शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

भयचिकित्सा

भय हा माणसाच्या मनातील एक गूढ कोपरा आहे ! भूत नसतंच असं म्हणून हा संपूर्ण विषय उडवून लावणे अत्यंत सोपे आहे. मात्र भूत खरं किंवा खोटं असलं तरी भीती आणि त्या भयाचे मानवी परिणाम सत्य आहेत. भूत हा विषय संपूर्ण कळून घेऊन, मोकळ्या मनाने विचार करून भयमुक्त झालेले फार थोडे लोक असतात. उरलेले 'जग चंद्रावर गेलं, म्हणून भूत नसतं' असं अजब तर्कट लावणारे लोक अंधारात आणि स्मशानाजवळून जाताना घाबरलेले दिसतात ! मात्र 'घाबरट' किंवा 'कायर' हा शिक्का बसेल, लोक आपल्याला मागास म्हणतील, म्हणून या विषयावर सहसा चर्चा होत नाही... मनात अनेक भय-शंका वेताळासारख्याच कायम लटकून असतात. (त्यामुळे भयकथा लिहिणारे खुश असतात तो भाग वेगळाच ! ) म्हणून अशाच गूढ, भुताटकी, भयकथा वगैरे गोष्टींबद्दल सविस्तरपणे विचार मांडायचा हा एक प्रयत्न...

माणूस आणि भूत यांचे Love-Hate Relationship !!

माणसाला भूत हा प्रकार नवा नाही ! प्राण्यांपेक्षा उन्नत बौद्धिक पातळीवर असल्यामुळे माणसाला प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र माणसाला जुन्या काळी आणि आत्तापर्यंतदेखील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती किंवा मिळाली नाही आहेत... म्हणजे पुरातन काळातील, मध्ययुगातील मानवाला सूक्ष्मजीव, मानसशास्त्र वगैरे गोष्टी माहित नव्हत्या ! वीज का चमकते, आग का लागते या गोष्टीसुद्धा माणसाला दीर्घकाळापर्यंत माहितच नव्हत्या. मग निसर्गातील या कोड्यांची तर्कशुद्ध उकल मिळाली नसल्याने, माणसाने स्वतःची कल्पनाशक्ती पणाला लावून, अंदाज बांधत\, स्वप्नरंजन करत काही गोष्टी उत्तर म्हणून स्वीकारल्या ! निसर्गातील भव्य-दिव्यतेचे कारण म्हणून मग माणसाने देव,धर्म,पूजा या गोष्टी मानल्या... मात्र त्याचबरोबर याची काळी बाजूही वाढत गेली ! म्हणजेच माणसाने सैतान, भूत, पिशाच्च, चेटूक या संकल्पनाही स्वीकारल्या, त्यात कल्पनांची भर पडत गेली... त्यामुळेच जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात, जिथे जिथे मानवी संस्कृती आढळते, तिथे तिथे भूत-खेत वाल्या गोष्टी, थेअरी आणि कल्पना आढळतात ! प्रत्येक प्रदेशानुसार भूत-सैतान-प्रेत यांचे आकलन भिन्न आहे. उदाहरणार्थ भारतात - चेटकिणी, जखीण, समंध, ब्रह्मराक्षस, हडळ हे प्रकार नीट अभ्यासले तर या भूतांवर भारतीय समाजातील चाली-रिती-रूढी यांचा प्रभाव स्पष्ट दिसतो ! तर तिकडे युरोपात गेलात तर Witches, Dracula, Vampire ह्या मंडळींनी लोकांना शतकानुशतके ग्रासले आहेच.. Zombie ही अमेरिकेची देण असावी. इस्लाममध्येही Jinn आहेत, तर चीन-जपान मध्येतर त्यांच्या भूतांचे स्वतंत्र कळप आहेत ! त्यामुळे जिथे जिथे माणूस आहे, तिथे तिथे भुताटकी त्याच्या मानेवर बसलेलीच आहे !!
त्यामुळे कोणीच कोणाला भूतावरून चिडवायची गरज नाही ! भूत प्रेत आत्मा या जागतिक गोष्टी आहेत...
जीन लोकांनी कुराण ऐकले !

आता यातील बहुतांश दावे आणि विश्वास हे शास्त्रकाट्याच्या कसोटीवर घासलेले नाहीत... त्यामुळे भूत आणि भय या गोष्टींचा एकंदर डोलारा हा दंतकथा, 'माझ्या काकांची/मामाची गोष्ट' यावर आधारलेला आहे... गंमत म्हणजे मी भूत बघितले हे सांगणारे मिळत नाहीत. माझ्या काका/मामा/आजोबांनी ते बघितले आहे हे सांगणारे खूप लोक मिळतील ! मात्र सगळेच फसवत असतात असे नाही. बऱ्याच जणांकडे तर्कशुद्ध वाटावी अशी कारणे असतात. मात्र त्यांचा उलगडा न करता, त्यांना 'अंधश्रध्द' म्हणून लेबले मारली, की असे लोक मनात कायमचेच भूत-वादी बनतात... वास्तविक, जे दुसऱ्याची खिल्ली उडवून त्याला 'जग चंद्रावर गेले' असं सांगतात; त्यांच्याकडे Supernormal किंवा Paranormal म्हणवल्या जाणाऱ्या घटनांचे तार्किक स्पष्टीकरण उपलब्धच नसते ! त्यामुळे बऱ्याचवेळा 'भूत नसते' असे मानणारेही अर्धवट, अंधश्रद्धच निघतात ! मात्र भूत किंवा गूढ मानल्या जाणाऱ्या अनेक अनुभवांचा प्रामाणिक पणे पूर्वग्रह सोडून मागोवा घेतल्यास स्तिमित करणारी करणे विज्ञान पुढे आणते...
Vladimir Gavreau with his Sonic Weapon

एका शास्त्रज्ञाला जाणवलेल्या भुताटकीची गोष्ट इथे थोडक्यात सांगतो... गोष्ट आहे सुमारे १९५० च्या आसपासची. Vladimir Gavreau नांवाचा एक शात्रज्ञ त्याच्या प्रयोगशाळेत काम करत होता. तेव्हा त्याच्या एका मदतनीसाच्या कानातून रक्त येत असल्याचे त्या शास्त्रज्ञाला जाणवले ! नंतर त्याने एका विशिष्ट परिमाणे असलेला धातूचा पाईप कंप पावेल अशी व्यवस्था करून, प्रत्येक मदतनीसावर त्याचे परिणाम आजमावले... त्याने शोधलेले परिणाम हे Infra Sound चे होते.  त्यानंतर तज्ञांनी आणि अनेक संशोधकांनी ७ ते सतरा हर्ट्झ इतक्या फ्रिक्वेन्सीचे ध्वनी माणसाला घाबरवू शकतात किंवा त्रस्त करू शकतात असे अनुमान काढले !
Vic Tandy

मात्र याने भूत दिसण्याचे, सावल्या हलल्याचे जाणवण्याचे स्पष्टीकरण मिळत नाहीच ! त्यासाठी अजून एका संशोधकाने केलेला भुताटकीचा पाठलाग इथे सांगतो ! त्याचे नांव Vic Tandy. ही त्याला काही कामगार व सेवकांना भूत, भास वगैरे जाणवत असल्याचे कळले, त्याने शोध घेऊनही कोणतेच कारण, विषारी वायू, मादक पदार्थ सापडेना. शेवटी त्याला एक विचित्र गोष्ट आढळली ! तिथे एक Exhaust Fan होता, जो काही बिघाडामुळे थरथरत होता. मात्र त्याचा आवाज हा जवळपास १८.९ हर्ट्झच्या जवळपास असल्याने ऐकू येत नव्हता. मात्र प्रयोगशाळेच्या भिंतींवरून तो ध्वनी आदळून खोलीमध्ये असलेल्या लोकांना छळत होता ! मानवी डोळ्यांची पटले त्या फ्रिक्वेन्सीला फसतात, आणि मग "Smeared Vision' नांवाचा प्रकार अनुभवायला मिळतो. यामुळे आकृत्या, सावल्या, उडते आकार वगैरे दिसू शकतात. त्यात मानवी कल्पनेची भर पडली की भुताटकी तयार होते हे Vic Tandy च्या लक्षात आले ! त्यानंतर हा Tandy भुतांच्या जणू मानेवर बसला !! त्याने शापित घरे धुंडाळून काढली, आणि तिथेही हाच १८.९ हर्ट्झचा सिद्धांत लागू पडल्याचे त्याने नोंदवले आहे... त्यामुळे भुते दिसण्यामागे मानवी बुब्बुळे Hang होणे हे महत्त्वाचे कारण लक्षात येते !
Out of Body !

यानंतरही अनेक मुद्दे उरतात ! त्यातील काहींची उत्तरे विज्ञान इतकी चपखलपणे देते की भयकथा वाचताना मला बऱ्याचदा त्या गोष्टी आठवून हसू येते... दाखल्यासाठी Out Of Body अनुभवाचा विचार करू ! बऱ्याच लोकांना आपण हवेत तरंगतो आहोत, आपली दुसरी प्रतिमा समोर आहे, कोपऱ्यात कोणीतरी आहे वगैरे भास होतात... हे सगळे मेंदूचे आणि त्यातील विशिष्ट भागांच्या Hang होण्याचे किंवा Hack होण्याचेच प्रकार आहेत, असे विज्ञान दाखवून देते. कारण मेंदूचा विशिष्ट हिस्सा विद्युतप्रवाहाने Stimulate करून, तसेच Out of Body अनुभव घडवता येतात, असे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.
भूतांची निर्मिती !!

तसेच भूत दिसणे, अनुभवणे यामागे मानवी मेंदूच्या Pattern प्रेमाचा हात असतो... माणूस उत्क्रांत होताना, निसर्गात अस्तित्त्व टिकवताना Pattern ओळखून चटकन निर्णय घ्यायला शिकला आहे. उदा. पट्टेरी वस्तू बघून वाघाची शंका, किंवा दोरीला साप समजणे इत्यादि... या गोष्टीचा मानवला निसर्गात टिकून राहण्यात फायदाच झाला आहे, धोके लवकर कळल्यामुळे जीव वाचवता आले आहेत ! मात्र काहीवेळा Patter ओळखण्याच्या सवयीमुळे भ्रम होतात ! मग एखादे हवेत तरंगणारे कापड म्हणजे पांढरी साडी नेसलेली 'वो' वाटू शकते !!
कार्बन मोनोक्साईडचे परिणाम !

अशा प्रकारे बऱ्याच हॉरर गोष्टींचे वैज्ञानिक स्पष्टीकरण रंजक आणि तितकेच स्तिमित करणारे असते... Planchette मागचा Ideomotor Effect, सर्वांना भूत दिसण्याचा म्हणजे Mass Hallucination चा प्रकार, शापित घरांमधील Infra Sounds किंवा भ्रमिष्ट करणारा Carbon Monoxide नांवाचा वायू असे प्रकार लक्षात घेतले की भयाचे गूढ उकलु लागते ! समजेपर्यंत Magic वाटणारी गोष्ट Logic समजले की नैसर्गिक, सहजसिद्ध वाटू लागते... त्यामुळे पुढच्या वेळी रात्री 'कोई है' असं वाटलं तर गुगलमैय्याला विचारा आणि विज्ञानाच्या भिंगाने त्या 'वो'चा शोध घ्या ! 
घाबरू नका, कवटी मंजन मुळे दात बरे आहेत तिचे !!
Vic Tandy सारखं भुतांच्या मानेवर बसलं की मग हडळ/Vampire/Jinn/Yūrei की तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत... नुसतंच भुताचा विषय उडवून लावून, मनात त्याला कायमचे 'झाड' देण्यापेक्षा; विज्ञानाची छडी घेऊन भुते नाचवायला आली पाहिजेत... मांत्रिक बाबाच्या नादीला लागणारे असंख्य सुशिक्षित लोक आज दिसतात... करणीला घाबरणारे, उगाच विषाची परीक्षा नको म्हणणारे लोकही वरकरणी 'आम्ही भूत मनात नाही' हे बोलतातच ! प्रगत समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतही सुमारे ४५ % लोक भूताला घाबरून आहेत, त्यामुळे भारतात त्यांची टक्केवारी मोजण्याचा धीरच होत नाही... यावर उपाय एकच ! Open Minded राहून, वैज्ञानिक धाडस आणि कुतूहल जागे ठेवावे, ज्ञानजिज्ञासेने कारणे शोधावीत... मनात उलट्या लटकणाऱ्या भयपिशाच्चाला पळवायचा हाच सर्वोत्तम मंत्र आहे !

संदर्भ व अधिक वाचनासाठी लिंक्स -

१. माझे भूत आहे/नाही या दोन्ही गटांना असलेले काही रंजक तार्किक प्रश्न

२. माझी आवडती वेबसाईट Cracked.Com वरील दोन अप्रतिम लेख -
http://www.cracked.com/article_18828_the-creepy-scientific-explanation-behind-ghost-sightings.html
http://www.cracked.com/article_23124_5-famous-paranormal-phenomena-easily-debunked-by-science_p2.html

३. माझी अजून एक आवडती वेबसाईट Listverse.Com वरील दोन अफाट List-Articles -
http://listverse.com/2013/09/30/10-scientific-explanations-for-ghostly-phenomena/
http://listverse.com/2013/07/11/10-famous-photos-of-the-paranormal-that-arent/

४. शापित घर 'शापमुक्त' करण्याचे 'तांत्रिक' उपाय !!

५. भूतांना वाहिलेली एक वेबसाईट

६. जगातील भूतांच्या प्रकारांची यादी !

७. अमेरिकेतील लोकांच्या भूतावरील विश्वासाचा सर्व्हे

(लेखात वापरलेल्या Images चे श्रेय त्यांच्या मूळ निर्मात्यांना/संकेतस्थळांना)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा