शुक्रवार, २८ मार्च, २०२५

"इमरान प्रतापगढी विरुद्ध गुजरात सरकार" खटल्यातील न्यायमूर्ती अभय ओक यांचे निकालपत्र

महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सन्माननीय न्या. अभय श्रीनिवास ओक यांनी लिहिलेला, कॉँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या प्रकरणातील माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आजरोजी प्रसिद्ध जाहीर झाला. सदर प्रकरणात गुजरात पोलिसांनी खा. प्रतापगढी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर रद्दबातल ठरवत संबंधित फौजदारी कारवाईला माननीय कोर्टाने केराची टोपली दाखवली आहे. खासदार प्रतापगढी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका कवितेसंदर्भात भावना दुखावल्याचे सोंग आणून त्यांना फौजदारी प्रकरणात गोवण्याचा गुजरात सरकारचा शर्थीचा प्रयत्न यामुळे फोल ठरला आहे! न्या. ओक यांचे सदर निकालपत्र वाचताना नजरेस पडलेले काही ठळक मुद्दे याठिकाणी एकेक करून, निकालपत्रातील संबंधित उताऱ्यासह देत आहे:

१. माननीय न्यायालयाने पोलिसांना "तुम्ही संविधानाच्या बळावर उभ्या राहिलेल्या यंत्रणेचा हिस्सा आहात" याची आठवण करून दिली आहे. 

२. पोलिसांना अशा प्रकरणात कारवाईच्यापूर्वी तक्रारीची पडताळणी करण्याची सूचना

३. जुन्या कायद्यातील सेक्शन १५३ अ आणि नव्या कायद्यातील सेक्शन १९६ यांतील साम्य आणि फरक

४. सकृतदर्शनी थोतांड वाटणारी तक्रार एवढी चालू दिल्याबद्दल गुजरात पोलिसांवर ताशेरे आणि उच्च न्यायालयावर नाराजी


५. मानवी जीवनातील कला, कविता, विनोद आणि उपहास यांचे महत्त्व 

६. जेव्हा जेव्हा पोलिस संविधानाची मूल्ये झिडकारतील तेव्हा नागरिकांना संरक्षण देणे हे कोर्टाचे कर्तव्यच असल्याची नोंद

७. संविधानाच्या मूल्यांना नख लावणाऱ्या अशा प्रकारांना त्वरेने धुडकावून लावण्यासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने सदैव सतर्क राहण्याची गरज याठिकाणी व्यक्त केली आहे. 

८. न्या. धनंजय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयात असताना दोन दशकांपूर्वी दिलेल्या, "मी नथुराम गोडसे बोलतोय" या नाटकाविरुद्ध सरकारने केलेली जप्तीची कारवाई हाणून पाडणाऱ्या निर्णयाची आठवण याठिकाणी नोंदवली आहे. 

९. अशा प्रकरणात यापुढे पोलिसांनी कारवाईआधीच तक्रारीची पडताळणी करण्याचे निर्देश

१०. एखाद्या हलक्या आणि चंचल मन असलेल्या व्यक्तीच्या भावना दुखावतील हा गुन्हा दाखल करण्याचा निकष असू शकत नाही अशी पोलिसांना सूचना

११. यासारख्या प्रकरणात तपास प्राथमिक अवस्थेत असतानाच दाखल केलेले गुन्हे रद्द ठरवण्याचे पूर्ण अधिकार उच्च न्यायालयांना असल्याची स्पष्ट नोंद

१२. खासदार प्रतापगढी यांच्याविरुद्ध जामनगर येथे दाखल केलेला संबंधित एफआयआर आणि त्यानुषंगाने चाललेली कारवाई रद्द ठरवण्यात आली आहे. 
















सदर प्रकरणातील पूर्ण निकालपत्र वाचण्यासाठी:

Case no. – Crl.A. No. 1545/2025

Case Title – Imran Pratapgadhi v. State of Gujarat

Citations :
2025 INSC 410
2025 LiveLaw (SC) 362


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा