लोकशाही व्यवस्थेसमोर आजच्या काळात लोकसंख्येच्या विचित्र गणितांनी जे काही कूटप्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांची साधारण तोंडओळख वाचकांना व्हावी या हेतूने ही लेखमाला योजली आहे! सदर लेखमालेच्या या तिसऱ्या भागात आपण गोऱ्यांच्या दुनियेत म्हणजे पश्चिमेत भ्रमंती करून स्थलांतराशी संबंधित लोकसंख्येच्या आणि लोकशाहीच्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत...
भाग ३ : पश्चिमेचे आमंत्रण!
पश्चिमेकडे लोकांचं स्थलांतर होणे हा विषय काही आता भारताला नवा राहिलेला नाही. दरवर्षी हजारो भारतीय शिक्षणाच्या, नोकरीच्या किंवा तत्सम वैयक्तिक उत्कर्षाच्या कारणास्तव अनिवासी होत असतात! अलीकडे जसजशी संपर्क आणि दळणवळणाची साधने सुकर, सुलभ आणि स्वस्त झाली तसं हे प्रमाण दरवर्षी वाढतच चाललं आहे...
आता यात एक कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे गेली काही दशके पाश्चात्य देशांनी सातत्याने राबवलेली स्थलांतर फ्रेंडली धोरणे! आपण गेल्या भागात अरब अमिरातीत स्थलांतरित मंडळींना नागरिकत्व मिळवण्यावर कशी बंधने आहेत हे पाहिलं होतं. पाश्चात्य देशांनी मात्र याबतीत लिबरल धोरणे अवलंबली आणि त्याचा परिणाम म्हणून जगभरातील टॅलेंट पश्चिमेकडे जमा होत गेले. अमेरिकेचे उदाहरण घ्यायचे तर अमेरिकन ड्रीम म्हणून ऑफर केल्या जाणाऱ्या लिबरल स्थलांतर धोरणांमुळे अमेरिकेला सुंदर पिचाई, सत्या नडेला आणि इलोन मस्क यांच्यासारखे बिनीचे तंत्रपती अमेरिकेला लाभले! गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि टेस्ला या अतिबलाढ्य अमेरिकन कंपन्यांचे नेतृत्व ही स्थलांतरित मंडळी करत आहेत.
ही ठळक उदाहरणे झाली, आता डेटा बघू! अमेरिकेतील बिलियन डॉलर व्हॅल्युएशन असलेल्या जेवढ्या कंपन्या आहेत, त्यापैकी निम्म्याहून अधिक या बाहेरून तिथे आलेल्या लोकांनी फाऊंडर म्हणून उभ्या केलेल्या आहेत! फोर्बस् या बिजनेस विश्वातील महत्त्वाच्या माध्यमसंस्थेने २०२२ साली त्यांच्या एका वृत्तांकनात, नॅशनल फाउंडेशन ऑफ अमेरिकन पॉलिसी या संस्थेने मांडलेला एक संशोधन अहवाल थोडक्यात मांडला होता. त्यातील हा भाग इथे लक्षात घेण्याजोगा आहे:
“Immigrants have started more than half (319 of 582, or 55%) of America’s startup companies valued at $1 billion or more,” the analysis. “Moreover, nearly two-thirds (64%) of U.S. billion-dollar companies (unicorns) were founded or cofounded by immigrants or the children of immigrants. Almost 80% of America’s unicorn companies (privately-held, billion-dollar companies) have an immigrant founder or an immigrant in a key leadership role, such as CEO or vice president of engineering.”
कॅनडा आणि युरोपमध्येही कमीअधिक प्रमाणात हेच चित्र बघायला मिळेल! ब्रिटिशांनी तर आपल्या "सीधी साधी सुधा" म्हणून सुप्रसिद्ध(?) असलेल्या इन्फोसिसच्या मालकीणबाई सौ. सुधाबाई मूर्ती यांच्या जावयाला थेट पंतप्रधान करून टाकलं होतं. या ऋषि सुनक यांचे आईवडील भारतीय वंशाचे असले तरी आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेले होते... सध्या, म्हणजे गेली नऊ वर्षं, लंडनचे महापौर असलेल्या सादिक खान यांचे आजी आजोबा पाकिस्तानातून तिकडे स्थलांतर करून गेले होते. अशी अनेक उदाहरणे पाश्चात्य जगात जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात पाहायला मिळतील.
 |
Rishi Sunak and Akshata Murthy with their pet dog Nova in No 10 .(Photo: Simon Walker/No 10 Downing Street) |
गेली काही दशके जगभरातून कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात तिकडे वाहत राहिले आणि त्याचा स्पष्ट फायदा हे देश आणि जाणारे स्थलांतरित या दोघांनाही होत राहिला! या देशांच्या अर्थव्यवस्था मजबूत होत राहिल्या आणि त्यामुळे अजून जास्त कुशल मनुष्यबळ तिकडे जाण्यासाठी आतुर होत राहिले, असं हे सुबत्तेचे चक्र काही दशके फिरत राहिले... जगभरातून येणाऱ्या लोकांचे स्वागत करणाऱ्या या देशांचा HDI बघितल्यास ही बाब अजून स्पष्ट होते.
 |
World map of countries and territories by HDI scores in increments of 0.050 (based on 2022 data, published in 2024) https://en.wikipedia.org/wiki/Human_Development_Index#/media/File:HDI2022Incrimental.svg |
२०२२ च्या आकड्यांनुसार अमेरिकेचा मानवी विकास निर्देशांक हा ०.९२७ इतका आहे. कॅनडा त्याहून सरस म्हणजे ०.९३५ तर आपल्या सुधाबाईंच्या जावयाला पंतप्रधान बनवणाऱ्या युकेचा आकडा ०.९४० असा आहे. तुलनेसाठी याच वर्षीचा भारताचा HDI हा ०.६४४ इतकाच आहे.. हा निर्देशांक सुबत्ता, आरोग्य आणि शिक्षण असे तीन मूलभूत निकष पुढे ठेवून तयार केला जात असल्याने, यात ०.९०० हून अधिक स्कोअर करणाऱ्या या पाश्चात्य देशांमध्ये सुबत्ता आणि समृद्धी दोन्ही नांदतात हे स्पष्ट होतं!
आता आपण या लेखमालेत, विशेषतः कोरियन प्रकरणात बघितल्याप्रमाणे, सुबत्ता आली की जन्मदर म्हणजे tfr घसरतो हा ट्रेंड पश्चिमेतही लागू आहेच! पाश्चात्य देशातील नागरिकांचा जन्मदर साधारण साठ-सत्तरच्या दशकात घसरू लागला. २००० उजाडेपर्यंत तो २.१ या रिप्लेसमेंट लेवलच्या खाली जाऊन पोचला आणि आता चालू दशकातील आकडे लक्षात घेतले तर युरोपचा जन्मदर हा १.५३ तर उत्तर अमेरिकेचा जन्मदर हा १.८ असा आढळून येतो. याचा अर्थ असा की कोरियाइतकी बिकट नसली तरी इथेही जन्मदरात सातत्याने लक्षणीय घट होत राहिली आहे...
 |
The total fertility rate in OECD countries, 2023 https://en.wikipedia.org/wiki/Total_fertility_rate#/media/File:Fertility_rate_in_OECD.svg |
तर अशी जन्मदरात घट होत असतानाही पाश्चात्य देशांची प्रगती अव्याहत सुरू राहिली कारण जगभरातून कुशल मनुष्यबळ त्यांच्याकडे येत राहिलं. हे स्थलांतर धोरण यशस्वीपणे राबवण्यात निओलिबरल विचारसरणीचा सिंहाचा वाटा होता. फ्री ट्रेड, त्यासाठी मनुष्यबळाचे मुक्त अभिसरण करू देणारी ओपन बॉर्डर व्यवस्था आणि त्यासाठी पूरक अशी सर्वसमावेशक सहिष्णू संस्कृती ही या निओलिबरल धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. रेडिटवर अमेरिकन निओलिबरल मंडळींची एक कम्युनिटी/फोरम (r/neoliberal) आहे. तिचं घोषवाक्य हे असं आहे:
"Free trade, open borders; taco trucks on every corner" !
या धोरणाचे पाश्चात्य अर्थव्यवस्थेला झालेले फायदे हे तर स्पष्ट आहेतच. पण त्याचबरोबर या धोरणांचा परिणाम म्हणून या देशांत कॉस्मोपॉलिटन शहरे विकसित झाली. तिथे जगभरातून येऊन वसलेल्या लोकांनी आपापल्या भाषा, कला, संगीत, सण, उत्सव आणि पाककृती यांनी ती शहरे सजवली! लंडन, न्यू यॉर्क आणि टोरोंटोसारख्या महानगरांमध्ये तुम्हाला मराठी वडापाव, गुजराती ढोकळा, पंजाबी बटर चिकन, बंगाली रसगुल्ले, उडप्यांची इडली कोरियन नूडल्स, चायनीज राईस, मेक्सिकन टाको आणि इटालियन पिझ्झा एकाच गल्लीत सापडू शकतात!!
 |
Punjab restaurant, Neal Street, Covent Garden https://commons.wikimedia.org/wiki/File:Punjab_restaurant,_Neal_Street,_Covent_Garden_01.jpg |
तर अशाप्रकारे पाश्चात्य लोकशाही देशांनी इमिग्रेशन फ्रेंडली निओलिबरल धोरणे यशस्वीपणे राबवून, गेली काही दशके आपल्या आर्थिक सुबत्ता आणि सांस्कृतिक समृद्धीचा आलेख चढता ठेवला. या देशांमध्ये आर्थिक सुबत्तेसाठी स्थलांतर - स्थलांतरातून आर्थिक सुबत्ता हे विकासचक्र हे सगळं साधारण २०१०-२०१५ पर्यंत सुशेगात सुरू होतं! त्यानंतर या सुखाने चालू असलेल्या लव्हस्टोरीत एक मसालेदार ट्विस्ट म्हणून स्टेजवर आपल्या लाडक्या ट्रम्प तात्यांनी एंट्री घेतली आणि त्यांनी या पाश्चात्य निओलिबरल व्यवस्थेला ही सगळी समीकरणे नव्याने मांडायला भाग पाडलं!!
या भागात आपण पाश्चात्य जगातील सुबत्ता आणि समृद्धी यांना त्यांच्या स्थलांतर फ्रेंडली धोरणाने कशी गती दिली आणि घसरत्या जन्मदरातून उभा राहणारा लोकसंख्येचा प्रश्न पश्चिमेने गेल्या काही दशकांत कसा हाताळला याचा मागोवा घेतला आहे. पुढील भागात आपण ट्रम्प नांवाच्या वादळाची दिशा जोखून, पाश्चात्य जगातील नव्याने उगवता वंशराष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि त्यानुषंगाने पुण्यभू पितृभू वगैरे विषय चर्चेला घेणार आहोत! तोपर्यंत adiós...
संदर्भस्त्रोत:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा