बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

'लहरी' विज्ञानाची समीक्षा !

सध्या हिंदू भाविक लोकांमध्ये आपली 'श्रद्धा' वैज्ञानिक आहे ही बाब सिद्ध करण्याची एक प्रवृत्ती वाढत आहे. यात प्रथमदर्शनी काही चूक वाटत नाही. मात्र वास्तव जरा जास्तच कटू आहे ! आमच्या धर्मात सर्वच वैज्ञानिक आहे हे सिद्ध करण्याच्या चढाओढीत किंवा अडचणीच्या गोष्टींचे समर्थन करण्याच्या नादात असे लोक काहीच्या काही दावे करतात. यात सुशिक्षित आणि इंग्रजी बोलणारे लोक असल्याने, ते खरेच 'सायंटिफिक' आहे, असा एक सार्वत्रिक भ्रम बहुसंख्य भाविक लोकांमध्ये बघायला मिळतो. हा भ्रम आणि त्यामुळे घडणारी वैचारिक वाटचाल ही घातक आहे. बऱ्याच लोकांना प्रामाणिकपणे या गोष्टी मान्य असतात. त्यावर त्यांचा विश्वास बसलेला असतो. त्यामुळे या प्रकारच्या 'लहरी' विज्ञानाचा पर्दाफाश होणे, हे गरजेचे आहे. त्यासाठीच हा लेखप्रपंच...

या सर्व 'वैज्ञानिक श्रद्धांच्या' मांडणीचा 'लहरी' (Waves) आणि त्यांचा प्रभाव हा कणा आहे ! त्यामुळेच या प्रकारच्या नववैज्ञानिक लोकांना गंमतीने 'लहरी वैज्ञानिक' म्हणू !! मुळात लहरी म्हणजे Waves ही वस्तू अदृश्य आहे. त्यामुळे दावे करणे सोपे आणि सहज बनते... उदाहरणार्थ - अमुक मंत्र आणि अमुक हालचाली केल्यात तर सूर्याच्या लहरी तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पाडतात. आणि तुम्ही तमुक प्रकारे वागलात, तर त्याच लहरी कोपतात म्हणे !! त्यात सूर्य हा 'लोहगोल' आहे म्हणून धातूंचा प्रभाव वगैरे जटील गोष्टी वाढवल्या की झाले वैज्ञानिक... आता गंमत अशी की सूर्य हा 'लोहगोल' वगैरे नाही. सूर्य हा 'वायुगोल' आहे... जास्त माहितीसाठी - https://en.wikipedia.org/wiki/Sun आता तरीही सूर्याच्या प्रचंड वस्तुमान, गुरुत्वाकर्षण, त्यावरील वायूंचे आण्विक ज्वलन, इत्यादि वैशिष्ट्यांमुळे त्याच्यापासून किरणे किंवा सोलर लहरी तयार होतात हे खरे आहे. मात्र त्या लहरी किंवा किरणे सूर्याच्या कैक पटींनी लहान असलेल्या एका ग्रहावरच्या एका यःकश्चित सजीव मनुष्य प्राण्याच्या वर्तनामुळे 'प्रसन्न' होतील किंवा 'कोपतील' हे म्हणजे सायन्स फिक्शनच्याही वरताण म्हणणे झाले !!
---
आता वरील उदाहरण मी काल्पनिक दिले आहे. मात्र वास्तव उदाहरणेही खूप आहेत. त्यापैकी काहींची तपासणी करत करत या छद्मविज्ञानाचे दावे कसे फोल आहेत, हे लक्षात घेऊ ! पहिले उदाहरण म्हणजे झी २४ तास या नामांकित मराठी वाहिनीवरील या गणेशोत्सवाच्या दरम्यान पुनर्प्रकाशित झालेला एक 'विज्ञान गणेशु' नावाचा कार्यक्रम आहे ! ही डॉ.उदय निरगुडकर यांनी घेतलेली श्री.साक्रीकर, विश्वस्त,टिटवाळा संस्थान यांची मुलाखत आहे.ही मुलाखत गेल्या गणेशोत्सवात घेतली होती. त्यात साक्रीकरांनी 'गणेशोत्सव' किंवा गणेश पूजेतील विज्ञान सांगितले आहे. त्यावर डॉ. निरगुडकर यांनी प्रचंड स्तुतीसुमने उधळली आहेत, आणि वैज्ञानिक हा शिक्कामोर्तब श्री.साक्रीकर यांच्या दाव्यांवर केला आहे. मात्र हे 'विज्ञान' वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रचंड लहरी आहे !! त्यातील काही दावे विचारात घेऊ. ...

एक म्हणजे जर म्हणे एखादे स्तोत्र किंवा वाक्य नीट स्वरात म्हटला नाही, तर हानी होते. त्यामुळे अर्थ नसला तरी चालेल, आधी संथा घ्या अशी श्री.साक्रीकर यांची मांडणी आहे. याला ते काही शास्त्रज्ञांनी केलेले ध्वनींवर प्रयोग दाखले म्हणून जोडतात ! आता कोण कसा बोलतो यापेक्षा कोण काय बोलतो हे महत्त्वाचे असते. त्यात करून चुकीच्या उच्चाराने भयंकर परिणाम होतात असे जगात कोणीही सिद्ध करू शकत नाही ! (कारण एखादा ब्रिटीश माणूस आणि मल्याळी माणूस एकाच मंत्राचे सारखे उच्चार करूच शकत नाहीत. त्यामुळे नक्की ते उच्चार बाधणार कोणाला हा घोळ तयार होतो !!) फारतर गोंगाट आणि त्यामुळे इतरांना होणारा मानसिक ताप (आणि त्यामुळे इतरांनी गोंगाटकर्त्याला केलेली इजा !!!) या व्यतिरिक्त चुकीच्या उच्चाराचा फार काही परिणाम भौतिक जगात दिसणे शक्य नाही... दुसरा दावा असा आहे की, " You convert Gravitational Energy into Electrical Energy, this is Upasana'; हे साक्रीकारांचे शब्द जसेच्या तसे आहेत !! त्यानंतर ते कसे जमिनीत आपले मंत्र मुरतात वगैरे सुपर कुल प्रकारातले लहरी विज्ञान मांडतात... त्यात स्पेसमधील प्रवास हाही येतो म्हणे ! आता असे जर असते, तर CERN येथील लार्ज हैड्रोन कोलायडर वगैरे व्याप करणाऱ्या 'अजाण' शास्त्रज्ञ बालकांनी उपासना करायला हवी होती की !! विषयच संपला. ,मांडी घातली, डोळे मिटले आणि Gravitational ची Electrical करून टाकली आणि 'वापरली' हवी तशी उर्जा... माफ करा, पण या वैज्ञानिक दाव्यांपेक्षा 'भोंदू बाबा' जास्त वैज्ञानिक असतात. कारण हातचलाखी मागेही शास्त्र आणि कला असते राव !! ज्या शास्त्रज्ञांची नावे घेऊन श्री. साक्रीकर हे मांडतात, त्यांनी स्वर्गातून आकाशगंगेत बुडी मारून जीव दिला असेल !!! अजून भन्नाट 'लहरी विज्ञान' शिकण्यासाठी त्यांच्या सदर व्हिडीओची लिंक देत आहे - https://youtu.be/PZhd9onFOIw

आता अजून एक उदाहरण पाहू... हे 'सनातन'च्या साहित्यातील आहे. सनातनचे बाकीचे वादग्रस्त प्रकरण बाजूला थोडावेळ ठेवू आणि त्यांचे लहरी विज्ञान समजावून घेण्याचा प्रयत्न करू ! तर एकाठिकाणी (म्हणजे इथे - http://www.sanatan.org/mr/a/851.html ) सनातनने आध्यात्मिक शंकानिरसन केले आहे. त्यात स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणू नये या गोष्टीचे समर्थन अत्यंत मजेशीर पद्धतीने केले आहे. ते असे की -
स्त्रियांची जननेंद्रीये आतल्या बाजूस असल्यामुळे अधिक तापमानाला जास्त काळ कार्य करू शकत नाही. त्यामुळे कोणी गायत्रीची किंवा ओंकाराची साधना, सूर्योपासना अशा तीव्र साधना केल्यास जवळजवळ २ प्रतिशत स्त्रियांना गर्भाशयाचे विकार चालू होतात. स्त्रीबीज निर्माण करणार्‍या ज्या ग्रंथी आहेत, त्यांचे विकार चालू होतात
आता वरील 'शास्त्रीय' कारण, तेही सनातनच्या डॉ.आठवलेंच्या मार्गदर्शनातून दिलेले आहे, त्यामुळे 'साधक' लोक ते मानतात यात वादच नाही ! आता ज्याला गायत्री मंत्र म्हणायचा त्याने म्हणावा, ज्याला नको त्याने म्हणू नये. पण स्त्रियांवर लादलेल्या बंदीचे समर्थन अशा ढोंगी थाटात करणे हे विचित्र आहे. तीव्र साधना कसली ? ओंकार हा फक्त एक स्वर/ध्वनी/नाद (आल्याच म्हणजे परत 'लहरी' !!) आहे, मग गर्भाशयाच्या विकाराचा काय संबंध ? असे असेल तर मग रोजच्या वापरातले नवे शब्द नेमके कुठे कुठे 'बाधतात' याची काळजी कोण करणार ? स्त्रियांवर निर्बंध लादायचे आणि करणे मात्र 'लहरी विज्ञाना'ची द्यायची ही लबाडी नव्हे का ? अध्यात्मात ही लबाडी खपते ??

या सर्वाचा कळस म्हणजे शनी चौथऱ्यावर स्त्रिया गेल्या म्हणजे वाटोळे होईल हा समज आणि त्याला शनीच्या लहरींची साथ !! इथे भूमाता ब्रिगेडच्या भंपक आंदोलनाचे समर्थन करण्याचा अजिबात प्रश्न नाही. मात्र वस्तुनिष्ठ विचार करता, स्त्रियांना एखाद्या श्रद्धास्थळापासून अडवणे हे खूप गलीच्छ मनोवृत्तीचे प्रतिक आहे. वर 'शनीच्या लहरी स्त्रियांना बाधतात' ही सायंटिफिक मखलाशी हा म्हणजे नालायकपणा झाला !! फक्त चौथऱ्यावर चढल्यावरच लहरी का बाधतात ? बाकीच्या वेळी शनीच्या लहरी का थंड पडतात ? तसे असेल तर सर्व स्त्रियांना सूर्यमालेच्या बाहेर ठेवले तरच शनीच्या लहरींपासून वाचवता येईल !! पण 'का','कसे हे प्रश्न विचारणाऱ्यांना घाऊकपणे धर्मविरोधी ठरवले की मग बुद्धीशी घटस्फोट घेतला तरी काही बिघडत नाही...

हे लक्षात घ्यायला हवे की विज्ञान हे निरीक्षण,निष्कर्ष आणि अनुमान अशा पायऱ्यांनी चालते. तारा चुकीच्या लावल्या किंवा फ्युज गेला तर बल्ब पेटत नाही म्हणजे नाहीच... वाट्टेल त्या लहरी तो बल्ब पेटवत नाहीत ! गणेश मूर्ती लहरी खेचते म्हणे ! का ? तर मातीची आहे म्हणून !! अरे विद्वानांनो, कशाला पैसे घालवता मग फोनवर ? उचला माती, करा गोळा, लावा कानाला आणि द्या फेकून !! मात्र 'लहरी विज्ञान' नावाच्या छद्म सिद्धांताचे पाईक हे आपल्याच Fantasy च्या विश्वात रम्य असतात. यातूनच मग लहान बाळाला अंगारा खाऊ घालणे, स्त्रियांना जखडून ठेवणे, परीक्षेला जाताना विचित्र चाळे करायला लावणे, लिंबू-मिरची, तांब्या-पितळी-लहरी, वगैरे मूर्खपणाचा उगम होत असतो...

आता हे लिहिले म्हणून कोणी धर्मबुडवेपणाचा शिक्का बसणार असेल, तर नाईलाज आहे ! खरंतर, या प्रकारच्या आचरट समजुतींमुळे आणि 'लहरी विज्ञाना'त रमण्यामुळे हिंदूंचा आणि भारताचा घात झाला आहे. अर्थशून्य घोकंपट्टीला 'संथा' म्हणून पवित्र करून घेतल्यामुळे, वेदविद्या न शिकता, वेद बकणारे 'रेडे' तयार झाले, हे भान आपल्याला कधी येणार ? हा लेख अप्रिय वाटू शकतो. किंबहुना जर या लहरींच्या थोतांडाचे एक दोन इंग्लिश वाक्य टाकून समर्थन केले, तर जास्त लोकप्रिय होता येईल ! मात्र लोकप्रियतेसाठी असत्य बोलण्याची बौद्धिक वेश्यावृत्ती लेखकाला मान्य नाही ! त्यामुळे कटू वाटले तरी सत्य काय आहे हे सांगणे गरजेचे आहे. या लेखात वापरलेले विनोद हे थोतांडांच्या विरोधात वापरले आहेत.त्यामुळे धर्माची टिंगल केली वगैरे फालतू आरोप करू नयेत... तरीही ज्यांनी प्रामाणिकपणे हा लेख वाचला, त्यांचे प्रबोधन झाले तर या लेखाचे सार्थक आहे. बाकी 'लहरी सायंटीस्ट' सुधारणे कठीण आहे, हे माहितच आहे...

श्रद्धेला काहीही करून, ओढूनताणून विज्ञान आणून चिकटवणे खरेतर अनावश्यक आहे. आकाशात बघून उदात्ततेने डोळे मिटणे किंवा ध्यान करताना तंद्री लागणे या श्रद्धोद्भव गोष्टींना 'लहरी विज्ञाना'ची गरज नाही. श्रद्धा हा प्रत्येकाचा अधिकार आणि स्वातंत्र्याचा हिस्सा आहे. मात्र असल्या 'लहरी वैज्ञानिकां'च्या थोतांडाला बळी पडून आपले अधःपतन करून घेणे, ही परमदुर्दैवाची बाब आहे... त्यामुळे 'वैज्ञानिक श्रद्धांच्या' अट्टाहासापायी या 'लहरी मूर्खपणा'ला बळी पडू नका, हीच विनंती !



६ टिप्पण्या:

  1. Please read a book "I am the Mind" by Deep Trivedi.
    For details, log on www.aatmanestore.com

    उत्तर द्याहटवा
  2. My article on similar topic
    http://www.marathipizza.com/science-and-modern-superstitious/

    उत्तर द्याहटवा
  3. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. आपण मानताय तसा लहरींचा प्रभाव अशास्त्रीय नाही. लहरींचा मानवी मनावर होणारा परिणाम खूप मोठा असतो. मी भम्पकतेचे समर्थन करत नाहीये. पण यावर खूप संशोधन होणे आवश्यक आहे. आताच ते नाकारणे अशास्त्रीय वाटते

    उत्तर द्याहटवा