बुधवार, २६ मार्च, २०२५

कामराकांडाचा उपसंहार!

१. कुणाल कामराने अपलोड केलेला व्हिडिओ बघून, हॅबीटॅट स्टुडिओ फोडायला गेलेले शिंदेचे सैनिक "अरे, तासाभरात हा इथून कुठे गेला" अशा बुचकळ्यात पडलेले बघून वाईट वाटलं...

२. स्टँड अप कॉमेडी सेट युट्यूबवर अपलोड होईपर्यंत मध्ये एडिटिंग वगैरे करायला बराच वेळ जातो, त्यामुळे कामरा काही इतका वेळ तिथे बसून राहणार नाही ही साधी गोष्ट बिचाऱ्यांना झेपली नाही. एकनाथरावांनी थोडा खर्च करून आपल्या या कार्यकर्त्यांना दोन तीन स्टँड अप कॉमेडी शो बघायची सोय करून द्यायला हवी!

३. कामराच्या कॉमेडीचा दर्जा ज्या प्रकारे घसरत चालला आहे ते बघता थोड्याच दिवसांत तो उबाठा गटाचा प्रवक्ता होऊ शकतो! 

४. तसं झाल्यास कुणाल कामरा हा उबाठा गटातील हास्यास्पद कंटेंट क्रिएटरच्या यादीत तिसरा-चौथा येईल! कारकून इन चीफ यांचं अढळपद कायम राहील!!

५. कामराने खरंतर त्या स्किटमध्ये आपले आदरणीय मोदीजी आणि अमित शहा यांच्यावर जास्त विनोद केले. तरी ऑफेंड होणाऱ्यांच्या यादीत मोदींचे भक्त कुठे दिसले नाहीत याची कमाल वाटली! मोदी भक्त सहिष्णू झाले म्हणावं की त्यांनी कामराचा नाद सोडला म्हणावं?

६. या निमित्ताने का होईना, महाराष्ट्रात ज्यांच्या राजवटीत कविता शेअर करण्यासाठी महिनाभर तुरुंगवास भोगावा लागला आणि लोकांना बंगल्यावर नेऊन पाठीवर वळ येईपर्यंत पाहुणचार करण्यात ज्यांची स्पेशालिटी आहे त्यांनाही फ्रीडम ऑफ स्पीचचे पान्हे फुटले, ही इष्टापत्तीच म्हणावी!!

७. या एकंदर प्रकरणात सर्वात मजेशीर म्हणजे उबाठा गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एका टीव्ही चॅनलवर दिलेली अफलातून प्रतिक्रिया... ज्या माणसाला आपल्या पक्षाचा इतिहासही नीट माहिती नाही अशा माणसाला थेट राज्यसभेत पाठवलं तरच हे असे दिव्य प्रसंग बघायला मिळतात!

८. चतुर्वेदी मॅडम बिनधास्तपणे म्हणाल्या की असं आमच्या राजकीय पक्षाने कुठे स्टुडिओ वगैरे फोडल्याचं एकतरी उदाहरण दाखवा, आम्ही असं मुळीच करत नाही! हे ऐकल्यावर सगळ्यात आधी आपल्या निखिल वागळे सरांची आठवण आली!!

९. हे असं कांड करून कामरा सेफ म्हणून तामिळनाडूत जाऊन बसला असं म्हणतात, अलीकडेच तिथल्या सत्ताधारी पक्षाने युट्यूबर सावुकू शंकर यांच्या घराची जी नासधूस केली तो प्रसंग लक्षात असल्यामुळे या प्रसंगाची बहार भलतीच वाढली...

१०. कामराने आपल्या पप्पू द प्रिन्स यांचं लाडकं पॉकेट संविधान हातात घेऊन सेल्फी टाकला. आजकाल ही एक फॅशन झाली आहे! इंस्टाग्रामवर सेपियो... वगैरे निब्बानिब्बी मंडळी मुराकामी किंवा हरारी किंवा गेलाबाजार आपले अच्युत गोडबोले सर यांची पुस्तकं कॉफीबरोबर ठेवून अस्थेटिक फोटो टाकत, त्याचाच हा पुढचा प्रकार असावा!

११. या संविधान लव्हर गँगची एक विशेष बाब म्हणजे ज्या पॉकेटबुकवर त्यांचा इतका जीव आहे ते कधी उघडून वाचायची तसदी ते घेत नसावेत! भारताच्या घटनेत पहिली दुरुस्ती नक्की कोणती, ती कोणी केली, का केली आणि कशी केली याचं साधं कुतूहलही या लोकांना वाटत नाही... 

१२. कलम १९ मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्याला थेट घटनेत बदल करून वेसण घालणारे नक्की कोण होते, त्याचा आपल्या एकंदर कायदा आणि न्यायव्यवस्थेवर नक्की काय परिणाम झाला हे समजून घ्यायची गरज कामरा आणि पप्पू द प्रिन्स यांना नसली तरी आपल्याला आहे, त्यामुळे गरजूंनी याबाबतीत थोडं गुगल करायला हरकत नाही!

१४. कायद्याच्या विषय आलाच आहे तर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानभवनात कामराला जी धमकी/तंबी देऊन बसले आहेत ती त्यांनी तडीस न्यावी अशी त्यांना आमची मराठी माणूस म्हणून विनंती आहे. आपले मुख्यमंत्री कायदा शिकलेले आहेत, त्यामुळे कामराचा नक्की गुन्हा काय, असेल तर नक्की कोणत्या कलमाखाली आणि कारवाई म्हणजे नक्की काय करणार हे त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं तर बरं होईल...

१५. जर असं झालं नाही, कोर्टात कामरा आपल्या सरकारी वकिलांवर भारी पडला तर भर विधानभवनात आपल्या मुख्यमंत्र्यांनी एका स्टँड अप कॉमेडीयनवर कारवाईची घोषणा केली आणि तो बिनदिक्कत असाच उठाठेवी करत फिरत राहिला तर मराठी जनतेचा मुख्यमंत्री एका छचोर कॉमेडियनसमोर जेरीस आला अशी अत्यंत नामुष्कीजनक प्रतिमा भारतभर पसरायची भीती आम्हाला मराठी माणूस म्हणून वाटत आहे...

१६. कुणाल कामरा आजकाल एकदम अमितभाई शाह यांच्यासारखा दिसू लागला आहे. एखाद्या माणसाचा आपण खूप द्वेष केला तर आपण तसे दिसू लागतो असा काही सिगमंड फ्रॉइड किंवा कार्ल यंग यांचा निष्कर्ष आहे का हे कोणाला माहिती असल्यास कृपया कमेंटमध्ये सांगावे!

१७. कामराने खरंतर त्या व्हिडिओत अंबानी सिनियर आणि अंबानी ज्युनियर यांच्यावर फार ल दर्जाचे विनोद केले. त्यामुळे "मुकेसभाय जिओ योजने"चे लाभार्थी म्हणून याठिकाणी कामराचा निषेध करणं आम्हाला भाग आहे!

१८. कामराने त्या स्टँड अपमध्ये वृद्ध लोकांना सरसकट डीह्युमनाईज वगैरे केलं आहे, फॅट शेमिंग केलं आहे, गरिबीतून वर येणाऱ्यांची थट्टा उडवली आहे या गोष्टी फारशा कोणाला झोंबल्या नाहीत...

१९. आपल्या जर्मन शेफर्ड ध्रुव राठीसारखेच कामराचे विदेशातही फॅन आहेत हे त्याला युट्यूबवर येणारी डॉलर आणि युरोतील सुपरचॅट बघून लक्षात आलं! त्यातील ३०% हिस्सा युट्यूब घेऊन उरलेला कामराला देईल आणि मग त्यातील ३०% हिस्सा घ्यायला आपल्या निर्मला काकू समर्थ आहेतच! त्यामुळे देशाच्या जीडीपीत भरच पडणार आहे!!

२०. बाकी ठाण्यातील शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी कामराने तिथे स्टँड अप केला म्हणून हॅबीटॅट फोडून टाकलं! सोलापूरातील शिंदेच्या माणसांनी कॉमेडियन प्रणित मोरेला प्रत्यक्ष स्टँड अप सुरू असतानाच, ऑडियन्ससमोर गाठून, त्याचा हात मोडला होता! आत यात नक्की कोणते शिंदे सरस हे तुम्ही ठरवा!!

इति लेखनसीमा

दिनांक २६ मार्च २०२५


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा