लोकशाही आणि लोकसंख्या या दोन गोष्टी भारताला नव्या नाहीत! लोकशाही आपल्याकडे गेलं पाऊण शतक नांदते आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीत आपण भलतीच प्रगती करून आता जगात पहिला नंबर काढला आहे! त्यामुळे या लेखमालेचं शीर्षक असं का आहे असा प्रश्न पडू शकतो! यक्षप्रश्न या शब्दप्रयोगाचा उगम महाभारतात असावा. वनवास भोगणाऱ्या धर्मराजाला एक यक्ष काही जटील प्रश्न विचारतो असा एक प्रसंग अरण्यपर्वात आहे.
लोकशाही व्यवस्थेसमोर आजच्या काळात लोकसंख्येच्या विचित्र गणितांनी जे काही कूटप्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांची साधारण तोंडओळख वाचकांना व्हावी या हेतूने ही लेखमाला योजली आहे! या लेखमालेचे मुख्य संदर्भ हा भारतात होऊ घातलेले डीलिमिटेशन, त्यासंबंधित सुरू असलेले उत्तर - दक्षिण वाद, याचे महाराष्ट्रावरील परिणाम, प्रगत राज्यांच्या करावर पोसली जाणारी बिमारु राज्ये आणि तत्सम प्रश्न हेच असणार आहे.
मात्र हा प्रश्न ग्लोबल असल्यामुळे भारतातील गुंता समजून घेण्याआधी थोडा या विषयाशी आपला परिचय वाढावा म्हणून या लेखमालेत आपण कोरिया, आखात वगैरे प्रदेशात भ्रमंती करून त्यानंतर भारतातील समस्येला हात घालणार आहोत! तर आज या लेखमालेचा हा पहिला भाग...
भाग १ : कोरियन नूडल्सचा गुंता!
वाचकांपैकी अनेकांना साऊथ कोरिया माहितीच असेल. केपॉप आणि केड्रामामुळे अनेकांना त्यांच्या भाषेचा, संस्कृतीचा आणि एकंदरच नागरी जीवनाचा परिचय असेलच! ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगायचं तर - आपल्या लाडक्या गोंडस गब्रू गुलजार हुकुमशहा किम जोंग उन यांच्या दिव्य राजवटी शेजारी असलेला देश!
![]() |
South Korea has developed into one of Asia's most affluent countries since partition in 1948. The Communist North has slipped into totalitarianism and poverty. |
जगाच्या इतिहासात भांडवलशाहीने साम्यवादाला जे काही निर्णायक दणके दिले त्यापैकी साऊथ कोरिया हा एक! साऊथ कोरिया इतके संपन्न प्रदेश जगात फार कमी आहेत. साऊथ कोरियाने कमी काळात साधलेली आर्थिक प्रगती थक्क करणारी आहे.
या साऊथ कोरियाचे दरडोई उत्पन्न हे आपल्या दहा पटीहून अधिक आहे. २०२२ चे आकडे लक्षात घेतले तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आर्थिक निर्देशांकावर आपण म्हणजे भारत देश १.००० पैकी ०.६४४ इतका स्कोअर करतो. तर साऊथ कोरियाचा स्कोअर हा ०.९२९ इतका आहे! दुनियेतील अतिप्रगत असे जे काही देश मानले जातात त्यांच्यापैकी साऊथ कोरिया हा एक आहे.
![]() |
The O2 Arena in London during Blackpink's concert. |
साऊथ कोरिया नुसता पैशाने मजबुत आहे असंही नाही, या साऊथ कोरियाने आपला सांस्कृतिक ठसा जगभरात उमटवला आहे. केपॉपचे जगभरात फॅन आहेत, त्यांच्याकडील चित्रपट - के ड्रामा हे जगभरातील विविध भाषांमध्ये जोरदार खपतात! त्यामुळे साऊथ कोरियाची कल्चरल सॉफ्ट पॉवरसुद्धा त्यांच्या आर्थिक समृद्धीएवढीच दणकट आहे असं म्हणता येईल...
![]() |
The K-pop group BLACKPINK performs in Los Angeles during their Born Pink World Tour, November 20, 2022. (Christopher Polk / Penske Media via Getty Images) |
तर या कोरियन नमनाला घडाभर तेल वाहून झाल्यानंतर आता आपण त्यांच्या लोकसंख्येकडे वळू! सध्या साऊथ कोरियाची लोकसंख्या ही पाच कोटींच्या घरात आहे. पैकी एकट्या राजधानी सेउलमध्ये १ कोटींच्या घरात लोक वसलेले आहेत.
आता या कोरियन लोकसंख्येची समस्या समजून घेण्यासाठी आधी एक छोटीशी सांख्यिकी आकडेमोड बघून घेऊ. TFR म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट हा निर्देशांक एखाद्या प्रदेशातील प्रजननक्षम वयोगटातील महिला सरासरी किती मुले जन्माला घालतात याचे एक साधारण प्रमाण दर्शवतो. एखाद्या लोकसंख्येचा TFR हा साधारण २.१ इतका असेल तर ती लोकसंख्या बाहेरून माणसे आयात न करताही आहे त्या पातळीवर टिकून राहू शकते. यालाच रिप्लेसमेंट लेव्हल TFR असं म्हणतात. आता हे २.१ कसे आले यामागील गणित कोणाला सोडवायचे असल्यास चॅटजीपीटीला विचारावे लागेल! आपण सध्या हा आकडा लक्षात ठेवून पुढे जाऊ...
![]() |
A 2023 map of countries by fertility rate. Blue indicates negative fertility rates. Red indicates positive rates. |
तर २०२३ मधील सरकारी आकड्यानुसार साऊथ कोरियाचा TFR हा ०.७२ एवढा आहे! २.१ आणि ०.७२ हा फरक किती मोठा आहे हे समजून घ्यायचं असेल तर सोप्या भाषेत - या शतकाच्या अखेरीस साऊथ कोरिया सध्या दिसतो त्याच्या एक तृतीयांश इतकाच शिल्लक राहील!
हे नुसतेच आकडे झाले, पण जेव्हा जन्मदर एवढ्या प्रमाणात घसरतो आणि सरासरी वयोमान वाढलेले असते तेव्हा देशात म्हातारे जास्त आणि काम करणारे कमी अशी विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे अनेक भीषण सामाजिक समस्या, राजकीय पेचप्रसंग आणि आर्थिक संकटे तयार होतात! सध्याची वित्त भांडवलशाही ही येणाऱ्या पिढ्या आपल्याहून अधिक कमावतील आणि आपल्याहून अधिक खर्चही करतील असं गृहीत धरून भरमसाठ सरकारी कर्ज काढून चालवली जाते! जोपर्यंत येणाऱ्या पिढ्या चढत्या क्रमाने आय आणि व्यय करत राहतात तोपर्यंत हे धोरण विकासाला गती देत राहतं... पण येणारी पिढी ही अर्धीच असली तर? एक तृतीयांशच असली तर? त्यांचा TFR अजून कमी झाला तर?
आता कोणी म्हणेल की हे असं का झालं, किंवा हे झालं तरी TFR वाढवायला या श्रीमंत देशाला काय कठीण आहे! करा लॉकडाउन, टाका लोकांच्या खात्यात पैसे आणि सोडवा प्रश्न!! पण ही समस्या तशी वाटते तेवढी सोपी नाही...
जगभरातील भांडवली लोकशाही व्यवस्थांनी युनिव्हर्सल सफ्रेज आणि त्याला पूरक महिला सबलीकरण कायदे करून महिलांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग वाढवला. याला नव्या प्रजनन आरोग्य साधनांची- वैद्यकीय तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि अर्थार्जन करणारे हात वाढत गेले. जसजसे लोकशाही देश प्रगत होतात, सुबत्ता येते तसतसा महिलांचे परिवारातील स्वतंत्र अस्तित्व वाढत जाते, त्या निर्णय घ्यायला सक्षम होत जातात आणि यातून TFR घसरतो हा ट्रेंड जगभरात पहायला मिळतो. कोरियातही असाच काहीसा प्रकार झाला!
![]() |
Total fertility rate vs Human Development Index for selected countries, 2011 |
आता या TFR संबंधित प्रश्नाबद्दल इथे हे वाचून एखादा अँड्र्यू टाटेचा चेला चेकाळू शकतो आणि यात महिलांचा दोष आहे वगैरे टेपा वाजू शकतात! एखाद्या व्यवस्थेसमोरील प्रश्न हे अमुक गटांना व्हिलन ठरवून सुटत नसतात हा बेसिक मुद्दा कसा या मंडळींना समजत नाही आणि या सगळ्यातून कसं स्त्रियांना टार्गेट केलं जातं त्याबद्दल या लेखमालेत पुढे सविस्तर चर्चा करूच, तूर्तास फक्त साऊथ कोरियाचे आकडे पाहू...
ऐंशीच्या दशकात कोरियन TFR हा २.१ च्या बराच वर होता. तिथून २००० पर्यंत तो जवळपास निम्मा झाला आणि आता तो ०.७२ या पातळीपर्यंत घसरला आहे! गेल्या काही दशकांत झालेलं ही स्थित्यंतर लक्षणीय आहे. याच काळात कोरियाची राजकीय - आर्थिक - सामाजिक - सांस्कृतिक भरभराटही झाली ही स्पष्ट आहे.
![]() |
Change of total fertility rate (TFR) and life expectancy at birth (LEB) of South Korea and those of Japan between 1960 and 2016 |
तुम्ही दिव्यातील राक्षसाची गोष्ट वाचली असेल! दिव्यातून राक्षस बाहेर काढला की तो आपल्याला वरदान देतो! पण तो राक्षस परत दिव्यात बंद करता येत नाही!! आजच्या दुनियेतील कोरियासारख्या प्रगत लोकशाही व्यवस्थांनी महिला सबलीकरण करून त्याचे पुरेपूर लाभ उचलले. त्यांना त्यातून सुबत्ता लाभली, विकास झाला हे स्पष्ट आहे. मात्र या वरदानाची किंमत त्यांच्या जन्मदराला द्यावी लागली आणि आता कोरियात यासाठी खास मंत्रालय तयार करून आणि सढळ हाताने बजेट देऊन या प्रश्नाला सोडवण्याचे प्रयत्न करायची वेळ येऊन ठेपली आहे.
आता हे सगळं कोरियन पुराण वाचून कोणी म्हणेल की सरळ बाहेरून लोक का आणत नाहीत? स्थलांतर का नको? माणसेच हवी तर बिहारमधून न्या वगैरे आयडियाही कमेंटमध्ये दिसू शकतील! परंतु एखाद्या देशाने अशा मोठ्या प्रमाणात बाहेरून माणसे आणायची तर त्याचे काय परिणाम होतात हे सध्या युरोप आणि अमेरिकेत दिसत आहेत... या बाहेरून माणसे आणायच्या आयडियेची सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण पुढच्या भागात आखात फिरून येणार आहोत! तोपर्यंत 안녕히 가세요
संदर्भस्त्रोत:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा