भारताचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड निवृत्त होत आहेत. यानिमित्ताने गेली दोन वर्षं सरन्यायाधीश म्हणून त्यांनी पाहिलेलं कामकाज आणि त्यांच्या एकंदरच न्यायिक कारकीर्दीचा हा धावता लेखाजोखा...
गाजलेल्या व्होडाफोन खटल्याचा निकाल सरकारच्या बाजूने देणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ते पुट्टस्वामीसारखे न्यायनिर्णय लिहिणारे सर्वोच्च न्यायालयाचे अलीकडच्या काळातील सर्वात प्रभावशाली न्यायमूर्ती ते "Answer to sunlight is more sunlight" असं सांगून कोर्टाच्या लाईव्ह व्हिडीओ टेलिकास्टची पाठराखण करणारे भारताचे सरन्यायाधीश असा हा न्या. चंद्रचूड यांच्या कारकिर्दीचा आलेख आहे.
भारतातील कोर्टे, विशेषतः संविधानिक कामकाज बघणारी कोर्टे आणि त्यातकरून सुप्रीम कोर्ट ही एक "पॉलीव्होकल" प्रकारची संस्था आहे हे लक्षात घेऊनच कोणत्याही न्यायमूर्तीची कारकीर्द जोखली पाहिजे. अमेरिकन न्यायकारणात आरबीजी ते क्लेरेंस थॉमस अशी वैचारिक विविधता आहे तशीच भारतातही कृष्णा अय्यर, यशवंत चंद्रचूड, एच. आर. मा खन्ना, जगदीश खेहर, रंजन गोगोई अशी न्यायिक रंगांची धुळवड बघायला मिळते.
आपले सध्याचे चंद्रचूड अर्थात डीवायसी यांच्या कारकिर्दीतले सर्वात प्रभावशाली असे, देशावर दीर्घकालीन ठसा सोडणारे निर्णय कोणते याची अचूक यादी बनवणे हे एखाद्या शोधप्रबंधाचे प्रकरण आहे. तरीही साधारण असं म्हणता येईल की जेव्हा इतिहास डीवायसी यांची साक्ष काढेल तेव्हा सर्वात आधी त्यांच्या पुट्टस्वामी खटल्याची आठवण येईल! त्या खटल्यावर निर्णय देताना भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांना नियंत्रित करायचे असल्यास शासनाने नक्की कोणते नियम पाळावे याची एक स्पष्ट त्रिसूत्री चंद्रचूड यांनी आपल्या बहुमताने उचलून धरलेल्या निकालपत्रात मांडली. ती आता जवळपास प्रत्येक मूलभूत हक्क संबंधी प्रकरणात सायटेशन म्हणून वापरली जाते! ती त्रिसूत्री अशी साधारण आहे:
1) Established process of law
2) Legitimate state interest
3) Proportionality
या निर्णयात Legitimate vs Compelling state interest यावरून न्या. चेलमेश्वर यांनी मांडलेला मतभेद आणि त्याचे नंतर आधार वैधता खटल्यावर झालेले परिणाम यावर याआधी लिहून झालं आहे...
त्यानंतर घडलेल्या भीमा कोरेगाव आणि आधार प्रकरणात चंद्रचूड एकटेच अल्पमतात होते. हे दोन्ही अल्पमताचे निर्णय किती महत्त्वाचे होते हे भारतीय संविधानाची ज्यांना खरंच काळजी आहे त्यांना वेगळं सांगायची गरज नाही! भीमा कोरेगाव प्रकरणी ज्याप्रकारे सरकारी यंत्रणा त्या नंतरच्या चार-पाच वर्षांत वागली त्याने चंद्रचूड यांचे निदान किती अचूक होते हेच अधोरेखित झालं.
सरन्यायाधीश म्हणून निवृत्त होताना मांडलेल्या मतांमध्ये चंद्रचूड म्हणाले की मी ए टू झेड अशा लोकांना जामीन दिले आहेत! अर्णब ते झुबेर!! भारतीय न्यायकारणाची जामीन या विषयावर जी वाताहत झाली आहे त्याला अपुऱ्या प्रमाणात का होईना पण लगाम घालण्याचे प्रयत्न डीवायसी यांनी झुबेर खटल्यात केले. त्याबाबतीतही याआधी लिहून झालं आहे... पुढे याचाच संदर्भ देत नुपूर शर्माला न्यायालयाने संरक्षण दिलं, सरकारी प्रवक्त्याचा सरकारी छळ झाल्यावर चंद्रचूडांचे शब्दच त्यावेळी नुपूरला अभय मागण्यासाठी कामी आले ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे!
सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शिवसेना प्रकरण आणि इलेक्टोरल बाँड यासारखे दिलेले राजकीय निकाल जेवढे मीडिया आणि सोशल मीडियात गाजले तेवढे त्यांनी न्यायिक प्रशासन आणि नागरिक सुविधा यंत्रणा याबाबतीत केलेले काम चर्चिले गेले नाही ही भारतीय चर्चाविश्वाची एक शोकांतिका आहे.
चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश म्हणून न्युट्रल सायटेशन व्यवस्था लागू केली. नवे तंत्रज्ञान वापरून नागरिकांना न्यायाचा आणि निर्णयांचा "ॲक्सेस" कसा सुलभ होईल यासाठी त्यांनी छोटे छोटे सुधारणांचे उपक्रम राबवले. लाईव्ह व्हिडीओ टेलीकास्टबद्दल सिब्बल, मेहता यांच्यासारखे वकील आणि काही हायकोर्टांकडून नाके मुरडली गेली. सामान्य लोकांना कायद्याचे कामकाज बघायला दिले तर ते चुकीचा अर्थ काढतात, रील-क्लिपा एडिट करतात म्हणून सिब्बल, मेहता यांच्यासारखे कायद्याचे धुरीण कुरकूर करत असताना चंद्रचूड नेटाने पारदर्शकतेच्या बाजूने उभे राहिले! याबाबतीत "The answer to sunlight is more sunlight!" हे त्यांचे उद्गार येणारे सरन्यायाधीश लक्षात ठेवतील अशी अपेक्षा आहे...
तेंडुलकरची कारकीर्द तो असिफसमोर एकदा कधीतरी कसा भुईसपाट झाला यावरून निकालात काढायची झाली तर त्याने क्रिकेटसाठी वेचलेल्या तीस - चाळीस वर्षांची बाकी आपल्यासमोर आ वासून उभी राहील! त्याचप्रमाणे चंद्रचूड यांचा एखादा निकाल तुम्हाला आवडला नाही किंवा तुमच्या लाडक्या नेत्याला महाग पडला म्हणून त्यांची गेल्या दोन दशकांची न्यायिक कारकीर्द छूमंतर होत नाही. सचिनची नोंद क्रिकेटचा इतिहास त्याचे सहजलाघवी कौशल्य, त्याची सरासरी, त्याचा धावांचा डोंगर आणि त्याचे सातत्य यासाठी लक्षात ठेवेल त्याचप्रमाणे चंद्रचूड यांच्या कारकिर्दीचा आलेखही या देशाचे न्यायकारण सोन्याच्या अक्षरात नोंदवून पुढे जाणार आहे! चंद्रचूड न्यायाधीश म्हणून यापुढे भारताला लाभणार नाहीत,खासदार म्हणून लाभतील का माहित नाही!! तरी तूर्तास त्यांना सुखी निवृत्तोत्तर आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा...
(लेखाचा दिनांक: ०८/११/२०२४ - न्या. चंद्रचूड यांच्या न्यायिक कामकाजाचा शेवटचा दिवस)