मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

जोकरच्या अंतरंगी....

The Joker !
बॅटमॅनच्या कथेमधला सुप्रसिद्ध व्हिलन...
ख्रिस्तोफर नोलानच्या डार्क नाईट मधील अत्यंत विलक्षण पात्र...
हेथ लेजरच्या अजरामर अभिनयाने बॅटमॅन-फॅन्सच्या मनावर कायमची कोरली गेलेली व्यक्तिरेखा म्हणजे जोकर...



जोकर हा सुडाने पछाडलेला किंवा पैशांसाठी हपापलेला नाही. त्याला जगाच्या सत्तेचा मोह नाही किंवा जगावर कब्जा गाजवण्याची आसुरी इच्छा सुद्धा नाही. जोकर म्हणूनच वेगळा आहे !
जोकर कडे कोणत्याही सुपर पॉवर्स नाहीत. बॅटमॅनने ठरवलं तर एक दोन फटक्यांत जोकरला लोळवू शकतो 
पण तरीही बॅटमॅनला सर्वाधिक छळणाऱ्या आणि मानसिक-नैतिक पातळ्यांवर नामोहरम करण्याचा मान जोकरलाच जातो !!


जोकर हा नुसताच एक क्रूर व्हिलन नाही. जोकरला भेसूर, भयानक बनवणारी आहे ती त्यांची 'फिलॉसफी'- त्याचं तत्त्वज्ञान-त्याची माणसांच्या जगाबद्दलची खोल समज !!
जोकर स्वतःला विनाशाचा दूत म्हणवतो- Agent of Chaos !!


जोकरचा बाप दारूडा होता. घरी येऊन त्याच्या आईला मारहाण करायचा. एक दिवस अशाच नशेमध्ये अंध होऊन त्याच्या बापाने लहानग्या जोकरच्या घाबरलेल्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचं म्हणून चाकूने त्याचा जबडा चिरून, त्याचा चेहऱ्यावर कायमच हास्य निर्माण केलेलं असतं ! जोकरने त्यानंतर अपेक्षेप्रमाणेच गुन्हेगारी जगताकडे धाव घेतली, तिथे तो प्रचंड यशस्वी झाला, पण त्या सगळय़ात तसं मन रमेना....

मग त्याला भेटला बॅटमॅन !
बॅटमॅन मुळे जोकरला जणू जगण्याचा सूर सापडला....
बॅटमॅन हा कायद्याच्या बंधनात न राहणारा- पण न्यायासाठी- सत्यासाठी- चांगल्यासाठी झटणारा हिरो आहे.
त्याचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे "कोणाचीही हेतुपुरस्सर हत्या करायची नाही" ! If you kill a killer, the total count remains same !! त्याच्या व्हिलन्सनाही तो जीवानिशी न मारता, बहुतांशी कैद करून ठेवतो. 

याचं कारण म्हणजे बॅटमॅनने आपल्या ध्येयासाठी कायद्याची बंधने झुगारत असताना - स्वतःवर एक 'नैतिक कुंपण' लादून घेतलेले असते.  बाकीच्या त्याच्या कायद्या बाहेरच्या धंद्यामध्येही त्याला 'हिरो' ठेवणारी बाब म्हणजे - त्याची त्याच्या तत्त्वांवरची निष्ठा ! त्यामुळे No Kill चा बॅटमॅनच्या अजेय, पोलादी नैतिकतेचं प्रतीक आहे ! 

जोकरला बॅटमॅन म्हणूनच इंटरेस्टिंग वाटू लागतो ! त्याला बॅटमॅनबद्दल मुळीच द्वेष नसतो. उलट तो बॅटमॅनला आपल्यासारखाच - 'दुनियेतून वेगला मानत असतो ! पण बॅटमॅनच्या जगाबद्दलच्या सकारात्मक दृष्टीकोनाची त्याला गंमत वाटत असते. बॅटमॅनला त्याच्या 'सो कॉल्ड' उच्च नैतिकतेची- जीवनध्येयांची - अढळ तत्त्वांची 'लायकी दाखवून' देणे हा जोकरचा आवडता छंद बनतो ! जोकर पिसाट असतोच. त्यामुळे बॅटमॅनला असा 'काळा वारस दखवण्यासाठी तो एकाहून एक क्रूर अपराध करत सुटतो... अशावेळी जोकर बऱ्याचदा हसत असतो ! पण तो गब्बरसारखा मदांध होऊन हसत नसून, माणसांच्या एकूणच दुःखांवर, वेदनांवर, जगण्यासाठी चाललेल्या केविलवाण्या धडपडीवर हसत असतो !!
 
जोकर बॅटमॅनसमोर दोन पर्याय ठेवतो - एकतर त्याला जीवानिशी मारून बॅटमॅनने स्वतःचा नियम - स्वतःचं Psychological Frontier मोडून टाकावं आणि स्वतःची हार मान्य करावी...  
किंवा त्याला न मारता बॅटमॅनने त्याच्या जवळची माणसं मरताना-रडताना-वेडी होताना बघत बसावं !
अशा प्रकारे जोकर बॅटमॅनला थेट त्याच्या मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात 'गाठतो' ! त्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, तो बॅटमॅनला वेदनादायक पेचात टाकतो. त्यामुळे जोकर आणि बॅटमॅन हे फक्त हिरो आणि व्हिलन न राहता मानवी मनाच्या दोन छटा होऊन बसतात...

वास्तविक बॅटमॅन आणि जोकर दोघांच्याही आयुष्यात बऱ्याच ठिकाणी साधर्म्य आहे. बालपणी बसलेले चटके दोघांनीही झेलले आहेत. दोघांकडेही अफाट मानसिक क्षमता आहेत, हुशारी आहे, पिसाटपणा आहे ! दोघेही निःस्वार्थी आहेत. दोघांनीही जगाच्या काळ्या बाजू बघितल्या आहेत. दोघांच्या भूमिका मात्र भिन्न आहेत. परिस्थितीचं नाणं बऱ्यापैकी सारखं उडवलं तरी येणारे outcomes हे व्यक्तीच्या choice नुसार भिन्न असतात... बॅटमॅन आणि जोकर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जोकर बॅटमॅनला- हे जग आशा ठेवण्याच्या लायकीचा नाहीये -हे पटवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या भयानक कृत्यांसमोर आपल्या तत्त्वांना  वाचवत, जगासाठी धडपडणाऱ्या बॅटमॅनवर तो खदाखदा हसत राहतो.

जोकर मला कोणत्याही हॉरर पात्रापेक्षा, भूत-प्रेताच्या कहाणीपेक्षा भयानक वाटतो. कारण जोकर बोलतो ते असत्य नसतं ! या जगाची भेसूर-काळी बाजू जोकर उघडपणे मांडत असतो. त्यातून तो आपल्या चांगुलपणाच्या मूळांवरच हल्ला चढवतो. मग त्याच्या भेसूर सत्याच्या जाणिवेतून येते ती विलक्षण खिन्नता !  म्हणूनच तो भयानक वाटतो !! हॉररमधली भुतं फारतर स्वप्नात येऊन दचकवतील. पण जोकर जागेपणी दचकवतो-हलवतो-मानसिक खळबळ माजवतो. 

जोकर म्हणतो की "हे सुसंस्कृतपणाचे मुखवटे ओढलेले लोक त्यांचे हितसंबंध जपणारी व्यवस्था संकटात आली की क्षणार्धात रानटी पशु बनायला ही कमी करणार नाहीत !"... त्याच्या म्हणण्यानुसार- "लोक त्यांना परवडेल इतकंच चांगलं वागतात"... त्याच्यासमोर आलेल्या कोणत्याही नीतीमान-विचारी-देवमाणसाला तो शैतान बनवू शकतो... कारण ? कारण - "Madness is like gravity..."
  


त्या चित्रपटाच्या शेवटी कोण जिंकतो ?
जोकर की बॅटमॅन ?
हा निवाडा प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार वेगळा असू शकतो.

माझ्या मते- "जोकर जिंकतो, तरीही बॅटमॅन राहतो !" 
कारण गोथॅम शहराच्या न्याय व्यवस्थेचे तीन शिलेदार, चांगुलपणाचे तीन स्तंभ जोकर कोसळवतो ! हार्वे डेन्ट याला त्याच्या चांगुलपणाची समाज कशी विश्वासघाताने परतफेड करतो ते दाखवून देऊन, त्याला रॅचेलच्या मृत्यूचा चटका देऊन, वरती हॉस्पिटलमध्ये त्याला 'छापा-काटा हाच खरा न्याय' या तत्वाचा डोस देतो ! 


अशावेळी पूर्वी अत्यंत तत्त्वनिष्ठ, दोन बाजू  नाणं वापरून निर्णय घेणारा, सद्गुणी-शूर-न्यायप्रिय असलेला हार्वे डेन्ट जगाबद्दल झालेल्या भ्रमनिरासाने खचून  जातो. त्याची तत्त्वनिष्ठा आता घाऊक सूडाच्या पिसाट भावनेत बदलते. आता तो Fair नाणं वापरू लागतो ! छापा-काटा करून त्याच्या डॊक्यातला न्याय प्रत्यक्षात आणतो. म्हणजे छापा आला तर माफ आणि काटा आला तर गोळी !! 

अशाप्रकारे गोथॅमच्या white knightला जोकर भेसूर दानव बनवून दाखवतो. अशा पिसाट डेन्टने मुलाच्या डोक्याला बंदूक लावल्यामुळे गॉर्डन आपल्या तत्त्वांविरुद्ध हार्वेची माफी मागायला तयार होतो. मुलाला सुरक्षित असण्याचं खोटं खोटं आश्वासन देताना- राक्षस बनलेल्या हार्वेसमोर सपशेल गुडघे टेकतो. शेवटी त्या मुलाला 'chance' च्या भरवश्यावर सोडण्याचे नाकारत बॅटमॅन मुलाला वाचवण्यासाठी झेपावतो आणि त्यासाठी अप्रत्यक्ष का होईना, हार्वेला खाली ढकलून - त्याचा जीव घेतो ! हार्वेच्या मृत्यूचा दोष आपल्या शिरावर घेऊन - बॅटमॅन त्याच्या लाडक्या शहरासाठी खलनायक बनतो... 

जोकर जिंकतो. तो या तिघांनाही 'वेळ आल्यावर तत्त्व टिकत नाहीत' याची जाणीव करवून देतो ! हार्वे समाजाने केलेल्या कृतघ्नतेने वेडा होतो आणि सात्विक white knight पासून two face नांवाच्या राक्षसापर्यंत स्वतःचं पतन घडवतो. गॉर्डन त्या राक्षसासमोर, आपल्या मुलाच्या जीवासाठी भीक मागतो, गुडघे टेकतो, हताश होतो, हतबल होतो, आपल्याच चुकीमुळे हार्वेचा बळी गेल्याची सल त्याच्या मनात कायम राहते. आणि त्या 
राक्षस बनलेल्या white knight पासून त्या निरागस मुलाला वाचवताना बॅटमॅन त्याच्या image चा बळी देतो आणि dark knight बनतो !! 

जोकर जिंकतो... मात्र बॅटमॅन संपत नाही. बॅटमॅन बरंच काही गमावतो, जनतेच्या नजरेत पडतो. मात्र - dark बनला तरी त्याच्यातला knight जिवंत राहतो !! जोकर हे मानवी जीवनाचे भेसूर सत्य आहे. पण ते कळल्यावर तुम्ही स्वतः राक्षस बनायचं किंवा गुडघे टेकायचे किंवा dark knight बनून घाव पचवूनही आपल्या ध्येयाकडे चालत राहायचं हा तुमचा चॉईस आहे !

Choose Wisely, Your Choice Defines- 'Who You Are' !!
It's a tribute indeed ! From Gotham to Batman and... From Nolan to Heath Ledger !!





(नोट- सर्व छायचित्रे/चित्रे इंटरनेटवरून मिळवली असून त्यांचे साभार श्रेय त्यांच्या मूळ निर्मात्या/कलाकारांनाच !)

सोमवार, २६ जून, २०१७

हॅरी पॉटरच्या दुनियेत : Albus Dumbledore

Albus Dumbledore !


हॅरी पॉटरच्या शाळेचा हेडमास्तर... Prof. Dumbledore म्हणजे -
पांढरी दाढी, मिश्किल डोळे आणि वयाबरोबर आवाजात आलेली अनुभवाची खोली... हॅरीच्या दुनियेतला सर्वात ताकदवान Wizard, Order of Phoenix चा प्रमुख आणि हॅरीला वाट दाखवणारा, वाचवणारा आणि शिकवणारा आदर्श आचार्य  !

या अफाट पात्राच्या नांवाचा अफाटतेची सुरुवात त्याच्या नांवांपासून होते ! त्याचे पूर्ण नांव - 'Albus Percival Wulfric Brian Dumbledore' असे भले मोठ्ठे आहे... 
पैकी Albus म्हणजे शुभ्र, 
Percival हा शब्द लढाईचा इतिहास असल्याची हिंट देतो (हे नांव किंग आर्थरच्या दरबारातील ख्यातनाम सरदाराचे होते !) 
Wulfric चा जरासा विचित्र अर्थ wolf power असा येतो ज्याचा इथला अर्थ भन्नाट ताकद इतकाच घेऊ,
Brian या जुन्या Celtic शब्दाचा अर्थ आहे महान/उच्च नैतिक मूल्ये असलेला 
आणि Dumbledore या बऱ्याच जुन्या शब्दाचा अर्थ आहे 'Bumblebee' किंवा 'Humble bee' म्हणजे माशीचे कानाला गोड गुणगुणणे !
या पैकी Albus हे नांव आपल्या मिश्किल हेडमास्तरच्या आयुष्याचं, भूमिकेचं सर्वात अचूक वर्णन आहे ! व्होल्डमोर्टला डार्क लॉर्ड म्हणतात त्यामुळे Albus हे नांव त्यांच्यातील द्वंद्व अचूक टिपते...

Dumbledore शिवाय हॅरी पॉटरच्या सिरीजमध्ये काहीच उरत नाही असे म्हटले तरी वावगे ठरत नाही... ज्यांना हॅरी पॉटर कळलंय त्यांना माहीतच असेल की खरी लढाई हॅरी विरुद्ध व्होल्डमोर्ट अशी नसून Dumbledore विरुद्ध व्होल्डमोर्ट अशी आहे... हॅरी हा त्या लढाईचा महत्त्वपूर्ण मोहरा आहे, पण लढाईचा सूत्रधार Dumbledoreच आहे... Dumbledore आणि व्होल्डमोर्ट यांच्या विचारसरणीतील युद्ध म्हणजे हॅरी पॉटर सीरिज... 

मृत्यूला थकवा आल्यानंतर आलेली सुखाची निद्रा मानणारा Dumbledore विरुद्ध मृत्यूपासून पळणारा, अमर होण्यासाठी Horcrux, Unicorn Blood सारख्या अघोरी उपायांना वापरणारा लॉर्ड व्होल्डमोर्ट...

विझार्ड असोत, mudblood असोत किंवा muggles त्यांना वागणूक समानतेचि मिळावी हे मूल्य दर्शवणारा Dumbledore विरुद्ध शुद्ध रक्ताची, उच्च वंशाची, वर्णवर्चस्वाची काळी बाजू दर्शवणारा लॉर्ड व्होल्डमोर्ट !

Elder Wand असलेल्या Gellert Grindlewald ला हरवून, त्या छडीची मालकी मिळवणारा, अफाट ताकद-ज्ञान आणि अनुभव असलेला परंतु आयुष्यात एकदाही Avada Kedavra हा मृत्युमंत्र न वापरणारा Dumbledore
विरुद्ध Elder Wand च्या ताकदीसाठी हपापलेला, परंतु तिची मर्जी कधीच न लाभलेला; Avada Kedavra हा ज्याचा Signature Spell आहे असा डार्क लॉर्ड व्होल्डमोर्ट !

Dumbledore काही scenes मध्ये तर मनावर कायमची छाप पाडून जातो ! सगळे सांगणं कठीण आहे तरी त्यातील सर्वोत्तम मानावा असा एक प्रसंग म्हणजे - Order Of The Phoenix या भागातील Ministry Atrium मध्ये हॅरीला वाचवण्यासाठी लॉर्ड व्होल्डमोर्टसमोर उभा ठाकणारा Dumbledore ! इथे व्होल्डमोर्ट पूर्ण आक्रमक असतो, मृत्यूमंत्रांचे वार करत असतो, Fiendfyreची माया वापरतो... उलट Dumbledore मात्र हॅरीला वाचवण्यासाठी, व्होल्डमोर्टला तटवून ठेवून Aurors समोर त्याला उघडं पाडण्यासाठी लढत असतो... तरीही शेवटी Dumbledore व्होल्डमोर्टला जड जातो !त्यांच्यातील Dumbledore  व्होल्डमोर्टला मात देऊन जातो...

व्होल्डमोर्ट त्याला खुन्नस देत विचारतो : “You do not seek to kill me, Dumbledore?” “Above such brutality, are you?”
आणि Dumbledore शांतपणे उत्तरतो : “We both know that there are other ways of destroying a man, Tom,” !!!

एकतर बाकीचे लोक त्याचं Voldemort हे त्याने परिधान केलेलं नांवसुद्धा घ्यायला घाबरत असताना, Dumbledore त्याला त्याच्या तोंडावर 'टॉम' या त्याच्या खऱ्या, बालपणीच्या नांवाने हाक मारतो !! आणि दुसरं म्हणजे - एखाद्याला संपवण्याचे जीव घेणाव्यतिरिक्त अजूनही मार्ग असतात असं Dumbledore त्या अमरत्वाचा आशेने झपाटलेल्या सैतानासमोर ठणकावून सांगतो !!! व्होल्डमोर्ट Dumbledoreच्या ताकदीपेक्षा या निडर, शांत, स्थितप्रज्ञतेला जास्त घाबरत असावा... त्या प्रसंगात पुढे व्होल्डमोर्ट कपटीपणाने हॅरीला झपाटतो. जेणेकरून Dumbledore त्याला संपवण्यासाठी हॅरीवर वार करेल आणि मग व्होल्डमोर्ट दुसऱ्या कुठल्यातरी Horcrux द्वारे पुन्हा जिवंत होऊन त्या भविष्यवाणीच्या भयातून मुक्त होईल. पण Dumbledore  शेवटी Dumbledore असतो ! 

तो त्याचं आधीचं वाक्य खरं करून दाखवतो. तो हॅरीला त्याची माणसं, चांगल्या आठवणी, हरमायनी-रॉनशी असलेली मैत्री, सिरीयसचं बलिदान आठवायला सांगतो !! त्या भावनांची allergy असलेला व्होल्डमोर्ट ते सहन न होऊन पळून जातो !! या प्रसंगातून Dumbledore डार्क लॉर्डचा तात्त्विक पराभव तर करतोच, पण त्याचबरोबर हॅरीला त्याच्याशी कसं लढायचं हे कायमसाठी शिकवून जातो... योद्धा बनलेला असताना त्याच्यातला गुरु जागाच असतो !

Dumbledore शेवटी स्वतःच बलिदान देतो, स्नेपकडून बलिदान घडवून आणतो आणि हॅरीला मृत्यूच्या दारातील काल्पनिक King's Cross स्टेशनवर शेवटचा उपदेश करून त्याला त्या डार्क लॉर्डवर शेवटचा घाव घालण्यासाठी सिद्ध करतो ! म्हणूनच ते युद्ध Dumbledore विरुद्ध व्होल्डमोर्ट असे असते... ज्यात Dumbledore  निर्विवादपणे जिंकतो, तेही त्याच्याच नियमांनुसार !!

Dumbledore च्या आधीच्या आयुष्यात Gellert Grindlewald शी त्याचे संबंध 'मैत्रीच्या पल्याड मधुर' असल्याचे रोलिंगबाईंनी सुचवले आहे ! होमोफोबिक प्रवृत्तींना ही एक प्रकारची साहित्यिक चपराक असावी !! Dumbledore सारखा शक्तिशाली, महान आणि आदरणीय माणूस समलैंगिक असला तरी महानच राहतो हे रोलिंगबाईंनी हॅरी पॉटरच्या प्रौढ वाचकांवर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे... माणसाचे लैंगिक आयुष्य हा त्याच्या योगदानाची, महानतेची आणि क्षमतेची पातळी जोखण्याचा मुद्दा नसावा हा संदेश Dumbledore च्या आयुष्यातील Grindlewald प्रकरण देऊन जातं... 

याच Grindlewald समोर, तो सैतान बनल्यावर Dumbledore उभा राहतो आणि त्याला हरवतो. पुढे Philosopher's Stone या भागाच्या शेवटी - Neville Longbottom चं कौतुक करताना Dumbledore म्हणतो - 
"There are all kinds of courage. It takes a great deal of bravery to stand up to our enemies, but just as much to stand up to our friends" 
Dumbledore वरचं वाक्य Grindlewald च्या बाबतीत अक्षरशः जगलेला असतो !!

Dumbledore हे मी वाचलेल्या साहित्यिक पात्रांपैकी सर्वांत महान पात्रांपैकी एक आहे.... Dumbledore सारखी पात्रे असल्यामुळेच हॅरी पॉटर सीरिज ही 'kids' fiction' न राहता, मोठेपणीही तुम्हाला प्रगल्भ करत जाते... Dumbledore चे धडे आपण Muggles सुद्धा गिरवू शकतो - आपापलं 'खरं' आयुष्य जास्त समजून घेण्यासाठी आणि त्या समजेबरोबर शहाणं होण्यासाठी.... हे पात्र लिहिणे ही साहित्यिक पात्रनिर्मितीच्याबाबतीत रोलिंगबाईंना जवळपास व्यासांच्या बरोबरीला नेणारी गोष्ट आहे असं मला वाटतं !!

शेवटी Dumbledore म्हणजे कोण ?

Dumbledore म्हणजे “Do not pity the dead Harry. Pity the living, and, above all, those who live without love” म्हणणारा इहवादी तत्वज्ञ !

Dumbledore म्हणजे “After all, to the well organized mind, death is but the next great adventure” हे कळलेला मृत्युंजय मानवी स्वभाव !

Dumbledore म्हणजे प्रगल्भ, अनुभवी तरीही सकारात्मक राहणारी मानवी वृत्ती !

Dumbledore म्हणजे “Happiness can be found even in the darkest of times, if one only remembers to turn on the light” म्हणत सैतानाशी लढण्याची प्रेरणा जागवणारा चाणाक्ष नेता !

Dumbledore म्हणजे गुरु कसा असावा हे सांगणारा वस्तुपाठ !!

Dumbledore म्हणजे ...

Dumbledore म्हणजे “It is our choices, Harry, that show what we truly are, far more than our abilities” हे जीवनरहस्य अलगदपणे शिकवणारा वृद्ध आचार्य !!!






(*सर्व चित्रे व छायाचित्रे गूगल इमेजेसवरून घेतली आहेत. त्यांचे हक्क त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन...)

शुक्रवार, २६ मे, २०१७

हॅरी पॉटरच्या दुनियेत : Bellatrix Lestrange

बेलाट्रिक्स लेस्ट्रेन्ज !

हॅरी पॉटरच्या दुनियेतील सर्वात खतरनाक Witch !!
बेलाट्रिक्सचं पात्र हे रोलिंगबाईंच्या Genius चं खणखणीत उदाहरण आहे... बेलाट्रिक्स विक्षिप्त आहे, azkaban मध्ये राहून दुभंग व्यक्तिमत्त्व म्हणजेच Bipolar Personality तिला जडलेली आहे... हरमायनीला तड्फडवताना आसुरी हसणारी बेलाट्रिक्स पॉटरफॅन्स विसरू शकत नाहीत !

बेलाट्रिक्सचं माहेर ब्लॅक लोकांच्या घरचं ! Narcissa Malfoy (draco ची आई !) ची बेला ही मोठी बहीण... तिची दुसरी भिन्न Andromenda Tonks ... तिने एका muggle शी लग्न केलं म्हणून नाक कापलेल्या 'शुद्ध रक्ताच्या' ब्लॅक लोकांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी बेलाट्रिक्सचं लग्न लावून दिलं ते Rodolfus Lestrange नांवाच्या श्रीमंत, शुद्ध रक्ताच्या Death Eater शी ! तिची बहीण Narcissa, तिचंही लग्न Lucius Malfoy या श्रीमंत Pure Blood शी झालं होतं... ब्लॅक कुटुंबातील 'शुद्ध रक्ताचं महत्त्व इतकं होतं की त्या रक्त-गर्वाशी बेईमानी करणाऱ्या Andromenda आणि sirius चे फोटो त्यांच्या फॅमिली ट्रीमधून जाळलेले असतात !!

बेलाट्रिक्स Voldemort ची सर्वात विश्वासू साथीदार असते. खरंतर बेलाट्रिक्सला Voldemort बद्दल अजब आणि गडद आकर्षण असतं !! अर्थात डार्क लॉर्ड मानवी भावना समजण्याच्या पल्याड गेलेला असल्याने हे सगळं one sided असतं ! बेलाट्रिक्स त्याच्यासाठी काहीही करायला तयार असते- azkaban मध्ये खितपत पडते, जीव धोक्यात घालते आणि शेवटी त्याच्यासाठी लढताना Molly च्या हातून जीवसुद्धा गमावते... She was crazily obsessed with Voldy !!! असो...

बेलाट्रिक्स आपल्या चुलत भावंडांचा म्हणजे - हॅरीचा Godfather सिरीयस ब्लॅक आणि Remus ची बायको Nymphadora Tonks यांचा - जीव घेताना जराही कचरत नाही... बेलाट्रिक्सने त्या बिचाऱ्या डॉबीची केलेली क्रूर 'शिकार' प्रत्येक पॉटरफॅनला कुठेतरी नक्कीच हलवून गेली असणार...
पण बेलाट्रिक्स Voldemort ची अनुयायी असली तरी त्याच्यापेक्षा वेगळी आहे ! तिला अमर व्हायचं Obsession नाहीये... तिने जीव धोक्यात घालताना जराही मागेपुढे बघितलं नाही, Horcrux किंवा तत्सम प्रयत्नही केले नाहीत... दुसऱ्यांना मरताना बघण्याचं Nihilist आकर्षण, आपल्या शत्रूला तडफडवताना मिळणारा sadistic आनंद म्हणजे बेलाट्रिक्स ! ती 'Forever Alive' राहण्यासाठी कधीच झटली नाही... याउलट Voldemort आपल्या मृत्यूला टाळण्यासाठी काळ्या जादूच्या मर्यादा मोडून, अक्षरशः जीव तोडून म्हणजे आत्म्याचे तुकडे करून जिकरीचे प्रयत्न करत असतो... 
बेलाट्रिक्स आणि Voldemort हे एकत्र असले तरी एकसारखे नसतात ! त्यांच्या काळ्या बाजूंच्या छटांमध्ये फरक आहे !!

Voldemort हा Thanatophobic आहे, अमर होण्यासाठी लागेल त्याला संपवणारा आहे... 
तर बेलाट्रिक्स खऱ्या अर्थाने 'Dare'Devil आहे !


बेलाट्रिक्स म्हणजे 'शुद्ध रक्ता'चं पिसाट Xenophobic व्यक्तीचित्रण


बेलाट्रिक्स म्हणजे मजनू नसलेल्या डार्क लॉर्ड बद्दलच्या Obsession साठी वाट्टेल ते करणारी वेडी लैला


बेलाट्रिक्स म्हणजे लोकांच्या वेदनेतून आपल्या मेंदूला 'किक' मिळवणारी चेटकीण


बेलाट्रिक्स म्हणजे Bipolar-Sadist-Racist तरीही आकर्षक वाटणारी उन्मत्त वृत्ती...


बेलाट्रिक्स म्हणजे... 

"आपल्या सुंदर तरीही भेसूर हास्याने मानवी मनाचा काळा कोपरा चेतवणारी खलअप्सरा".... !!




(*सर्व छायाचित्रे गूगल इमेजेसवरून घेतली आहेत. )