गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

नागरिकांचे प्रजाजन होण्याचा धोका...

या वर्षात पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत "आम्ही अमक्याचा खात्यात इतके पैसे टाकले/टाकू, त्यामुळे आम्हाला मत द्या!" ही प्रचारपद्धती रूढ झालेली बघायला मिळाली. दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्ष आणि जवळपास सर्वच प्रादेशिक पक्ष यांचे जाहीरनामे तपासले तर आम्ही कोणत्या समाजगटाला किती पैसे वाटू याची स्पर्धा स्पष्टपणे दिसून येईल.
 
आता या प्रकारच्या तिजोरी ते लाभार्थी पैसेवाटपाचे विविध तोटे आणि धोके बऱ्याचदा चर्चिले गेले आहेत. अर्थव्यवस्था, सरकारी ताळेबंद, सरकारी तिजोरीच्या जीवावर आमिष दाखवून मत मागणे वगैरे गोष्टी चर्चिल्या गेल्या, पुढेही ती चर्चा सुरूच राहील... मात्र या प्रचारपद्धतीचा एक महत्त्वाचा धोका कोणी तितकासा चर्चेत आणलेला दिसला नाही, तो म्हणजे नागरिकांचे प्रजाजनांत रुपांतर होणे!

१८५७ ते १९४७ आपण गोऱ्यांच्या राणीचे प्रजाजन होतो. १९४७ ला स्वातंत्र्य मिळवून आणि १९५० पासून संविधान स्वीकारून आपण भारताचे नागरिक बनलो. राणीवर निष्ठा असणे अनिवार्य होते, नेहरूंवर निष्ठा असण्याची गरज नव्हती! 'मायबाप हुजुर' असलेला गोरा शासक ते 'आम्ही भारताचे लोक' यांनी नेमून दिलेली कामे सांभाळणारे सेवक सरकार हे आपले स्थित्यंतर होण्यासाठी असंख्य लोकांनी आपली आयुष्ये वेचली आहेत...

त्यामुळे नागरिक म्हणजे सिटीझन आणि प्रजाजन म्हणजे सब्जेक्ट यात असलेला फरक विसरून चालणार नाही. "आम्ही तुम्हाला दरडोई अमुक रुपये देतो, त्यामुळे आम्हाला मत देत राहा" हा सध्या प्रचलित झालेला प्रकार आपले नागरिकत्व पुसट करत चालला आहे! युबीआय असो की निगेटिव्ह इन्कम टॅक्स असो की भारतातील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे सध्याचे रौद्ररूप असो - यांच्या आर्थिक तत्त्वाच्या समर्थकांनी यामुळे नागरिक न उरता प्रजा तयार होईल हा मुद्दा ऑप्शनला टाकून ही धोरणे डोक्यावर घेतली.
 
अमुक कोणीतरी आपलं मायबाप हुजुर आपल्या खात्यात दरमहा इतके पैसे पाठवतोय त्यामुळे आपली त्याच्यावरची निष्ठा आपण मतांतून आणि वर्तनातून दाखवत राहिलं पाहिजे ही टॉक्सिक कृतज्ञतेची भावना समाजात वाढीस लागणे म्हणजे नागरिक ते प्रजा असा आपला उलटा प्रवास सुरू झाल्याचे चिन्ह आहे... या मार्गाचा वापर करून कोण निवडणूक जिंकतो आणि कोण हरतो हा मुद्दा तात्त्विकदृष्ट्या गौण आहे. जनमत काबीज करण्याचा हा मार्ग आता राजरोस झाला, नॉर्म बनला ही बाब मात्र अत्यंत गंभीर आहे! व्यक्तिगत निष्ठा हा सेवकांचा सद्गुण असू शकतो, पण तो नागरिकांसाठी मात्र दुर्गुण आहे!

आता तर "आम्ही तुम्हाला महिन्याला अमके रुपये दिले, ते आले तर हे पैसे बंद होतील" अशी सरळसरळ भीती दाखवणाऱ्या राजकीय जाहिरातीही सगळीकडे दिसू लागल्या आहेत! या तिजोरी ते लाभार्थी पैसेवाटपाची सवय लागून समाजातील एक मोठा वर्ग त्यावर अवलंबून राहू लागला, त्यासाठी नेत्यांना मायबाप हुजुर समजून त्यांच्याप्रती निष्ठा वाहू लागला तर ही रेवडीजीवी, रेवडीकृतज्ञ, रेवडीनिष्ठ होत जाणारी प्रजा हळूहळू आपले नागरिकत्व विसरून जाईल!! त्यानंतर कोणाची विचारसरणी काय, किंवा कोणाची धोरणे काय किंवा कोण काय पायाभूत सुविधा देतो याऐवजी कोण आमचा पोशिंदा आहे हेच बघून मते दिली जातील... या पोशिंद्याला कंटाळले की दुसरा पोशिंदा शोधला जाईल, दुसरा नाही तर तिसरा शोधला जाईल! मात्र या नादात या वर्गाने गमावलेले नागरिकत्व परत मिळवणे अशक्यप्राय होऊन बसणार आहे...

हे असे पैसेवाटप करून काही टक्के जनतेची निष्ठा त्यांच्याच पैशाने विकत घ्यायचा युक्तीचा राक्षस आता बाटलीतून बाहेर आला आहे! वेलफेअर स्टेटवाले समाजवादी आणि सेफ्टी नेटवाले उदारमतवादी यांच्यातील वैचारिक संघर्षाला हा बाटलीतून बाहेर आलेला राक्षस गौण ठरवणार आहे! कारण विचारसरणीवरून भांडायला तयार असलेले नागरिकच गायब करत जाणे ही या बाटलीतून बाहेर पडलेल्या राक्षसाची खरी सुपरपॉवर आहे!
आता राजकीय पक्ष आणि नेते यांना या सगळ्यासाठी किती दोष द्यायचा याला एक मर्यादा आहे. राजकीय नेते / पक्ष हे जनमताचे दुकानदार असतात. त्यांना कोका कोला जोरात खपताना दिसला तर ते सोडून उगाच हेल्थ ड्रिंक विकायला हे व्यापारी धजावणार नाहीत! तसे करणे त्यांना परवडणारही नाही...
 
आपण राणीचे प्रजाजन ते भारताचे नागरिक हा केलेला मोलाचा प्रवास आपण जपायचा की आता यु टर्न मारून खात्यातल्या सरकारी पैशाचे मिंधे होत आपली निष्ठा वाहून, एखाद्या नेत्याचे प्रजाजन व्हायचे या प्रश्नाचे उत्तर शेवटी 'आम्ही भारताचे लोक' यांनाच द्यायचे आहे! येत्या काळात हा प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभा असणार आहे, पण तोपर्यंत तरी हे आजच्यासारखे संविधान दिनाचे उत्सव साजरे करायला काही हरकत नसावी!!

(लेखाचा दिनांक: २६/११/२०२४ - संविधान दिन)

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

न्या. चंद्रचूड निवृत्ती विशेष

भारताचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड निवृत्त होत आहेत. यानिमित्ताने गेली दोन वर्षं सरन्यायाधीश म्हणून त्यांनी पाहिलेलं कामकाज आणि त्यांच्या एकंदरच न्यायिक कारकीर्दीचा हा धावता लेखाजोखा...

गाजलेल्या व्होडाफोन खटल्याचा निकाल सरकारच्या बाजूने देणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ते पुट्टस्वामीसारखे न्यायनिर्णय लिहिणारे सर्वोच्च न्यायालयाचे अलीकडच्या काळातील सर्वात प्रभावशाली न्यायमूर्ती ते "Answer to sunlight is more sunlight" असं सांगून कोर्टाच्या लाईव्ह व्हिडीओ टेलिकास्टची पाठराखण करणारे भारताचे सरन्यायाधीश असा हा न्या. चंद्रचूड यांच्या कारकिर्दीचा आलेख आहे.

भारतातील कोर्टे, विशेषतः संविधानिक कामकाज बघणारी कोर्टे आणि त्यातकरून सुप्रीम कोर्ट ही एक "पॉलीव्होकल" प्रकारची संस्था आहे हे लक्षात घेऊनच कोणत्याही न्यायमूर्तीची कारकीर्द जोखली पाहिजे. अमेरिकन न्यायकारणात आरबीजी ते क्लेरेंस थॉमस अशी वैचारिक विविधता आहे तशीच भारतातही कृष्णा अय्यर, यशवंत चंद्रचूड, एच. आर. मा खन्ना, जगदीश खेहर, रंजन गोगोई अशी न्यायिक रंगांची धुळवड बघायला मिळते.

आपले सध्याचे चंद्रचूड अर्थात डीवायसी यांच्या कारकिर्दीतले सर्वात प्रभावशाली असे, देशावर दीर्घकालीन ठसा सोडणारे निर्णय कोणते याची अचूक यादी बनवणे हे एखाद्या शोधप्रबंधाचे प्रकरण आहे. तरीही साधारण असं म्हणता येईल की जेव्हा इतिहास डीवायसी यांची साक्ष काढेल तेव्हा सर्वात आधी त्यांच्या पुट्टस्वामी खटल्याची आठवण येईल! त्या खटल्यावर निर्णय देताना भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांना नियंत्रित करायचे असल्यास शासनाने नक्की कोणते नियम पाळावे याची एक स्पष्ट त्रिसूत्री चंद्रचूड यांनी आपल्या बहुमताने उचलून धरलेल्या निकालपत्रात मांडली. ती आता जवळपास प्रत्येक मूलभूत हक्क संबंधी प्रकरणात सायटेशन म्हणून वापरली जाते! ती त्रिसूत्री अशी साधारण आहे:

1) Established process of law
2) Legitimate state interest
3) Proportionality

या निर्णयात Legitimate vs Compelling state interest यावरून न्या. चेलमेश्वर यांनी मांडलेला मतभेद आणि त्याचे नंतर आधार वैधता खटल्यावर झालेले परिणाम यावर याआधी लिहून झालं आहे...

त्यानंतर घडलेल्या भीमा कोरेगाव आणि आधार प्रकरणात चंद्रचूड एकटेच अल्पमतात होते. हे दोन्ही अल्पमताचे निर्णय किती महत्त्वाचे होते हे भारतीय संविधानाची ज्यांना खरंच काळजी आहे त्यांना वेगळं सांगायची गरज नाही! भीमा कोरेगाव प्रकरणी ज्याप्रकारे सरकारी यंत्रणा त्या नंतरच्या चार-पाच वर्षांत वागली त्याने चंद्रचूड यांचे निदान किती अचूक होते हेच अधोरेखित झालं.

सरन्यायाधीश म्हणून निवृत्त होताना मांडलेल्या मतांमध्ये चंद्रचूड म्हणाले की मी ए टू झेड अशा लोकांना जामीन दिले आहेत! अर्णब ते झुबेर!! भारतीय न्यायकारणाची जामीन या विषयावर जी वाताहत झाली आहे त्याला अपुऱ्या प्रमाणात का होईना पण लगाम घालण्याचे प्रयत्न डीवायसी यांनी झुबेर खटल्यात केले. त्याबाबतीतही याआधी लिहून झालं आहे... पुढे याचाच संदर्भ देत नुपूर शर्माला न्यायालयाने संरक्षण दिलं, सरकारी प्रवक्त्याचा सरकारी छळ झाल्यावर चंद्रचूडांचे शब्दच त्यावेळी नुपूरला अभय मागण्यासाठी कामी आले ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे!

सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शिवसेना प्रकरण आणि इलेक्टोरल बाँड यासारखे दिलेले राजकीय निकाल जेवढे मीडिया आणि सोशल मीडियात गाजले तेवढे त्यांनी न्यायिक प्रशासन आणि नागरिक सुविधा यंत्रणा याबाबतीत केलेले काम चर्चिले गेले नाही ही भारतीय चर्चाविश्वाची एक शोकांतिका आहे.

चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश म्हणून न्युट्रल सायटेशन व्यवस्था लागू केली. नवे तंत्रज्ञान वापरून नागरिकांना न्यायाचा आणि निर्णयांचा "ॲक्सेस" कसा सुलभ होईल यासाठी त्यांनी छोटे छोटे सुधारणांचे उपक्रम राबवले. लाईव्ह व्हिडीओ टेलीकास्टबद्दल सिब्बल, मेहता यांच्यासारखे वकील आणि काही हायकोर्टांकडून नाके मुरडली गेली. सामान्य लोकांना कायद्याचे कामकाज बघायला दिले तर ते चुकीचा अर्थ काढतात, रील-क्लिपा एडिट करतात म्हणून सिब्बल, मेहता यांच्यासारखे कायद्याचे धुरीण कुरकूर करत असताना चंद्रचूड नेटाने पारदर्शकतेच्या बाजूने उभे राहिले! याबाबतीत "The answer to sunlight is more sunlight!" हे त्यांचे उद्गार येणारे सरन्यायाधीश लक्षात ठेवतील अशी अपेक्षा आहे...

मावळते आणि उगवते सरन्यायाधीश


तेंडुलकरची कारकीर्द तो असिफसमोर एकदा कधीतरी कसा भुईसपाट झाला यावरून निकालात काढायची झाली तर त्याने क्रिकेटसाठी वेचलेल्या तीस - चाळीस वर्षांची बाकी आपल्यासमोर आ वासून उभी राहील! त्याचप्रमाणे चंद्रचूड यांचा एखादा निकाल तुम्हाला आवडला नाही किंवा तुमच्या लाडक्या नेत्याला महाग पडला म्हणून त्यांची गेल्या दोन दशकांची न्यायिक कारकीर्द छूमंतर होत नाही. सचिनची नोंद क्रिकेटचा इतिहास त्याचे सहजलाघवी कौशल्य, त्याची सरासरी, त्याचा धावांचा डोंगर आणि त्याचे सातत्य यासाठी लक्षात ठेवेल त्याचप्रमाणे चंद्रचूड यांच्या कारकिर्दीचा आलेखही या देशाचे न्यायकारण सोन्याच्या अक्षरात नोंदवून पुढे जाणार आहे! चंद्रचूड न्यायाधीश म्हणून यापुढे भारताला लाभणार नाहीत,खासदार म्हणून लाभतील का माहित नाही!! तरी तूर्तास त्यांना सुखी निवृत्तोत्तर आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा...

(लेखाचा दिनांक: ०८/११/२०२४ - न्या. चंद्रचूड यांच्या न्यायिक कामकाजाचा शेवटचा दिवस) 

शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

आरक्षण विभाजन आणि वर्गीकरण : न्या. गवई यांचे निकालपत्र

महाराष्ट्राचे सुपुत्र आणि येत्या वर्षात भारताचे सरन्यायाधीश होऊ घातलेले, न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी आरक्षण विभाजन आणि वर्गीकरण प्रकरणी दिलेला निकाल हा येत्या काळात भारताच्या सामाजिक आणि राजकीय धोरणाला दिशा देणारा आहे. या प्रकरणात एकूण ६ निकालपत्रे असून, पैकी ५ ही विभाजनाच्या बाजूने म्हणजे बहुमतात आणि १ (न्या. बेला त्रिवेदी) हे विरोधात म्हणजे अल्पमतातील आहे. पैकी न्या. गवई यांच्या निकालपत्राची चर्चा अन्य बहुमतातील न्यायमूर्तींनी आपल्या निकालपत्रात करत, त्यातील अधोरेखित तत्त्वांवर ठिकठिकाणी शिक्कामोर्तब केलेला आहे.
 
खुद्द सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यापेक्षाही न्या. गवई यांच्या निकालपत्राचा वैचारिक प्रभाव या प्रकरणातील अन्य बहुमताच्या निकालपत्रांत अधिक प्रमाणात जाणवतो. न्या. गवई यांचे निकालपत्र नीट समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. न्या. गवई यांच्या निकालपत्रात एकूण २९७ मुद्दे आहेत. त्यातील काही ठळक मुद्दे इथे अधोरेखित करून दिले आहेत, बाकी पूर्ण निकालपत्रच महत्त्वाचे आणि वाचनीय आहे यात शंका नाही. येथे दिलेल्या ७ ठळक मुद्द्यांचे निकालपत्रातील क्रमशः संदर्भ सोबत जोडलेल्या पानांत सापडतील...

१. स्थानिक सरकारांना मागासलेपण ठरवण्याची मुभा देण्याचं डॉ. आंबेडकर यांनी मांडलेलं तत्त्व