सोमवार, २६ जून, २०१७

हॅरी पॉटरच्या दुनियेत : Albus Dumbledore

Albus Dumbledore !


हॅरी पॉटरच्या शाळेचा हेडमास्तर... Prof. Dumbledore म्हणजे -
पांढरी दाढी, मिश्किल डोळे आणि वयाबरोबर आवाजात आलेली अनुभवाची खोली... हॅरीच्या दुनियेतला सर्वात ताकदवान Wizard, Order of Phoenix चा प्रमुख आणि हॅरीला वाट दाखवणारा, वाचवणारा आणि शिकवणारा आदर्श आचार्य  !

या अफाट पात्राच्या नांवाचा अफाटतेची सुरुवात त्याच्या नांवांपासून होते ! त्याचे पूर्ण नांव - 'Albus Percival Wulfric Brian Dumbledore' असे भले मोठ्ठे आहे... 
पैकी Albus म्हणजे शुभ्र, 
Percival हा शब्द लढाईचा इतिहास असल्याची हिंट देतो (हे नांव किंग आर्थरच्या दरबारातील ख्यातनाम सरदाराचे होते !) 
Wulfric चा जरासा विचित्र अर्थ wolf power असा येतो ज्याचा इथला अर्थ भन्नाट ताकद इतकाच घेऊ,
Brian या जुन्या Celtic शब्दाचा अर्थ आहे महान/उच्च नैतिक मूल्ये असलेला 
आणि Dumbledore या बऱ्याच जुन्या शब्दाचा अर्थ आहे 'Bumblebee' किंवा 'Humble bee' म्हणजे माशीचे कानाला गोड गुणगुणणे !
या पैकी Albus हे नांव आपल्या मिश्किल हेडमास्तरच्या आयुष्याचं, भूमिकेचं सर्वात अचूक वर्णन आहे ! व्होल्डमोर्टला डार्क लॉर्ड म्हणतात त्यामुळे Albus हे नांव त्यांच्यातील द्वंद्व अचूक टिपते...

Dumbledore शिवाय हॅरी पॉटरच्या सिरीजमध्ये काहीच उरत नाही असे म्हटले तरी वावगे ठरत नाही... ज्यांना हॅरी पॉटर कळलंय त्यांना माहीतच असेल की खरी लढाई हॅरी विरुद्ध व्होल्डमोर्ट अशी नसून Dumbledore विरुद्ध व्होल्डमोर्ट अशी आहे... हॅरी हा त्या लढाईचा महत्त्वपूर्ण मोहरा आहे, पण लढाईचा सूत्रधार Dumbledoreच आहे... Dumbledore आणि व्होल्डमोर्ट यांच्या विचारसरणीतील युद्ध म्हणजे हॅरी पॉटर सीरिज... 

मृत्यूला थकवा आल्यानंतर आलेली सुखाची निद्रा मानणारा Dumbledore विरुद्ध मृत्यूपासून पळणारा, अमर होण्यासाठी Horcrux, Unicorn Blood सारख्या अघोरी उपायांना वापरणारा लॉर्ड व्होल्डमोर्ट...

विझार्ड असोत, mudblood असोत किंवा muggles त्यांना वागणूक समानतेचि मिळावी हे मूल्य दर्शवणारा Dumbledore विरुद्ध शुद्ध रक्ताची, उच्च वंशाची, वर्णवर्चस्वाची काळी बाजू दर्शवणारा लॉर्ड व्होल्डमोर्ट !

Elder Wand असलेल्या Gellert Grindlewald ला हरवून, त्या छडीची मालकी मिळवणारा, अफाट ताकद-ज्ञान आणि अनुभव असलेला परंतु आयुष्यात एकदाही Avada Kedavra हा मृत्युमंत्र न वापरणारा Dumbledore
विरुद्ध Elder Wand च्या ताकदीसाठी हपापलेला, परंतु तिची मर्जी कधीच न लाभलेला; Avada Kedavra हा ज्याचा Signature Spell आहे असा डार्क लॉर्ड व्होल्डमोर्ट !

Dumbledore काही scenes मध्ये तर मनावर कायमची छाप पाडून जातो ! सगळे सांगणं कठीण आहे तरी त्यातील सर्वोत्तम मानावा असा एक प्रसंग म्हणजे - Order Of The Phoenix या भागातील Ministry Atrium मध्ये हॅरीला वाचवण्यासाठी लॉर्ड व्होल्डमोर्टसमोर उभा ठाकणारा Dumbledore ! इथे व्होल्डमोर्ट पूर्ण आक्रमक असतो, मृत्यूमंत्रांचे वार करत असतो, Fiendfyreची माया वापरतो... उलट Dumbledore मात्र हॅरीला वाचवण्यासाठी, व्होल्डमोर्टला तटवून ठेवून Aurors समोर त्याला उघडं पाडण्यासाठी लढत असतो... तरीही शेवटी Dumbledore व्होल्डमोर्टला जड जातो !त्यांच्यातील Dumbledore  व्होल्डमोर्टला मात देऊन जातो...

व्होल्डमोर्ट त्याला खुन्नस देत विचारतो : “You do not seek to kill me, Dumbledore?” “Above such brutality, are you?”
आणि Dumbledore शांतपणे उत्तरतो : “We both know that there are other ways of destroying a man, Tom,” !!!

एकतर बाकीचे लोक त्याचं Voldemort हे त्याने परिधान केलेलं नांवसुद्धा घ्यायला घाबरत असताना, Dumbledore त्याला त्याच्या तोंडावर 'टॉम' या त्याच्या खऱ्या, बालपणीच्या नांवाने हाक मारतो !! आणि दुसरं म्हणजे - एखाद्याला संपवण्याचे जीव घेणाव्यतिरिक्त अजूनही मार्ग असतात असं Dumbledore त्या अमरत्वाचा आशेने झपाटलेल्या सैतानासमोर ठणकावून सांगतो !!! व्होल्डमोर्ट Dumbledoreच्या ताकदीपेक्षा या निडर, शांत, स्थितप्रज्ञतेला जास्त घाबरत असावा... त्या प्रसंगात पुढे व्होल्डमोर्ट कपटीपणाने हॅरीला झपाटतो. जेणेकरून Dumbledore त्याला संपवण्यासाठी हॅरीवर वार करेल आणि मग व्होल्डमोर्ट दुसऱ्या कुठल्यातरी Horcrux द्वारे पुन्हा जिवंत होऊन त्या भविष्यवाणीच्या भयातून मुक्त होईल. पण Dumbledore  शेवटी Dumbledore असतो ! 

तो त्याचं आधीचं वाक्य खरं करून दाखवतो. तो हॅरीला त्याची माणसं, चांगल्या आठवणी, हरमायनी-रॉनशी असलेली मैत्री, सिरीयसचं बलिदान आठवायला सांगतो !! त्या भावनांची allergy असलेला व्होल्डमोर्ट ते सहन न होऊन पळून जातो !! या प्रसंगातून Dumbledore डार्क लॉर्डचा तात्त्विक पराभव तर करतोच, पण त्याचबरोबर हॅरीला त्याच्याशी कसं लढायचं हे कायमसाठी शिकवून जातो... योद्धा बनलेला असताना त्याच्यातला गुरु जागाच असतो !

Dumbledore शेवटी स्वतःच बलिदान देतो, स्नेपकडून बलिदान घडवून आणतो आणि हॅरीला मृत्यूच्या दारातील काल्पनिक King's Cross स्टेशनवर शेवटचा उपदेश करून त्याला त्या डार्क लॉर्डवर शेवटचा घाव घालण्यासाठी सिद्ध करतो ! म्हणूनच ते युद्ध Dumbledore विरुद्ध व्होल्डमोर्ट असे असते... ज्यात Dumbledore  निर्विवादपणे जिंकतो, तेही त्याच्याच नियमांनुसार !!

Dumbledore च्या आधीच्या आयुष्यात Gellert Grindlewald शी त्याचे संबंध 'मैत्रीच्या पल्याड मधुर' असल्याचे रोलिंगबाईंनी सुचवले आहे ! होमोफोबिक प्रवृत्तींना ही एक प्रकारची साहित्यिक चपराक असावी !! Dumbledore सारखा शक्तिशाली, महान आणि आदरणीय माणूस समलैंगिक असला तरी महानच राहतो हे रोलिंगबाईंनी हॅरी पॉटरच्या प्रौढ वाचकांवर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे... माणसाचे लैंगिक आयुष्य हा त्याच्या योगदानाची, महानतेची आणि क्षमतेची पातळी जोखण्याचा मुद्दा नसावा हा संदेश Dumbledore च्या आयुष्यातील Grindlewald प्रकरण देऊन जातं... 

याच Grindlewald समोर, तो सैतान बनल्यावर Dumbledore उभा राहतो आणि त्याला हरवतो. पुढे Philosopher's Stone या भागाच्या शेवटी - Neville Longbottom चं कौतुक करताना Dumbledore म्हणतो - 
"There are all kinds of courage. It takes a great deal of bravery to stand up to our enemies, but just as much to stand up to our friends" 
Dumbledore वरचं वाक्य Grindlewald च्या बाबतीत अक्षरशः जगलेला असतो !!

Dumbledore हे मी वाचलेल्या साहित्यिक पात्रांपैकी सर्वांत महान पात्रांपैकी एक आहे.... Dumbledore सारखी पात्रे असल्यामुळेच हॅरी पॉटर सीरिज ही 'kids' fiction' न राहता, मोठेपणीही तुम्हाला प्रगल्भ करत जाते... Dumbledore चे धडे आपण Muggles सुद्धा गिरवू शकतो - आपापलं 'खरं' आयुष्य जास्त समजून घेण्यासाठी आणि त्या समजेबरोबर शहाणं होण्यासाठी.... हे पात्र लिहिणे ही साहित्यिक पात्रनिर्मितीच्याबाबतीत रोलिंगबाईंना जवळपास व्यासांच्या बरोबरीला नेणारी गोष्ट आहे असं मला वाटतं !!

शेवटी Dumbledore म्हणजे कोण ?

Dumbledore म्हणजे “Do not pity the dead Harry. Pity the living, and, above all, those who live without love” म्हणणारा इहवादी तत्वज्ञ !

Dumbledore म्हणजे “After all, to the well organized mind, death is but the next great adventure” हे कळलेला मृत्युंजय मानवी स्वभाव !

Dumbledore म्हणजे प्रगल्भ, अनुभवी तरीही सकारात्मक राहणारी मानवी वृत्ती !

Dumbledore म्हणजे “Happiness can be found even in the darkest of times, if one only remembers to turn on the light” म्हणत सैतानाशी लढण्याची प्रेरणा जागवणारा चाणाक्ष नेता !

Dumbledore म्हणजे गुरु कसा असावा हे सांगणारा वस्तुपाठ !!

Dumbledore म्हणजे ...

Dumbledore म्हणजे “It is our choices, Harry, that show what we truly are, far more than our abilities” हे जीवनरहस्य अलगदपणे शिकवणारा वृद्ध आचार्य !!!






(*सर्व चित्रे व छायाचित्रे गूगल इमेजेसवरून घेतली आहेत. त्यांचे हक्क त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन...)

७ टिप्पण्या:

  1. “It is our choices, Harry, that show what we truly are, far more than our abilities” हे फारच भारी वाक्य आहे, डम्बलडोअरचं. my All time favorite

    उत्तर द्याहटवा