पण्या:

  1. कोर्टाचा संशय येत नाही. पोलिसांचा संशय केवळ ह्याच साठी व असा येत आहे की त्यांच्यावरही ट्रायल बाय मिडीयाचा प्रयोग करून दबाव तर नाही आणला ना ? कारण सलमानला अपघाता नंतर संबंधित कायद्या नुसार लगेच जामिन मिळाला होता... तो कायदाच तसा असल्याने जामिन मिळाला. मात्र बगळेने त्या बाबत लगेच जन हित याचिका वैगैरे केली आणि सेलेब्रेटींना खास वागणूक मिळते ही ओरड सुरू झाली.
    पुढे कोर्टा समोर कै. पाटिलने "दारू पिऊन गाडी चालवणार्‍या सलमानच्या गाडी खाली लोक्स चिरडे" हे जास्तीचे विधान केले जे त्याच्या मूळ एफ आय आर मधे नाही.
    प्रश्न हा आहे की मूळ एफ आय आर मधे एक पोलीस इतका म्हत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपीचे नाव देण्यास कसा विसरला ? नंतर बगळेच्या जनहित याचिकेच्या दबावा मुळे त्याने तसे केले काय ? सलमानला अपघाता नंतर घरी का जायला दिले > लगेच मद्य प्राशनाची चाचणी न घेता १२ तासांनी का घेतली ? कमाल खानला साक्षिला आणले नाही ? पोलिसांनीच सलमान सुटावा म्हणून योजना केल्याचे दिसते असे का ?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बरोबर आहे. कोर्टावर संशय घेऊन / 'न्याय' विकला जातो असे म्हणून काहीच साध्य होत नाही. पोलीस तपासातील त्रुटींचा शोध आणि पाठपुरावा करायचा सोडून अरण्यरुदन करणे हे चुकीचे आहे, हेच लेखकाचे मत आहे. प्रतिक्रियेबद्दल आभार.

      हटवा